Followers

Wednesday, 8 November 2023

मी आणि इन्डियन फिल्म्स (मराठी)

 

 

 


सिर्गेइ पिरिल्याएव

 

 

मी

आणि

 

इण्डियन फ़िल्म्स

 

 

मराठी भाषांतर

आ. चारुमति रामदास

 

 

 

 

 

जगातील सर्वांत चांगल्या, माझ्या आईला,

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मी आणि इण्डियन फ़िल्म्स (मूळ रशियन कादम्बरी) 

लेखक: सिर्गेइ पिरिल्याएव

रेखाचित्र : इकातिरीना गलवानवा    

@ झान्ना पिरिल्याएवा 

हिंदी भाषांतर : आ. चारुमति रामदास 

हिंदी भाषांतर @ आ. चारुमति रामदास


अनुक्रमणिका


प्रस्तावना

 

तीन पासून अनन्तापर्यन्त

जेव्हां आम्हीं गैस स्टेशनवर हिंडायचो...

मेरा नाम जोकर...

ते सोनेरी दिवस...

मी आणि वोवेत्स फोटो प्रिन्ट करतो...

मी परामनोवैज्ञानिक (हीलर) कसा झालो...

मी फुटबॉल मैच बघतो...

माझं प्रेम...

लवकरंच ऑगस्ट येणारेय....

 

इण्डियन फ़िल्म्स

अगदी-अगदी सुरुवातीपासून...

औषधी पाल्यांचा संग्रह...

इण्डिया, दोन सिरीज़....

मी आणि व्लादिक फ़िल्म्स बनवतो......

माझी पणजी – नताशा

समर कॉटेज. सणाचे दिवस आणि नेहमीचे दिवस...

मी आणि व्लादिक – लेखक...

मी आणि व्लादिक – बिज़नेसमैन

फुटबॉल-हॉकी

माझे आजोबा मोत्या, पर्तोस आणि पालनहार....  

पुन्हां पणजीआजी नताशा आणि फाइनल...

उपसंहार

परिशिष्ट

आन्या आण्टी आणि इतर लोकं...

लेखकाचे मनोगत...

 

 

 

 

प्रस्तावना

जेव्हां बाल साहित्यांत एखाद्या सुयोग्य लेखकाचे आगमन होते,  तेव्हां सम्पूर्ण सृष्टि ह्या अलौकिक घटनेचे स्वागत करते. कारण आपल्या ग्रहावर प्रत्येक खराखुरा बाल-लेखक सोन्या इतकाच मौल्यवान असतो. जापानमधे आपल्या जीवनांत आनंद घेऊन आलेल्या ह्या विशेष व्यक्तींना “मानवतेची दौलत” असे म्हणतात.

अशीच दौलत आहे – लेखक सिर्गेइ पिरिल्याएव, ज्याने जगाला बालपणाबद्दल एक लघु उपन्यास दिला आहे. प्रत्येक वयोगटाच्या मुलांना तो आवडेल, आणि म्हातारपणापर्यंत अनेकदा ते हा लघु उपन्यास वाचतील. कारण, त्यांत काहीतरी नक्कीच आहे, जे हसायला भाग पाडतं! बसा, पुस्तक उघडा आणि हसूं लागा. जीवनांत ह्याहून मोठा आनंद कुठे आहे कां? खरंतर हसण्याच्या भावनेचे शिक्षण – आत्म्याच्या स्वातंत्र्याचे शिक्षणंच आहे ना.

“इण्डियन फ़िल्म्स” च्या लहानग्या नायकाची आत्मा स्वतंत्र आहे – उत्साही, बेचैन, प्रामाणिक, प्रत्येकाच्या मदतीला तत्पर, ही आत्मा आहे एका कवीची, एका कलाकाराची, जी खुद्द लेखकाच्या, म्हणजे सिर्गेइ पिरिल्याएवच्या अत्यंत जवळ आहे. मला विश्वास आहे की ह्या लहानग्या नायकाची आत्मा प्रत्येक पाठकाला सुद्धां जवळचीच वाटेल. ती जगाकडे बघण्याचा एक नवीन आणि औत्सुक्यपूर्ण दृष्टिकोण उत्पन्न करेल (किंवा त्याची आठवण देईल?) ज्याची आपणा सर्वांना अत्यंत आवश्यकता आहे, विशेषकरून अशा लोकांना जे लहान मुलांसाठी लिहितात.

आपल्या रचनांतून सिर्गेइ पिरिल्याएव बाल साहित्याच्या सर्वोत्कृष्ट परंपरांना पुढे नेत आहेत, ज्यांचा उद्गम – यूरी सोत्निक, निकलाय नोसव, विक्टर द्रागून्स्की, ल्येव कास्सिलच्या गोष्टींपासून झालेला आहे.

वर्तमान काळांत साहित्याचा हा प्रकार क्वचितच बघायला मिळतो. कारण तो खूप अवघड आहे. आणि, मी हे सुद्धां म्हणेन, की साहित्यांत असल्या आनंदी, काही निश्चित विषय असलेल्या, ज्वलंत, आणि तसेच “जीवनाने गच्च भरलेल्या” गोष्टी म्हणजे उच्च कोटीच्या हवाई प्रात्यक्षिकांसारख्याच आहेत.

मला आनंद वाटतोय, कि आपण ज़मिनीवरून ह्या बहाद्दर पायलेटचे अचूक प्रात्यक्षिकं बघूं शकतोय, जो आपल्या आजी तोन्या वर, आजोबा मोत्यावर, पणजीआजी नताशावर, व्लादिक, ह्या मावस भावावर खूप प्रेम करतो, आणि सर्वांत जास्त त्याचे प्रेम आहे – खूप लांबच्या, ज्यांच्या पर्यंत तो पोहोचूं शकत नाहीं अशा, रहस्यमय आणि न सोडवता येणारे कोडे असलेल्या इण्डियन फ़िल्म्स वर.

 

मरीना मस्क्वीना       

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

तीन पासून अनन्तापर्यन्त

 

 

 

 

 

 

जेव्हां आम्हीं हिंडायचो...

गैस स्टेशन वर...

 

जेव्हां मी.....

जेव्हां मी तीन वर्षाचा होतो, तेव्हां मम्मी-पप्पाने माझ्यासाठी एक सायकल – फुलपाखरू– घेतली. तिच्यावर जायला मला खूप भीती वाटायची, कारण मला सायकल चालवता येत नव्हती, मग पप्पांनी मागच्या चाकाच्या दोन्ही बाजूंना आणखी दोन छोटी-छोटी चाकं बसवून दिली. ती अशासाठी की मी मजेत सायकल चालवायला शिकावं. पण ह्या दोन चाकांमुळे सायकल अशी काही राक्षसासारखी झाली, कि चालवंत रहा, चालवतंच रहा, पण कुठेच जाऊ नका. आणि ह्या फिट केलेल्या चाकांमुळे मला सायकल चालवायला लाज वाटायची, कारण सगळ्यांना कळून यायचं की त्यांच्याशिवाय माझं काम चालणार नाही. मला हे सहनंच व्हायचं नाही आणि मी मम्मी-पप्पांना सांगून टाकलं की मी ह्या एक्स्ट्रा चाकांशिवायंच सायकल चालवणार.

आणि खरंच, सायकल चालवणं जरा देखील अवघड नाही झालं. मी, जणु काही सायकलवर नव्हतो जात, पण फुलपाखरावर बसून कम्पाऊण्डमधे उडंत होतो. पण मग, असं झालं की मी टेकडीवरून खाली येत होतो, आणि अचानक माझ्या रस्त्यांत स्ट्रॉलर घेतलेली एक बाई प्रकट झाली. मी तिला कित्तीदां ओरडून-ओरडून एका बाजूला व्हायला सांगितलं, पण, साहजिकंच आहे, तिला असं वाटलं की टेकडीच्या उंचीकडे बघतां फुलपाखरावर सवार माझ्याकडून तिला काही धोका नाहीये. म्हणून मला पट्कन टर्न घ्यावा लागला. मी सर्रकन उजवीकडे वळलो, हैण्डलवरून उडंत सायकलवरून पडलो आणि माझी उजवी करंगळी मुरगळली.

इमर्जेन्सी रूममधे एका सुंदर नर्सने माझी करंगळी ठीक करून दिली. मला दुःख वाटू नये म्हणून ती सतत मंद-मंद हसत होती, जसं सिनेमांत असतं:

“डोळे बंद कर आणि सहन कर, तू तर माझं शांत बाळ आहे.”

आता थोड़ं बरंसुद्धा वाटंत होतं.

चार वर्षांचा असताना मी घरांत एक मांजर आणलं. मला ते मांजर आपल्या घरांत पाळायचं होतं. पण त्याला घरांत ठेवायची परवानगी मला कोणीच दिली नाही, उलट, मांजरीला दूध पाजून हाकलायला लागले. कमीत कमी दूध तरी नसतं पाजलं, तसंच हाकलून द्यायचं, पण इथे तर दूध सुद्धां पाजलं – आणि गेट आऊट! मला इतकं अपमानास्पद वाटलं की मांजरीसोबत मी सुद्धा घरातून निघून जाण्याचा निश्चय केला, आणि, बस, फुलस्टॉप.

मी बाहेर निघून आलो.

नऊ नंबरच्या बसमधे बसलो आणि चाललो, मांजरीला सतत हातांमधे पकडून. सगळे लोकं माझ्याकडे येऊं लागले: कित्ती छान मांजर आहे, कित्ती छान मांजर आहे!

मांजर मला सारखं बोचकारंत होतं, बसने आपला राऊँड पूर्ण केला आणि परत त्याच जागे वर आली. मला खूप वैताग आला आणि मी ठरवलं की आतां पाईच घरातून निघून जाईन. मी गैस स्टेशन (पेट्रोल पम्प)चा चक्कर मारला आणि गवतांच्या मैदानातून चालंत गेलो. मांजरीला नेणं कठिण झालं होतं, कारण ती मला नुसतं बोचकारतंच नव्हती, बैलासारख्या आवाजात म्याऊँ-म्याऊँ सुद्धा करत होती. हिच्यांत येवढी हिम्मत कुठून आली?

मी सुस्तावण्यासाठी बसलो, म्हणजे थोडा वेळ तरी मांजराला हातांत पकडावं लागू नये, - मी विचार केला की ती पण थोडं हिंडून येईल. पण मी तिला सोडतांच, ती तीरासारखी पळून गेली. निश्चितंच माझं वागणं - तिच्यासाठी घरांतून निघून जाणं - तिला आवडलं नसावं.                 

आणि हे कोणच्यातरी गावाच्या रस्त्यावर झालं होतं. माझं डोकं अगदीच फिरलं होतं. मी रस्त्याच्या कडेला बसलो. पाय दुखतायंत, संपूर्ण अंगावर ओरखडे आहेत, मांजर पळून गेलेली आहे – रडावसं वाटतंय. अचानक बघतो काय – एक कार इकडेच येत आहे. आणि कैबिनमधे आहे अंकल वलोद्या – हे माझ्या पप्पांचे गैरेजचे मित्र आहे. त्यांनी मला बघून हात हलवला:

“ऐ! तू इकडे कसा आलास? चल, घरापर्यंत घेऊन चलतो!”

आणि, घेऊन आले. पण, तरीसुद्धां मी घरातून निघूनच जाणरेय. जर ते एका मांजराला सुद्धां ठेऊ शकत नाहीं, तर पुढे पण कसली अपेक्षा करायची?

मी पाच वर्षाचा असताना मला दहा रूबल्सची एक नोट सापडली. हे, म्हणजे खूप सारे पैसे होते, म्हणजे समजा, आजचे दहा हजार, फक्त, तेव्हाँ नोट वेगळ्या प्रकारचे होते. तर, म्हणजे, मला दहा रूबल्स सापडल्याबरोबर मोठी मुलं पट्कन धावत धावत माझ्याकडे आली. त्यातील एक म्हणाला:

“ऐक, माझे दहा रूबल्स हरवलेत!”

दुसरा मुलगा त्याला धक्का देत बोलला:

“नाहीं, माझे हरवलेत! सकाळी, मी कुत्र्याबरोबर हिंडत असताना!”

मी त्या कुत्रेवाल्या मुलाला दहा रूबल्स देणारंच होतो, पण तेवढ्यात बिल्डिंग नम्बर तीनची माझी शेजारीण, वेरोनिका आमच्याजवळ आली आणि म्हणाली:

“खोटं बोलतोय, तुझ्याकडे तर कुत्रांच नाहीये! हे ह्याचे दहा रूबल्स आहे, कारण त्याला ते रस्त्यावर पडलेले सापडलेत!”

सगळे लोक माझ्यावर ईर्ष्या करूं लागले, फक्त मला दहा रूबल्स सापडले म्हणून नाही, तर ह्यासाठी की वेरोनिकाने माझा पक्ष घेतला होता. कारण की वेरोनिका खूप सुंदर होती आणि ती माझ्याकडून बोलली होती, त्यांच्याकडून नाही. त्यानंतर मी आणि वेरोनिकाने पेट्रोल पम्प चा एक चक्कर टाकला आणि तिच्या घरी टी.वी. पण बघितला.

त्यानंतर माझ्या कम्पाऊण्डचे सगळे लोक मला चिडवायलासुद्धां लागले, की मी प्रेमांत पडलोय, पण मलातर माहीत होतं नं की ते ईर्ष्येपोटी असं करताहेत, म्हणून मी वाईट वाटून घेतलं नाहीं. आणि, समजा, मी प्रेमांत जरी पडलो असलो, तर काय? कदाचित, माझं वेरोनिकाशी लग्न सुद्धा झालं असतं, जर एक गोष्ट नसती झाली तर.

मी आमच्या बिल्डिंगच्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहून सूर्यफुलाच्या बिया चघळंत होतो.

तेवढ्यांत साफ़-सफ़ाई करणारी दाशा आण्टी तेथे आली. मी पट्कन बिया लपवल्या, पण दाशा आण्टीने विचारलंच:

“बाळा, तुला माहीत आहे कां कि ह्या बिया इथे कोण कुरतडंत होतं?”

मी पण तिला सांगून टाकलं:

“दाशा आण्टी, खरं सांगू कां? तो मीच होतो.”

आता तर ती माझ्यावर अशी ओरडायला लागली, जसं तिला वेडंच लागलंय! म्हणते काय, की मी बिल्डिंगच्या प्रवेशद्वारांत पाय सुद्धां ठेवायचा नाही.

म्हणजे, वेरोनिकाच्या बिल्डिंगमधे.

दाशा आण्टी पहिल्या मजल्यावर राहते, आणि तिची खिडकी प्रवेशद्वाराच्या अगदी बाजूलांच आहे. म्हणजे, गोष्ट हाताबाहेर गेलीय. ओ गॉड, जर कुणी दाशा आण्टीला कुठलं दुसरं क्वार्टरंच दिलं असतं? कदाचित तिच्या मनांत थोडा तरी दया भाव उत्पन्न झाला असता!

जेव्हां मी सहा वर्षाचा होतो, तेव्हां पप्पांनी मला एक फुटबॉल प्रेज़ेन्ट दिली. पण ही काही साधीसुधी बॉल नव्हती, पण तीच बॉल होती ज्याने खरोखरच्या स्पार्ताकटीमचे खेळाडू प्रैक्टिस करायचे.

तुम्हीं म्हणाल, असं कसं झालं? सांगतो: माझ्या पप्पांचे एक मित्र मॉस्कोमधे राहतात आणि त्यांची बेस्कोवशी दोस्ती आहे. आणि बेस्कोव – स्पार्ताकटीमचा ट्रेनर आहे. मोठी मुलं लगेच आपल्या खेळांत मला घेऊं लागली, तेच, जे माझे दहा रूबल्स हिसकावूं पहात होते. ते मला बोलवायला माझ्या घरीसुद्धां यायचे, जणु काही मी सहा वर्षाचा नसून त्यांच्यासारखा बारा वर्षाचा आहे. मी खूश होतो, कारण आमच्या कम्पाऊण्डचा सर्वांत चांगला मुलगा, ल्योशा रास्पोपवसुद्धां माझ्याशी हात मिळवून हैलो म्हणू लागला आणि त्याने मला लेमोनेड देखील पाजलं.

पण मग, स्पार्ताक वाली बॉल उडून एका नोकदार वस्तूला जाऊन भिडली, फाटली, आणि ल्योशाने लगेच मला लेमोनेड पाजणं बंद केलं, त्याने हात मिळवून हैलोम्हणणं सुद्धां थांबवलं. सुरुवातीला मी खूप उदास झालो, पण मग माझ्या मम्माने दाशा आण्टीला वाशिंग पावडरचा एक डबा दिला, आणि मी पुन्हां वेरोनिकाच्या बिल्डिंगमधे जाऊं लागलो.

ल्योशा रास्पोपव आता मोठ्या मुलांबरोबर बेंचवर बसतो, आणि मी आणि वेरोनिका लाकडी रोलर-कोस्टर जवळ बसून गोष्टी करतो. मोठी मुलं पुन्हां माझा हेवा करूं लागतात, कारण की वेरोनिका नुसती सुंदरंच नाहीये, तिचा चेहरांच जणु सांगतो की मी तिला आवडतो. बस, ल्योशा रास्पोपवला हेंच शांतपणे बघवंत नाही. मत्सरी कुठलां, आणि म्हणतात की तो कम्पाऊण्डमधे सर्वांत चांगला मुलगा आहे!

 

जेव्हां मी सात वर्षाचा झालो, तेव्हां शाळेत जाऊं लागलो. आमच्या टीचरचे नाव होते रीमा सिर्गेयेव्ना. तर, पहिल्याच दिवशी, पहिल्याच वर्गात, ती म्हणाली:

“आपला क्लास – एक जहाज आहे. ह्या जहाजांत बसून आपण ज्ञान-सागरांत निघालोय. कोणाला कैप्टन व्हायची इच्छा आहे कां?”

आणि ती टेबलावर ठेवलेल्या कागदांना असे आलटू-पालटू लागली, जसं की तिला नक्की माहीत असावं, की कोणाचीच जहाजाचा कैप्टन व्हायची इच्छा नाहीये. पण मला तर नेहमीच कैप्टन व्हावसं वाटायचं. ज्ञानाच्या जहाजाचातर नाहीं, पण आणखी कोणत्याही जहाजाचा कैप्टन व्हायला मला आवडलं असतं, पण, जर फक्त हेच जहाज समोर आहे तर काय करणार.

“मला व्हायचंय कैप्टन!” मी म्हटलं.

रीमा सिर्गेयेव्नाने एकदम विचारलं:

“पण, तू विविध प्रकारच्या अडथळ्यांच्या आणि शंका-कुशंकांच्या लाटांना तोंड देत जहाजाला एक विशिष्ट दिशेकडे नेऊं शकतोस कां? कारण ज्ञान-सागर – एक गंभीर, भयंकर गोष्ट आहे!                             

मला कळंत होतं की त्यांच्या मते, मी फक्त हेच नाही, तर काहीही करण्याच्या लायकीचा नाही. ती बोलत होती आणि आपल्या ओठांवर लिपस्टिक फिरवंत होती. तिथे काहीतरी चिटकलं होतं.

“ठीक आहे, रीमा सिर्गेयेव्ना,” मी आपलं घोड‌ं पुढे दामटलं, “मी तुमच्या त्या प्रश्नाचे उत्तर तर दिलेच होते नं, की लेनिनग्रादला लेनिनग्राद कां म्हणतात! कारण ग्राद’ – ह्याचा अर्थ पूर्वी शहरअसा होता! मी जहाज सुद्धा मैनेज करेन, तुम्ही काळजी करूं नका.”

“नाही, मैनेज नाही करूं शकणार,” माहीत नाही कां, पण तिने अत्यंत आनंदाने म्हटले, आणि तो मुद्दा तिथेच संपला. तिची लिपस्टिक पूर्णपणे फिस्कटली, आणि मला कळून चुकलं की मी कैप्टन नाही होणार. पण नंतर कळलं की रीमा सिर्गेयेव्ना स्वतःच कैप्टन होणार आहे. पण कोणत्याच पुस्तकांत आणि एकाही सिनेमांत कैप्टन जहाजाच्या डेकवर आपलं लिपस्टिक ठीक नाही करंत. आणि, ते सुद्धां सेलर्सच्या समोर!

जेव्हां मी आठ वर्षाचा होतो, तेव्हां मी टी.वी.ला एक पत्र लिहिलं, ज्यांत त्यांना विनंती केली होती की दॉन किहोतेबद्दल फिल्म दाखवावी. मला माहीत नव्हतं की दॉन किहोते आहे तरी कोण, पण नार्सिस अंकल कडून (हे पण माझ्या पप्पांचे एक मित्र आहेत) कळलं की दॉन किहोते बराचसा माझ्यासारखा आहे.

नार्सिस अंकलशी मी किचनमधे बोलत होतो. नार्सिस अंकल दुरुस्तीच्या कामांत पप्पांची मदत करंत होते, आणि चाकूने वॉलपेपर खरवडंत होते. ते खरवडंत होते आणि म्हणंत होते की ही भिंत सपाट आहे, आपल्या आयुष्या सारखी, आणि असं म्हणतां म्हणतां गाल्यांतल्या गालांत हसंत होते, जणु एखादी मोट्ठी ज्ञानाची गोष्ट सांगताहेत. मी पण एक छेनी (खवणी) घेतली आणि वॉल पेपर खरवडूं लागलो. माझी इच्छा होती की एकाच वेळेस जितकं जास्त जमेल, तेवढं खरवडून टाकू, पण नार्सिस अंकल म्हणाले की अशा प्रकारे वॉल पेपर खरवडतांना मी भिंतीशी तसलांच संघर्ष करतोय जसा दॉन किहोतेनी विण्ड-मिलशी केला होता.

आणि ह्याचा काय अर्थ आहे: विण्ड-मिलशी संघर्ष करणे? आणि दॉन किहोते कोण होता? हा शांत-दोन तर नाहीं ना?” मला कित्तीतरी गोष्टींमधे उत्सुकता होती.

“कम ऑन, बाळा!” अंकल नार्सिस हसूं लागले. “ शांत-दोन – ही एक नदी आहे, पण दॉन-किहोते – शिलेदार. असा कोणी नव्हतांच ज्याच्याशी तो युद्ध करेल, म्हणून त्याने विण्ड-मिलशी संअअअ...घर्ष केला” आणि नार्सिसने पेंटचा एक मोठा तुकडा काढून फेकला, पुन्हां असं म्हणंत, की भिंत आपल्या जीवनासारखीच सपाट आहे.

काही वेळाने ते पुढे सांगू लागले, मी आता काही विचारंत नव्हतो तरी:

“विण्ड-मिलशी संघर्ष करणे – ह्याचा अर्थ असा आहे, काहीच विचार न करतां आपली शक्ति व्यर्थ वाया घालवणे. तू ह्या खवणीच्या ऐवजी चाकू घे आणि निवांतपणे खरवंड. नाही तर तू दॉन किहोते सारखाच होऊन जाशील, ज्याच्यावर दुल्सेनिया तोबोसो हसली होती.”

“आता ही आणखी कोण आहे?”

“ही एक बाई होती, अशी, खासंच होती!!!” इथे अंकल नार्सिस ज्या स्टूलवर उभे होते, त्याच्यावरून पडतां-पडतां वाचले, आणि हे खास’ – ह्याच खासने त्यांना सावरायला मदत केली. त्यांनी स्वतःला सांभाळलं आणि लगेच पुढे बोलूं लागले, जसं काही झालंच नव्हतं : दॉन किहोते सतत तिच्या मागे-मागे जायचा, तिची रक्षा करण्यासाठी, पण ती त्याच्यापासून दूर पळायची, कोणी तिची रक्षा करावी, हे तिला आवडंत नव्हतं.

मग नार्सिस अंकलने मला सल्ला दिला की मी दॉन किहोते बद्दल पुस्तक वाचावं. पण मला वाचणं आवडंत नाही, म्हणून मी विचार केला, की दॉन किहोतेबद्दल फिल्म बघणं केव्हांही जास्त चांगलं होईल, आणि मी टी.वी.वाल्यांना पत्र लिहायला बसलो. चक्क चैनल नं.-1 ला.

“नमस्कार!” मी लिहिलं. “मी, वोलोग्दाहून एक स्टूडेण्ट, तुम्हांला पत्र लिहितोय. माझं नाव कन्स्तांतिन आहे. जर काही अडचण नसेल तर, दॉन किहोतेबद्दल फिल्म दाखवा. कोणत्याही दिवशी, पण खूप उशीरा नको, म्हणजे मी रात्री आरामांत झोपू शकेन. जर तुमच्याकडे ही फिल्म नसेल, तर कमीत कमी शांत-दोनबद्दलंच दाखवा, म्हणजे मला कळेल की दोघांमधे अंतर काय आहे”.

तारीख टाकली आणि सही करून दिली.

आणि, त्यांनी शांत-दोनबद्दल फिल्म दाखवली. अगदी लगेच तर नाही, पण एका वर्षाने. पण, चला, ठीक आहे, महत्वाची गोष्ट अशी की आता मला माहीत आहे की शांत-दोनकाय आहे – ही तिथे आहे, जिथे कज़ाक भांडा-भांडी करतात. पण, मग ती शांत कशी काय झाली? तार्किक दृष्टीने बघितलं, तर तिला खळखळणारी असायला पाहिजे. ऐकायला पण चांगलं वाटतंय: खळखळणारी दोन’. आणि हे जास्त प्रामाणिकसुद्धां आहे.

जेव्हां मी दहा वर्षाचा होतो, तेव्हां तिसरीत शिकंत होतो आणि आम्ही आपल्या आवडीच्या कोणत्याही विषयावर निबंध लिहायचो. मी प्रेमाबद्दल लिहिण्याचा निश्चय केला. आणि लिहून टाकला. 

 

   प्रेमाबद्दल           

जेव्हां मी खूपंच लहान होतो, तेव्हां मला वेरोनिका आवडायची. ती बाजूच्या बिल्डिंगमधे राहायची आणि साफ़-सफ़ाई करणारी दाशा आण्टी मला त्या प्रवेशद्वारांत घुसूंच नव्हती देत, कारण की मी सूर्यफुलाच्या बिया फरशीवर फेकल्या होत्या. मग मम्माने दाशा आण्टीला वाशिंग पावडरचा एक डबा दिला, आणि दाशा आण्टी मला आंत येऊं द्यायला लागली.

वेरोनिकाचे केसं काळे-भोर आणि डोळे हिरवे होते. आम्हीं दोघं गैस स्टेशनवर हिंडायचो आणि टी.वी. बघायचो. आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि सगळे आमचा हेवा करायचे, विशेषकरून आमच्या कम्पाऊण्डचा एक मुलगा ल्योशा रास्पोपोपव. मग मी शाळेत जाऊं लागलो, आता हिंडायला वेळ फारंच कमी असायचां, आणि मग वेरोनिका एका वेगळ्या शहरांत चालली गेली. पण, जेव्हां मी मोट्ठा होईन, तेव्हां तिला जरूर शोधून काढीन आणि आम्हीं लग्न करूं.

आणि मी आपला निबंध टीचरला दिला.

 आणि, आमच्या वर्गांत होती एक लीज़ा स्पिरिदोनवा. ती पण सुरेखंच होती, पण मला ती बिल्कुल नाही आवडांयची, कारण तिला बघतांच कळायचं की ती दुष्ट आहे. तर, ‘ब्रेकमधे लीज़ा स्पिरिदोनोवा टीचरच्या टेबलाशी गेली, माझा निबंध वाचला आणि माझ्यावर हुकूम सोडूं लागली की कुठे-कुठे स्वल्प विराम असायला पाहिजे आणि कुठे नसायला पाहिजे. हे, ती कदाचित अशासाठी करंत होती कारण की तिला वाटायचे की जगातल्या सगळ्या माणसांनी तिच्यावर प्रेम केलं पाहिजे, पण माझांतर जणु चेहरांच सांगायचा की मला ती बिल्कुल आवडंत नाही. माझ्या अज्ञानासाठी मला 3 मार्क्स मिळाले, पण लीज़ा स्पिरिदोनवाचं येवढ्यांनेसुद्धां समाधान झालं नाही. असं नाहीये की मला फक्त स्वल्प विरामांसाठीच ती आवडंत नाही!

आता मी अकरा वर्षाचा आहे. हे नोट्स, जे तुम्हीं वाचलेत, मी माझ्या एका मित्राला दाखवले, आणि तो म्हणाला, की हे नक्कीच इंटरेस्टिंग आहेत, पण खूपच संक्षिप्त आहेत. म्हणजे, मी खूप कमी-कमी लिहिलंय. पण, मी तर तेवढंच लिहूं शकतो नं, जे खरोखरंच घडलं होतं, म्हणून मी विचारमग्न झालो: अजून पर्यंततर काही फार मनोरंजक घटना घडल्या नाहीयेत, म्हणजे, मला अजून माहीत नाहीये की कशाबद्दल लिहायचे. पण मित्राने सांगितलं:

“तू भविष्यांत काय होईल, ह्या बद्दल लिही.”

“असं कसं?” सुरुवातीलातर मला समजलंच नाही.

“बघ, जसं आता तू असं लिहितोस,” मित्राने मला समजावलं (त्याचं नाव आर्तेम होतं), - “जेव्हां मी इतक्या-इतक्या वर्षांचा होतो, तेहां असं-असं झालं होतं. पण आतां असं लिही: जेव्हां मी इतक्या-इतक्या वर्षाचा होईन...आणि कल्पना कर की काय होऊं शकतं.” 

मी लगेच ही आयडिया पकडली आणि लिहायला बसलो.

अशा प्रकारे ह्या छोट्याशा लघु-उपन्यासाचा दुसरा भाग अवतरला, ज्याचे शीर्षक आहे:

 

जेव्हां मी होईन...             

जेव्हां मी वीस वर्षाचा होईन, तेव्हां वेरोनिकाला भेटेन आणि आम्ही लग्न करून टाकू. मग हळू-हळू मी एक मोठा माणूस वी.आइ.पी. होईन आणि तीस वर्षाच्या वयांत नक्कीच डाइरेक्टर होईन. हे फार पूर्वीपासून होत आलं आहे, मग ह्यातूंन सुटणार कसं? मला नक्की नाहीं माहीत की ते काम, ते ऑफ़िस कसं असेल, जिथे मी डाइरेक्टर असेन, पण काम मात्र फार जवाबदारीचं असणार, काही असं-तसं, आलतू-फालतू काम नसेल. मी स्वतःच्या कैबिन मधे बसेन, टेलिफ़ोन वर बोलेन, खिडकीच्या बाहेर एक मोट्ठं कम्पाऊण्ड असेल, जिथे खूप सारे ट्रक्स, कन्टेनर्स आणि ड्राइवर्स असतील, आणि मला, कोणत्याही अवस्थेत पालिचला तीन वाजायच्या आधी ल्वोवला पाठवावंच लागेल आणि वलेराला – एलाबूगाला पठवायचं आहे, लगेच. पण वलेराला, माहितीये, एलाबूगाला नेण्यासाठी काहीच नाहीये , तो नुसतांच उभा आहे! आणि, मी टेलिफोनवरून खडसावेन:

“तुम्हांला कळतंय कां जॉर्ज ल्वोविच, मला ह्या गोष्टीत जरा देखील इंटरेस्ट नाहीय की तुमच्याकडे कामाला कोण आलयं आणि कोण नाही आलं! मला फक्त येवढंच पाहिजे की विश्न्याकोवला एग्रीमेन्टप्रमाणे पेमेन्ट झाले पाहिजे!”

मग मी, पप्पांसारखं रागे भरेन, आणि पालिच तडक नोरील्स्कला जाईल, वालेरा – एलाबूगाला, आणि मी आपल्या सेक्रेटरी वीकाला कम्प्लेन्ट करेन की सगळेच्या सगळे मूर्ख आहेत, एक फक्त मीच नॉर्मल आहे – हो, हो.

वीका प्रत्येक वेळेस हो ला हो म्हणत असेल, जर एखाद्या गोष्टींत तिचं मत वेगळं असलं तरीही. पण एकदा तिला कळेलं की मी फार रागीट आहे, आणि मी तिला सांगेन की जर माझ्याशी एकमत नसेल, तर फुकट भलते-सलते विचार करण्यापेक्षां तिने तसं स्पष्ट सांगावं.

“मी कधीच विचार करत नाहीं,” वीकाला वाईट वाटले, “सेर्गेइ व्लादिमीरोविच, मला खरंच असं वाटतं की तुमच्या चारीकडे सगळी मूर्ख माणसं भरली आहेत, फक्त तुम्हीं एकटेच नॉर्मल आहांत. आणि सगळ्यांशी प्रेमाने वागतां, खूपंच प्रेमाने!”

आता मला सांगा, अशी सेक्रेटरी कुठे मिळेल? आणि, जर तिला माझ्या हो शी होम्हणायचं असेल तर काय करणार?

जेव्हां मी चाळीस वर्षाचा होईन तेव्हां माझ्या डाइरेक्टरशिपची टेन्थ एनिवर्सरी साजरी करण्यांत येईल.

शहरातल्या रेस्टॉरेन्ट - इंद्रधनुष्यमधे भल्या मोठ्या डाइनिंग टेबललाशी मी बसला असेन, माझे प्रिय सहकारी, मित्र आणि अनेक महिला माझ्यासोबत

 

असतील, स्टार्टर्स घेताना लोकांच्या शुभेच्छा घेईन, त्यांची भाषणं ऐकेन. माझ्या बद्दल, माझ्या मैत्रीबद्दल सम्मान प्रकट केला जाईल.

“तसं बघितलं तर, सिर्योझा,” माझ्या डेप्युटीज़पैकी एक म्हणेल, “साधारण मुलगा आहे, पण त्याच्या योग्यतेकडे बघतां त्याला सर्वोत्कृष्ट म्हणायला काही हरकत नाहीं! तो टेलिफोनचा रिसीवर उचलतो आणी फक्त पाच सेकंदात कोणालाही पटवतो, जेणेकरून वेळेवर सामान चढवणं आणि उतरवणं शक्य होतं.”

बोलणारा अशा पद्धतीने बोलत असेल कि त्याला माझा अधिकार, माझं प्रभुत्व सुदृढ आणि सर्वोच्च वाटतं, आणि मला खूष करणं – त्याची हार्दिक इच्छा आहे. पण एक विसंगत आणि लहरी व्यक्ति असल्यामुळे, मी अचानक आपल्या मित्राला खाली बसवेन आणि म्हणेन:

“बरं, बरं, एफ्रेमोव, काही बोलूं नको. चुपचाप स्नैक्स उचल आणि मग आपण सगळे मिळून कराओकेम्हणू.” माझ्या शेजारी बसलेली वेरोनिका हसून म्हणेल:

“कित्ती रानटी आहेस तू!” आणि डान्ससाठी निघून जाईल.

आणि जेव्हां मी घरी परत यायला निघेन, तेव्हां माझ्या सोबत वेरोनिका प्रसन्न मनाने चालत असेल.

“काय पार्टी होती!” ती म्हणेल.

आणि, मला माहीत नाहीं कां, ल्योशा रास्पोपवची आठवण येऊन जाईल.

खरंच तो आमच्या कम्पाऊण्डचा सर्वांत चांगला मुलगा होता!

 

जेव्हां मी साठ वर्षांचा होईन, तेव्हां माझे नातवंडं असतील. ते आपल्या आजोबावर खूप प्रेम करत असतील, चांगले मार्कं आणून त्यांना खूष करत असतील आणि सदा लाडी-गोडी दाखवतं म्हणत असतील की मी त्यांच्यासोबत खेळावे.

“मी थकलोय,” टी.वी.चे चैनल बदलंत मी कह्णत-कह्णत म्हणेन, “मला विश्रांती घेऊ द्या, दुष्टांनो!”

तेव्हां माझी नात मरीना मला मिठी मारेल आणि खूप-खूप विनंती करंत म्हणेल की मी त्यांच्याबरोबर बाहेर जाऊन स्नो-मैन” बनवावा.

“बस, आता फक्त स्नो-मैनबनवणंच शिल्लक राहिलंय!” मी वेड्या सारखा म्हणेन. मला माहितीये की मी थोड़ासा ज़री तोंड वेंगाडत बोललो की मरीना हसत सुटेल. “हे-ए” मी तोंड वेंगाडून म्हणेन, “आलंय म्हातारं खुंट बाहेर रस्त्यावर आणि बनवतंय स्नो-मै-ए-न. येवढी रात्र झालीय, सगळी मुलं आणि त्यांचे मम्मी-पप्पा आपल्या-आपल्या बिछान्यांत लपलेत, पण, डैम इट, मरीनाचा आजोबा बनवतोय स्नो-मै-ए-न.”     

मरीनाचं तर हसतां-हसतां पोट दुखूं लागेल, आणि मी बोलतंच राहीन:

“सकाळपर्यंत स्नो-मैन अचानक टाळ्या वाजवूं लागेल आणि आजोबाच्या चारीकडे फेर धरंत नाचू लागेल. त्रा-ता-ता! त्रा-ता-ता! मुलं माझ्या आणि स्नो-मैनच्या जवळून शाळेत जाताना म्हणतील:

चौदा नंबरच्या क्वार्टरमधला (हे आमचं क्वार्टर आहे) म्हातारा अगदी भ्रमिष्ट झालांय. रात्रभर झोपंत नाही! पण मग आपल्या भागांत ज़ोरदार वारं सुटेल, मोट्ठे-मोट्ठे वादळं येतील, पण मी जरी कुठेही लपलेला असेन, तरी स्नो-मैनचे रक्षण करीन.”

बस, पुरे झालं आजोबा!” मरीना ओरडेल, किंचाळेल, पण मी म्हणतंच राहीन:

“आणि हवा माझ्या बरोबर स्नो-मैनला सुद्धां जमिनीवरून नेहमीसाठी उडवून नेईल. असं होऊं नये, म्हणून, माझे लाडके, मला तुमच्याबरोबर स्नो-मैन बनवण्याची गळ नको घालू.”

अशा प्रकारे मी बर्फाने काहीही बनवायला नाही जाणार, आणि मुलांसोबत खेळंत राहीन.         

जेव्हां मी ऐंशी पेक्षा थोड्या जास्त वयाचा होईन तेव्हां माझी शेवटची घटका जवंळ आलेली असेल. पण त्या कठिण क्षणांत सुद्धा मी प्रसन्नच राहीन. नातवंडांना जवळ बालावून सांगेन:

“मुलांनो, माझी अंतिम घटका येऊन ठेपली आहे. तुमचे आजोबा क्षणाक्षणाला मृत्युच्या जवळ-जवळ जात आहेत. पट्कन चहा आणि सैण्डविचेस आणा, शेवटचं खाऊं या.”

डबडबलेल्या नेत्राने माझी नात मरीना सैण्डविच करायला जाईल, आणि माझे गंभीर नातू ( ते, म्हणजे, त्यावेळेपर्यंत मोठे झालेले असतील) दगडासारखे चेहरे घेऊन सोफ़्यावर बसतील, आणि त्यांना जीवन ओझ्यासारखं वाटत असेल.

आणि, त्यांच्याकडे बघितल्याबरोबर मला जणु लहानसा सैतानंच चावेल.

“काय रे, दुःखी झालांत का, मुलांनो?” मी विचारीन. “बघा, मी काय म्हणतो, ते ऐका. डेनिस, तुला मी सांगतोय आणि फक्त मैत्रीपूर्ण सल्ला देतोय की तू तुझ्या फर्ममधे दरोडेखोरांबरोबर काम करणं सोडून दे, आणि प्रामाणिकपणे जगायला आणि काम करायला सुरुवात कर. आणि तुला, एल्बर्ट, मी कोणतांच सल्ला नाही देणार, कारण की तू स्वतःच समजुतदार आहेस. फक्त एकंच गोष्ट, जी तुला सांगावीशी वाटतेय, ती म्हणजे, कध्धी असा चेहरा नको करूं, जसा तू आत्तां केलेला आहेस. मला कळतंय की माझ्या मृत्युचं तुला दुःख होईल, पण स्वतःच्या जीवनाचं काय करशील?” आणि मी नाक शिंकरतो.

तेवढ्यांत मरीना आमच्यासाठी चहा आणि सैण्डविचेस आणेल, पण आता माझी इच्छाच नसेल आणि मी नातवंडांना चहा प्यायला सांगेन.

“चला, एल्बर्ट आणि डेनिस, माझ्या सुखद यात्रेसाठी!”

“आजोबा, चहा पिण्याची इच्छांच नाहीये...” दात कटकट वाजवत डेनिस आणि एल्बर्ट म्हणतील आणि जे घडंत आहे, ते सहन न झाल्यामुळे मुठी आवळून धरतील.

“खा, मी म्हणतो खाऊन घ्या!!!” मी जोराने ओरडेन, जसा तरुणपणी ओरडायचो.

“आणि, त्यांनी चविष्ट सैंडविचला, जसे मरीना नेहमीचं करते, तोंड लावल्याबरोबर, माझी आत्मा छताकडे झेप घेईल, मग खिडकीतून बाहेर निघून जाईल, थोडा वेळ घराचा वरती फिरेल आणि लवकरंच देवाजवळ पोहोचेल.

“तर,” देव म्हणेल, “फुकट इकडे-तिकडे नको फिरू. घे हा कपडा आणि धूळ स्वच्छ कर, बाकीचे करताहेत तसं. नाहीतर इथे स्वर्ग स्वर्ग नाही राहणार, नरक होऊन जाईल.

आणि मी धूळ झाडू लागेन, म्हणजे स्वर्ग हा स्वर्गच राहील आणी...वगैरे, वगैरे.

एक वेळ अशी सुद्धां येईल, जेव्हां मी अजिबातंच नसेन.

गावातील रस्त्यांवर शरद ऋतूतील पावसाची झडी लागेल, कम्पाऊण्ड्समधे बोचरं वारं वाहेल, आणि माझे पाय कधीच फुलांच्या ताटव्यांवर नाही पडणार, माझ्या हाताची बोटं कधीच चुटकी वाजवणार नाहीत, माझ्या तोंडात कधीच चेरी-जूस नाही जाणार आणि माझं मन कधीच आनंदाने उचंबळून येणार नाही. नवीन लोक जन्म घेतील, ते आपापलं जीवन जगतील, माझ्या अनुभवांतून काहीच न घेतल्याशिवाय.

पण, कदाचित, कधीतरी ते माझं हे लहानसं पुस्तक वाचतील. त्यांना कळेल की मी आणि वेरोनिका कसे गैस स्टेशनच्या आवारांत हिंडायचो, आणि जिथे हे लोकं राहतात, तिथेसुद्धा गैस-स्टेशन्स असतीलंच. आपल्याकडे तर गैस-स्टेशन्स नेहमी घरांच्या जवळपासंच असतात नं!

लीज़ा स्पिरिदोनवासारख्या दुष्ट, सुंदर मुली देखील फूल फेकतील आणि स्मित हास्य करतील, त्यांना आठवणंच नाही राहणार की त्यांच्यापेक्षां सुंदर सुद्धा कोणी आहे.        

“हो-हो!” उँच आकाशातून मी त्यांना सांगेन.

आणि तेव्हां थोडा-थोडा पाऊस सुरू होईल. त्या आपापल्या घरांत पळतील चहा प्यायला आणि टी,वी. बघायला, ज्याच्यावर कित्येकदा संध्याकाळी दोन किहोतेबद्दल फिल्म दाखवंत असतील.

 

 

मेरा नाम जोकर...      

इण्डियन फ़िल्म्ससारखीच नास्त्यादेखील बघतांक्षणीच आवडली. सुरुवातीला आमचे खूप छान चालले होते, पण मग ( ते पण, कदाचित बघतांक्षणीच) नास्त्याला जुनी हिन्दी फिल्म मेरा नाम जोकरआवडली नाही आणि आम्हीं वेगळे झालो.

हे सगळं असं झालं.

नास्त्या माझ्या घरी आली, आम्हीं कॉफ़ी प्यायलो, आणि मी म्हटलं, चल, एखादी फिल्म बघूं या. जशी, ‘मेरा नाम जोकर’.

“चल, बघू या,” नास्त्या म्हणाली.

मी कैसेट लावली, आणि स्क्रीन वर दिसलं : राज कपूर फिल्म्स प्रेज़ेन्ट्स’. माझ्या डोळ्यांत एकदम पाणी आलं आणि सर्कसच्या अरेनांत रंगीबेरंगी रिबन्सच्या, फुग्ग्यांच्या कल्होळात जोकरची ड्रेस घातलेला राजकपूर आला. लगेच त्याच्याजवळ पांढरे एप्रन्स घातलेले बरेच लोक धावत-धावत आले. प्रत्येकाच्या हातांत कातरी होती.

“तुमच्या हार्टचं ऑपरेशन करावं लागणारेय,” ते म्हणाले.

“कां?” राज कपूरने विचारलं.

“कारण की तुमचं हार्ट खूप मोट्ठं आहे, येवढ़ं मोठं हार्ट घेऊन जगणं खूपच धोक्याचं आहे,” ते म्हणाले. “कारण की येवढं मोट्ठं हार्ट जगांत कोणाचेच नाहीये! ज़रा विचार करा, जर तुमच्या हार्टमधे सगळं जग सामावून जाईल, तर काय होईल?!”

आणि राजकपूर गाणं म्हणूं लागला. मी हे सुद्धा विसरून गेलो की माझ्या शेजारी नास्त्या बसलीये. माझ्या मनांत इतकी खळबळ माजली होती की माझे दात घट्ट मिटले होते, आणि मी उजव्या हाताने डाव्या हाताचे मनगट इतके घट्ट धरले होते की ते दुखायला लागले होते.

सुरूवातीचा जवळ-जवळ अर्धा तास नास्त्या शांतपणाने बघत होती. मग ती हसायला लागली. राजकपूरची मम्मा मरते आहे, त्याच संध्याकाळी तो अरेनांत येतो आणि मुलांना हसवतो, आणि शोझाल्यावर काळा चष्मा लावतो, ज्याने कोणाला त्याचे अश्रू नाही दिसणार...आणि ही नास्त्या हसतेय!

“ओय, चष्मा कसा आहे त्याचा – एकदम सुपर!” ती म्हणते.

“नास्त्या,” मी मिटलेल्या दातांमधून तळमळतो, “ही फिल्म सन् सत्तरची आहे!”

पण नास्त्याला त्याने काही फरक पडंत नव्हता की फिल्म कोणत्या सालाची आहे. जेव्हां राजकपूरने आपल्या समोर जुन्या चिंध्यांचा बनवलेला जोकर-बाहुला ठेवला आणि स्कूल टीचरशी झालेल्या आपल्या पहिल्या-वहिल्या असफल प्रेमाबद्दल सांगू लागला, तेव्हां मला नास्त्याकडे बघायचीसुद्धां भीती वाटूं लागली. मला फक्त येवढंच ऐकू येत होतं की ती अति प्रयत्नाने आपलं हसू आवरतेय.

जवळ-जवळ वीस मिनिटं अत्यंत तणावाखाली आम्ही फिल्म बघंत होतो. नास्त्याने आपले गाल हातांत धरले होते, आणि स्क्रीनकडे न बघण्याचा प्रयत्न करंत होती. मला मात्र वाटंत होतं की माझ्यांत इतक्या प्रचंड शक्तिचा संचार झाला आहे की मी नुसत्या नज़रेने सूर्याला नेहमीसाठी विझवून टाकेन. राज कपूर समुद्राच्या काठावर एका कुत्र्याला कुरवाळंत होता.

“सिर्योग, फिल्म बरांच वेळ चालणारेय कां?” शेवटी नास्त्याने विचारलेच.

जणु मला चिडवण्यासाठीच रिमोट कुठेतरी निसटला होता. मी त्याला धुंडलं, कैसेट थांबवली, वीडियो-प्लेयरमधून बाहेर काढली, परत डब्यांत ठेवली आणि डब्यावरून नज़र न हलवातां हळू-हळू म्हटलं:

“सोवियत बॉक्स-ऑफ़िसमधे ही फिल्म दोन तासांपेक्षा थोडीशी जास्त होती. पण, माझ्याकडे – पूर्ण , ओरिजिनल फ़िल्म आहे. तीन तास आणि चाळीस मिनिटांची.”

“कठीण काम आहे,” नास्त्या म्हणाली.

“कठीण,” मी म्हटलं आणि टेबलवार ताल देऊं लागलो.

“सिर्योग,” नास्त्याने भुवया उंचावल्या, “तुला हे सगळं फ़नी नाही वाटंत? बघ, कसा आहे तो, बुढ्ढ्या खुंटासारखा, पण चालला आहे, चालला आहे, स्वतःसाठी मुलगी शोधतोय! आणि जेव्हां सगळे त्याला काढून टाकतात, तेव्हां बसल्या-बसल्या आपल्या बाहुल्याजवंळ फिर्याद करतो!”

“नाही,” मी म्हटलं, “मला ह्यांत काहीच फनी वाटंत नाही.”

“ नुसतं पांचट!” नास्त्याने म्हटले. “चल, त्यापेक्षां, मी काही म्यूज़िकच लावते.”

मी टेबलवरून लाइटर उचलला, क्लिक केला आणि त्याच्या ज्वाळेकडे पहात राहिलो.

“म्यूज़िक तर तुला केव्हांही ऐकता येईल, पण मेरा नाम जोकर” ही फिल्म तुला जगांतला कोणतांच तरूण नाही दाखवणार.”

“थैन्क्स गॉड,” नास्त्या खुद्कन हसली.

त्यानंतर आम्ही कधीच नाही भेटलो.

जातां-जातां नास्त्याने ठामपणे सांगितले कि पहिले मी तिला फोन केला पाहिजे. पण मी फोन नाही केला. काही दिवसांपूर्वी मला आन्या भेटली. मी तिला मेरा नाम जोकरनाही दाखवणार, तिला मी श्री 420दाखवेन, त्यांत राजकपूर खूप तरूण आहे, आणि त्यांतले गाणे पण मस्त आहेत.

 

 

ते सोनेरी दिवस...  

ही त्या जुन्या काळांतली गोष्ट आहे, जेव्हां टी.वी. वर नुकतीच फ़ैन्टेसी फिल्म “भविष्य काळांतून आलेले पाहुणेदाखवण्यांत आली होती आणि सगळी मुलं स्पेस-पाइरेट्स आणि रोबो वेर्तेरचा खेळ खेळायची. मुलांना फिल्मच्या हीरोइन एलिस सिलेज़्न्योवाशी प्रेमंच झाले होते आणि मुलींना – फिल्मच्या मुख्य हीरो कोल्या गेरासीमोवशी... 

वोवेत्स मला नऊमज़ली बिल्डिंगची वेल्क्रो नाहीं काढूं देत, आणि त्याला वाटतं की ज़र मी वेल्क्रो काढून टाकीन तर त्याला हिवाळ्यांत थण्डी वाज़ेल. पण मी तर फार पूर्वीपासूनच वेल्क्रोला हात देखील लावंत नाही आणि वोवेत्स माझा मित्र आहे.

काही दिवसांपूर्वी आम्ही बेंचवर बसलो होतो, आणि तो म्हणंत होता:

“कळंत नाहीये की मला मॉस्कोला जायला पाहिजे किंवा नाही.”

“तुला कशाला जायचं आहे मॉस्कोला?” मी विचारतो. वोवेत्स आपल्या पैन्टच्या फाटक्या खिशांतून अनेक वेळां दुरुस्त केलेला बटवा काढतो, ज्यांत कद्धी एकही पैसा नसतो, आणि मला पॉलिथीनच्या मागे घुसवलेला एक छोटा सा फोटो दाखवतो.

“हिच्याकडे,” तो म्हणतो.

मला एक ओळखीचा चेहरा दिसतो, पण लक्षांत येत नाही की ही कोण आहे.

“कोण आहे ही?” मी विचारतो.

पण वोवेत्स माझ्याकडे अश्याकाही नजरेने बघतो, की मला लगेच आठवतं.

“-आ-आ! हिनेच तर भविष्य काळांतून आलेले पाहुणेमधे एलिसचा रोल केला होता! तू, काय, तिला ओळखतोस?! असं वाटतं, की चांगलीच आहे, वोवेत्स!”    

“माझी गर्ल फ्रेण्ड आहे,” वोवेत्स गंभीरतेनं सांगतो.

“ओह, नो, असं असूंच शकत नाही!”

आश्चर्यामुळे मी हळू-हळू गवतावर लैण्ड करायला लागतो. एलिस – वोवेत्सची गर्ल फ्रेण्ड!

“तू तिला कसा काय भेटलास?” मी विचारतो.

“मी नाही, ती मला भेटली. मॉस्कोत, फेस्टिवलमधे. ती माझ्याजवंळ आली आणि – बस, आम्ही एकमेकांची ओळख करून घेतली.”

मला वोवेत्सचा इतका हेवा वाटायला लागला! पण मला सुद्धां एलिस खूपंच आवडते!

 “आणि तू,” मी म्हणतो, “अजूनसुद्धां विचारंच करतोय, की तुला जायला पाहिजे किंवा नाही?!”

“हो, माहित आहे.” वोवेत्सने बटवा परत खिशांत ठेवला. “कदाचित्, ती स्वतःच येईल, बस, मला येवढंच नाही माहीत की केव्हां येईल...मला भेटायची खूप इच्छा आहे तिला.”

घरी आल्यावर मी आजीला सगळी माहिती देतो, की फिल्म भविष्यांतून आलेले पाहुणेह्या फिल्मच्या एलिसचे नऊ मजली बिल्डिंगच्या वोवेत्सशी प्रेम झाले आहे आणि ती लवकरंच त्याच्याकडे येणार आहे!

“त्या वोवेत्सशी,” आजीने विचारलं, “ज्याचे ओठ जाडे-जाडे आहेत?”

“आता इथे जाड्या ओठांचं काय काम आहे!” मी विचारतो. त्याने मला आत्तांच एलिसचा फोटो दाखवला आहे!”

पण आजी हसायलांच लागली:

 

“बस, येवढंच उरलं होतं! एलिस आमच्या जाड्या-जाड्या ओठांच्या वोवेत्सला मिठी मारेल! तिला दुसरं कोणी नाही भेटलं!”

हसूं दे, हसूं दे’, मी विचार करतो. पण एलिस नक्कीच येईल वोवेत्सला भेटायला! तसं, म्हणजे, मला सुद्धां हेवा वाटंत होता. वोवेत्सच्या जोड्यांना लेसेस देखील नसतांत. ते कोणच्या तरी ताराने बांधलेले असतात. आणि एलिसला आठ भाषा येतात! ती प्लूटोवर सुद्धां जाऊन आलीयं. तिने स्पूत्निक लांच केलेलं आहे, जे सगळ्यां आकाशगंगांमधे उडतं आहे आणि पृथ्वीवर सिग्नल्स पाठवतंय.

 

मी आणि वोवेत्स फोटो प्रिन्ट करतो...

सन् 1988मधे मी फोटोग्राफी शिकलो. ही, म्हणजे, फार कमालीची गोष्ट होती, पण ह्यांत काही अडचणी होत्या. मुख्य म्हणजे, त्या काळांत असे फोटो स्टूडियोज़ नव्हते, जे फ्लैशच्या मदतीने एका सेकंदांत फोटो प्रिन्ट करून देतील, दूर-दूर पर्यंत नव्हते. फोटोग्राफ़ बनविण्यासाठी गरज होती फोटो-एनलार्जरची, लाल लैम्पची, रील मधली फिल्म बघण्यासाठी एका बेसिनची, फिक्सरची, डेवेलपरची, फोटोग्राफिक पेपर वगैरे वगैरेची...हे सगळं करण्यासाठी सर्वांत जास्त गरज होती – टाइमची. एनलार्जर सोडून माझ्याकडे बाकी सगळं होतं, पण एनलार्जरशिवाय कामंच चालणार नव्हतं, आणि तो खूप महागडासुद्धां होता. मम्मा-पापाने प्रॉमिस केलं होतं की मला एनलार्जर घेऊन देतील, पण न्यू-इयरला, आणि आत्तांतर फक्त मे महिना चालू होता. वाट बघणं शक्य नव्हतं, आणि जर माझा मित्र वोवेत्स नसतां तर काहीही होऊं शकलं नसतं.

“चल, माझ्या घरी फोटो प्रिन्ट करूं कां?” एकदा वोवेत्सने मला म्हटलं. “माझ्याकडे सगळं आहे आणि डेवेलपर सुद्धां आहे...”

सुरुवातीला माझा वोवेत्सच्या बोलण्यावर बिल्कुल विश्वास नाही बसला. चला, तुम्हांला सांगूनंच टाकतो की माझा हा मित्र खूपंच विचित्र आहे. म्हणजे असं, की काही दिवसांपूर्वी तो म्हणाला होता, की भविष्यातून आलेले पाहुणेची एलिस – त्याची गर्ल फ्रेन्ड आहे. आणि हिवाळ्याच्या दिवसांत त्याने मला आपल्या नऊ मज़ली बिल्डिंगचे वेल्क्रो काढायला मनाही केली होती, कारण की वेल्क्रो नसेल तर त्याला हिवाळ्यांत खूप थण्डी वाजेल, कारण की तो पहिल्या मज़ल्यावर राहतो आणि वेल्क्रोचा बरांचसा भाग त्याच्याच बाल्कनीखाली आहे. आणि असंही, की वोवेत्स आपले जोडे लेसेसच्या ऐवजी निळ्या ताराने बांधतो. वोवेत्सने कित्येकदां असं पण सांगितलं होतं की शहराच्या एका शाळेत कुंग-फू शिकवतो, तो कुंग-फूचा पोचलेला मास्टर आहे, कारण अगदी लहानपणी तो चीनमधे शिकंत होता, जेव्हां, म्हणजे, अगदी खूपच लहान होता. ह्या गोष्टीने पण मनांत शंका यायची, कारण, एकदा आमच्या कन्स्ट्रक्शन साइटवर मोठी, बदमाश मुलं एकदम आमच्या समोर आली, मी काही मास्टर-बिस्टर नसतांना देखील त्यांच्याशी फाइट करणार होतो, पण वोवेत्स पळून गेला. परिस्थितिकडे बघून तो पट्कन तिथून पसार झाला, आपले तळपाय दाखवंत, ज्याने त्याचे अवाढव्य शरीर थलथल हलंत होतं.

म्हणजेच, विचित्रंच होता माझा मित्र, त्याच्याबद्दल काहीही सांगणं शक्य नाही...त्याच्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं, आणि मी विचारलं:

“ तू फेकत तर नाहीये ना? खरंच डेवेलपर आहे तुझ्याकडे?”

“आई शप्पथ. प्रॉमिस.”

“तर, फोटो केव्हां प्रिन्ट करायचे?”                      

 “बघ, वाटलं तर उद्या सकाळी ये माझ्याकडे, नऊ वाजतां, रील्स, फोटो-पेपर घेऊन ये, आणि बस, प्रिन्ट करून टाकूं.”

“ओके, नक्की!” मला खूप आनंद झाला आणि सकाळी-सकाळी मी निघालो वोवेत्सकडे, रील्स आणि फोटो-पेपर घेऊन.          

तो शेजारच्या नऊमजली बिल्डिंगच्या दोन नं.च्या विंगच्या पहिल्या मजल्यावर राह्यचा, आणि मी हसंत-नाचंत त्याच्याकडे चाललो होतो – कारण की माझ्या साधारण कैमरा – स्मेनाने काढलेले सगळे फोटो आता खरोखरंचे फोटोज़ होणार होते.

“ये,” वोवेत्सने दार उघडलं. “फक्त येवढं कर, की कोणच्याही गोष्टीवर हैराण नको होऊ आणि वेडे-वाकडे प्रश्न नको विचारूं. प्रिन्टिंगचे काम बाथरूममधे करू. लाल लैम्प आहे, तर तू जराही काळजी करूं नकोस, सगळं व्यवस्थित होईल.”

पण कोणच्याही गोष्टीवर हैराण न होणं फार कठीण होतं. असं नव्हतं की वोवेत्सच्या क्वार्टरमधे सगळं अव्यवस्थित होतं, फक्त सगळ्या वस्तु इतक्या अस्तव्यस्त होत्या की असं वाटंत होतं जणु काही प्रत्येक खोलीत, कॉरीडोरमधे आणि किचनमधे अनेक शहीद-मृतात्मा घुसल्या आहेत. पलंगांना आणि दिवाणांना पायंच नव्हते. आणि प्रत्येक खोलीत (एकूण दोनंच खोल्या होत्या) ह्या आनंदी वातावरणांत एक-एक काळं मांजर बसलं होतं.

“दोघांच्या अंगावर पिस्सू आहे,” वोवेत्सने आधीच सांगून टाकलं.

 खूपंच विचित्र वाटंत होतं. माझं मन मला सांगत होतं की ह्या क्वार्टरमधे कांहीही होऊं शकतं. आजूबाजूची प्रत्येक वस्तु जशी एका धोकादायक उत्तेजनेने काठोकाठ भरलेली वाटंत होती. थोडा वेळ मी विसरूनंच गेलो की मी इथे कशासाठी आलोय. “काही खायचंय?” वोवेत्सने विचारलं.

“नाहीं!” मी जवळ-जवळ किंचाळलोच. त्याच्या घरी कशा प्रकारचे जेवण असेल, ते फक्त देवालांच माहीत, आणि तसे पण एक सुद्धा माणूस ह्या घरांत काही खाण्या-पिण्याची रिस्क नाही घेणार. “नाहीं,” मी पुन्हां सांगितले, “चल, फोटोग्राफ्स प्रिन्ट करूंया.”

“चल, चल,” माहीत नाही वोवेत्स कशाला हसला.                                      

“तू इथल्या घाणीकडे लक्ष नको देऊं, माझ्याकडे नेहमीच असं असतं. लहान-सहान गोष्टींवर मी आपलं डोकं नाही पिकवंत.

आता मला आठवलं : वोवेत्सने एकदा मला सांगितलं होतं की, जणु त्याच्याकडे बैंकेत पंधरा हज़ार पडले आहेत, आणि मी विचारले:

“तुझ्याकडे तर बैंकेत पंधरा हज़ार पडलेत नं, पण सगळे पलंग तर बिन पायांचे आहेत?”

असंच असलं पाहिजे,” वोवेत्सने गूढपणे उत्तर दिलं. “तू काय पलंग बघायला आला आहेस?”

मला वाटलं की तो बरोबर बोलतो आहे आणि खूप झालं आजूबाजूच्या वस्तूंवर लक्ष देणं, आता मला कामाकडे लक्ष द्यायला पाहिजे.

पण हे काम झालं कसं – ही एक वेगळीच गोष्ट आहे!

जेव्हां आम्हीं बाथरूममधे गेलो आणि काही बेसिन्स आणि केरसुण्यांच्यामधून, ज्या वोवेत्सला खूप प्रिय होत्या, लाल बल्ब लावून बाकीचे बल्ब्स बंद करून टाकले, तेव्हां माझा मित्रं एकदम खूप खूष झाला. असं साधारणपणे होत नव्हतं आणि म्हणूनंच, हे चांगलं लक्षण नव्हतं.

“कुंग-फू दाखवूं?” डोळे मिचकावंत वोवेत्सने विचारलं.

“प्लीज़, पुढच्या वेळेस?” मी सतर्कतेने म्हटलं, तसं मला माहीत होतं की मी काहीही म्हटलं तरी कुंग-फू नक्कीच होईल. वोवेत्स स्टैण्डवर उभा राहिला, टबजवळ पडलेल्या एका रिकाम्या बेसिनला उलटं ठेवून (वोवेत्सच्या क्वार्टरमधे कमोड आणि बाथ एकत्रं आहेत).

“वोवेत्स, गरंज नाहींये!” मी ओरडलो.

“मी-ई-ई!!!” वोवेत्सने एका बाजूला लात घुमवली, आणि फिक्सर्ससकट बेसिन बाथरूमच्या फरशीवर लोळूं लागला.

“ईडियट!” मी गरजलो. “हे काय केलंस तू?!”

वोवेत्स गंभीर झाला.

“किंचाळू नकोस,” त्याने शांतपणे म्हटले आणि थोडं थांबून, जेव्हां त्याच्या चेहरा किंचित कसानुसा झाला, तो पुढे म्हणाला: “तू आयुष्यांत कितीदां फोटो प्रिन्ट केले आहेत?”

“ही दुसरी वेळ आहे,” मी प्रामाणिकपणे स्वीकार केलं.

“म्हणूनंच. आणि मी पाच हजार वेळां करून चुकलो आहे,” वोवेत्सने फुशारकी मारंत म्हटले. “असं होतं कधी-कधी, कि बाय-चान्स फिक्सर पडतो. तो इतका ज़रूरी नाहीये. डेवेलपर तर आहे नं!

तरी पण मला राग येतंच होता, कारण मला आता वाईट वाटंत होतं, की मी वोवेत्सच्या घरी कां आलो, पण मग लौकरंच आम्ही सरळ कामाला लागलो.

सात मिनिटं तर सर्व काही व्यवस्थित चाललं. पाच फोटोज़ जवळ-जवळ तयार होते, फक्त त्यांना वाळवणं शिल्लक होतं, पण मग असं काही घडलं, जे मला सांगितलंच पाहिजे. वोवेत्सने फरशीवरून धुळीने माखलेली एक वस्तु उचलली आणि किंचाळला: “जाऊं नाही देणार! तुला कसंही करून मारूनंच टाकीन! एक पण रास्कल येथून जाऊं शकणार नाही!” तो कोणत्यातरी घाणीवरून धूळ हटवण्यासाठी बाथरूमच्या फरशीवर पाणी ओतूं लागला.

“तू काय करतोयंस?” मी अगदी रडवेला झालो.

“झुरंळं, तुला दिसंत नाहीये कां?! झु-ऊ-र-अ-ळ!”

आणि तो धूळ झाडंत राहिला.

मी तीरासारखा बाथरूममधून बाहेर पळालो, कारण मी अगदी पस्त झालो होतो. तिथे एक मिनिट आरडा-ओरडा चालू होता, मग वोवेत्स प्रकट झाला आणि जणु काही झालंच नाही, अश्या थाटांत म्हणाला:

“मास्क घालून फोटोग्राफ्स प्रिन्ट करूं. हे लिक्विड धोकादायक आहे.”

मी, काय माहीत कसा, तयार झालो. वोवेत्सने खोलीतूंन दोन हिरवे मास्क्स खेचंत आणले आणि आम्ही पुन्हां बाथरूममधे घुसलो. मास्क्स घातल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत होता, पण अजूनही फोटो प्रिन्ट करायची इच्छा शिल्लक होती.

बोलणंसुद्धा अशक्य होतं. प्रचण्ड दमट होती. पण तरीही काही नवीन फोटोग्राफ़्स प्रिन्ट झाले होते...

मेचा महिना, बाहेर ऊन आणि ऊब होती. मुलं सायकल चालवतायेत. निकलाएव स्ट्रीटवर जुन्या नऊमजली इमारतीच्या घाणेरड्या क्वार्टरमधे, पहिल्या मजल्यावर, बाथरूममधे, लाल लाइटच्या प्रकाशांत आणि डब्यांच्या, बेसिन्सच्या, केरसुण्यांच्या  आणि मॉपर्सच्या गराड्यांत, दाटीने आणि खूपंच त्रास सहन करंत, मास्क घालून दोन मुलं बसली आहेत आणि फोटोग्राफ़्स प्रिन्ट करताहेत. मूर्खपणा आहे. असं तर चार्म्सच्या गोष्टींत सुद्धां नसतं...

“मास्क काढून टाक, मी गम्मत करंत होतो,” कावेबाजपणाने आणि निर्ल्लजतेने वोवेत्स हसला, जेव्हां त्याला कळलं की माझा दम घुटतोय.

गम्मत करंत होतो ह्याचा अर्थ काय?” मी मास्क काढून विचारलं.

“अरे, मी साधंच पाणी ओतलं होतं, फक्त बरेच दिवसांत कोणाची फिरकी घेतली नव्हती. रविवारी ये, छान प्रिन्ट्स काढूं. मम्मा-पापा घरी असतील, त्यांच्यासमोर मी कुंग-फू, बिंग-फू नाही दाखवंत आणि मास्क आणण्याची पण मला परवानगी नाहीये, त्यांची रजिस्टरमधे नोंद आहे.”

“डेविल!” मी किंचाळलो. “आणि तुझं नाव काय बाइ चान्स पागलांच्या डॉक्टरच्या रजिस्टरमधे नाही नोंदवलंय?!!”

“प्लीज़, गुण्डागर्दी नाहीं! तू पाहुणा आहेस म्हणून मी तुला उत्तर देऊं शकंत नाही, पण जर एखादी गोष्ट आवडली नसेल तर पळ इथून.”

दात घट्ट मिटंत आणि काहीही न बोलता, मी आपल्या रील्स उचलल्या आणि तीस सेकंदांत बाहेर निघून आलो.

खूप वैताग आला होता. थैंक्स गॉड, संध्याकाळी पापा ऑफ़िसमधून परत आले, तेव्हां आम्हीं जीन-पॉल बेल्मोन्दोची फिल्म अलोनबघायला गेलो. जीन-पॉल बेल्मोन्दो आम्हांला खूप आवडतो. तेव्हां मी ठरवलं की आता फोटोग्राफ्स सुद्धां एकट्यानेच प्रिन्ट करायचे. आणि वोवेत्स – त्याला मी ह्यापुढे कधीच भेटणार नाही...

एका आठवड्यानंतर मी पुन्हां वोवेत्सशी कम्पाऊण्डमधे बोलूं लागलो आणि त्याने पुन्हां सिद्ध करून दाखवलं की तो कुंग-फू मास्टर आहे. असेल कदाचित. कदाचित कुँग-फूचे सगळेच मास्टर्स मास्क घालूनंच फोटोग्राफ्स प्रिन्ट करंत असावेत आणि खोटं बोलत असतील की त्यांची फिल्म-स्टार्सशी दोस्ती आहे?’ माझ्या डोक्यांत विचार आला...

तर हे अशी होती ही गोष्ट. ही कॉमेडी होती की ट्रेजेडी? तुम्हांला काय वाटतंय?

खरं सांगायचं म्हणजे मलाही कळणार नाही!

 

 

 

मी परामनोवैज्ञानिक हीलर कसा झालो...  

मी पाचवीत असताना, टी.वी.वर जवळ-जवळ रोज सर्व प्रकारचे मैजिशियन्स, जादूगार आणि परामनोवैज्ञानिक हीलर्स दाखवायचे. ते कोणत्याही प्रकारचा आजार बरा करायचे. फक्त हात हलवायचे, किंवा शब्दांने काही सूचना द्यायचे, आणी तुमचा आजार एकदम गायब! तुमचा त्यांच्यावर विश्वास नसला तरीही. विशेषकरून दोन हीलर्सनेहमी दाखवायचे – कश्पीरोव्स्की आणि चुमाक. चुमाकचे केस पांढरे होते आणि त्याचा प्रोग्राम सकाळी असायचा, तो फक्त हवेंत हात हलवायचा ( क्रीम चार्जकरायचा, पाणी – म्हणजे असं की जे पण काही तुम्हीं टी.वी.जवळ ठेवलं असेल, ते चार्जकरायचा), आणि कश्पीरोव्स्की संध्याकाळी  हीलकरायचा, त्याचे केस काळे होते आणि तो बोलून सूचना द्यायचा.

मी त्यांना बघितलं आणि माझ्या मनांत विचार आला की मी त्यांच्यासारखा हीलरकां नाही होऊं शकंत? ते सुद्धां कधी काली शाळेतंच शिकायचे आणि आपल्या योग्यतेबद्दल तेव्हां त्यांना काहीही माहीत नव्हतं. आमच्या शाळेंत दर शुक्रवारी क्लास-एक्टिविटीहोत असे. मी ठरवलं की ह्या शुक्रवारी मी शोकरीन. माशा मलातिलवाला पण कळेल की मी काही साधारण मुलगा नाहीये, खरोखरचा हीलरआहे. माशा मलातिलवा आमच्या क्लासमधे सगळ्यांत छान मुलगी आहे, पण, सध्यां, ह्याबद्दल काहीच नाही सांगणार.  

मी आपल्या क्लास-टीचरकडे, ल्युदमिला मिखाइलव्नाकडे गेलो आणि तिला सांगितलं की अशी-अशी गोष्ट आहे, मी शुक्रवारी एक्टिविटी-टाइममधे हीलिंग शो करूं शकतो कां? आधी तर ती हसली, मग तिने विचारलं की हा हीलिंगचा गुण माझ्यांत पूर्वीपासूनच आहे कां, आणि मग तिने परवानगी दिली. मला, देवा शप्पथ, खोटं बोलावं लागलं, की मी साधारण सहा महिन्यापासून पाणी चार्जकरतोय आणि मी माझ्या काकांचा अल्सर बरा केला होता.

गुरूवारी, जेव्हां शोसाठी फक्त एकंच दिवस शिल्लक राहिला होता, मी विचार केला की थोडीशी रिहर्सलकरावी. मी कैसेट-प्लेयर समोर बसलो आणि, अशी कल्पना करूं लागलो की माझ्या शरीरातून स्ट्राँग-पॉज़िटिव एनर्जी निघते आहे. मी आपल्यासमोर हातांना हलवंत म्हणूं लागलो:

“डोळे बंद करा,” मी म्हटलं. “तुम्हाला एक मोट्ठी पांढरी खोली दिसतेय, जी प्रकाशाने तुडुम्ब भरली आहे. तुम्हीं खोलीत आहांत. तुम्हीं खोलीच्या मधोमध आहे. तुम्ही बाजूला उभे राहून स्वतःला बघताय, तुम्हीं जणु काचेचे बनले आहात. पांढरा, भारहीन प्रकाश तुमच्या शरीराला ऊब देत आहे. मंद-मंद वारं वाहतंय. शरीराच्या ज्या भागांत जडपणा आहे, तेथे जास्त प्रकाश एकत्रित होत आहे आणि जडपणा निघून जातोय. तुम्हांला बरं वाटतंय. तुम्हांला ऊब जाणवतेय.”

मी हातांना आणखी थोडा ताण दिला, त्यांना झटकलं आणि म्हणंत राहिलो:

“वारा मंद होत आहे. तुम्हांला मुश्किलीने त्याची जाणीव होतेय. तुम्हांला ह्या स्थितीत शक्य असेल तितका जास्त वेळ रहावसं वाटतंय. पण प्रकाश विखरूं लागतोय. तो लुप्त होतो, आणि स्वतःबरोबर तुमचे सगळे कष्ट घेऊन जातोय. तुमचं शरीर शांत आहे आणि स्वच्छ आहे...”

मी जवळ-जवळ अर्धा तास बोलतंच होतो, दारावरची बेल वाजेपर्यंत. शेजारचा मक्सिम मला बोलवायला आला होता. आम्हांला हिंडायला जायचं होतं, पण मी म्हटलं की आत्ता मी येऊं शकत नाही, मी त्याला खेचंत माझ्या खोलीत आणलं, त्याला समजावलं की मी काय करतोय, आणि त्याच्यासमोर शोचा टेप रेकॉर्डर ठेवला.

मक्सिमने एखाद्या आज्ञाधारक मुलाप्रमाणे डोळे मिटले, न हलतां पूर्ण कैसेट ऐकली आणि म्हणाला:

“व्वा, तू तर कश्-पी-र आहेस! त्याच्यापेक्षांसुद्धा जास्त स्मार्ट आहे! सुप्पर! अरे, मी तुझ्याकडे आलो तेव्हां माझं डोकं दुखंत होतं, पण आता – जणु काही हाथ फिरवून सगळं दुःख काढून टाकलंय!”

 

मी विचार केला, चला, सगळं ठीक आहे, म्हणजे, उद्या सगळं व्यवस्थित होईल.

शुक्रवारी सगळ्या क्लासेसमधे मी फक्त एक्टिविटी-टाइमबद्दलंच विचार करंत होतो. माझ्या वर्गमित्रांनी पहिला तास सुरू होण्यापूर्वीच पाण्याचे डबे आणि क्रीमच्या ट्यूब्स दाखवल्या, ज्यांना चार्ज करायचं होतं, आणि, कालची रिहर्सल जरी चांगली झाली असली, तरी मी खूप वैतागलेलो होतो. जेव्हां एक्टिविटी-टाइम सुरू झाला आणि ल्युदमिला मिखाइलव्नाने टीचरच्या टेबलामागची जागा मला दिली, तेव्हां त्या डब्यांच्या आणि क्रीमच्या ट्यूब्सच्या मागून मी जवळ-जवळ दिसतंच नव्हतो आणि माझं हृदय इतक्या जोराने धडधडंत होतं, जणु काही त्याला वेड लागलंय.                 

“डोळे बंद करा,” मी सुरुवात केली. “एक पांढरी मोट्ठी खोली आहे, तुम्हीं त्या खोलीत आहे. तुम्हीं जणु काचेचे आहात. प्लीज़, शांतता ठेवा...”

पहिली गोष्ट, म्हणजे कोणालांच डोळे बंद करायचे नव्हते, आणि दुसरी, मी कितीही जीव तोडून सांगत होतो, तरी त्यांच्या हसण्याने माझ्यातल्या एनर्जीच्या प्रवाहांत अडथळा येत होता, सगळे हसतंच होते आणि मला चिडवंत होते. मी त्या परिस्थितीतही शोकरंत होते. जर सिर्योझा बोंदारेवने गडबड नसती केली, तर सगळं नीट झालं असतं, पण जेव्हां मी म्हटलं, की तुमचं शरीर शांत आणि स्वच्छ आहे, आजार काळ्या पदार्थाच्या रूपांत त्याला नेहमीसाठी सोडून जात आहे ’, तेव्हां सिर्योझा, जो साधारणपणे एक शांत स्वभावाचा मुलगा आहे, इतक्या जोराने खो-खो करंत हसूं लागला की शाळेची बिल्डिंग बस पडायलांच झाली. सगळे त्याच्याबरोबर हसूं लागले. इतक्या जोराने हसू लागले की खिडक्यांचा काचा थरथरू लागल्या. त्यांना वाटंत होतं की जगांत माझ्या शोपेक्षा जास्त हास्यास्पद आणखी काहीच  नाहीये...ल्युदमिला मिखाइलव्ना क्लासच्या दारांत उभी राहून माझ्याकडे प्रेमाने बघंत होती, शेवटी मी सुद्धां हसू लागलो, पण मग मी घोषणा केली, की काहीही  झालं असलं, तरी पाणी आणि क्रीम्स मात्र चार्जझालेले आहेत.

म्हणजे मला माहीत नाहीये की मी हीलरआहे किंवा नाही. माझा शोजरी फ्लॉप झाला असला, तरी सोमवारी माशा मलोतिलवाने सांगितलं की तिची तब्येत आता पहिल्यापेक्षां बरी आहे.

                  

मी फुटबॉल मैच बघतो...     

 

फुटबॉल मैच चालू होता. चैनल 1 वर, नेहमीप्रमाणे, संध्याकाळी, प्राइम टाइम मधे. आणि काय! स्पार्ताक आणि सेस्का ( सेस्का- सेंट्रल स्पोर्ट्स क्लब ऑफ आर्मी – रशियाचा फार जुना क्लब – अनु.) ह्यांच्यामधे सामना होणार होता! आमच्या रशियन चैम्पियनशिपचा सर्वांत इम्पॉर्टेन्ट मैच!

“लुझ्निकी” स्टेडियम गच्च भरलं होतं.

मैच सुरूं होण्यापूर्वी जवळ-जवळ अर्धा तास वेगवेगळे इंटरव्यूज़ दाखवंत होते, जर्नलिस्ट्स मैचचा परिणाम काय होईल ह्याचा अंदाज लावत होते आणि टीम्सबद्दल चर्चा करंत होते – म्हणजे, मूड एकदम फुटबॉल-फ़ेस्टिवलसारखा होता.

मी खूप लक्ष देऊन टेलिकास्ट बघंत होतो आणि मैच सुरू होई पर्यंत मी ठरवूं शकलो नव्हतो की मी कुणाच फैनहोईन. पण मग, मी स्पार्ताकची टीम निवडली, कारण मी स्पार्ताकच्या एका जुन्या, प्रसिद्ध खेळाडू – फ़्योदर चेरेन्कोवला ओळखंत होतो. आणि मला लगेच आठवलं की फ़्योदर कित्ती वन्डरफुल माणूस आहे, इतका छान कोणीच माणूस असूं शकंत नाही, आणि मला वाटलं की स्पार्ताकचा फैन होणं माझं कर्तव्यंच आहे! आणि शिवाय, तो देशभरांत अत्यंत प्रसिद्ध आहे.

कॉमेन्टेटरने टी.वी.च्या दर्शकांना हैलोम्हटलं, आणि खेळ सुरू झाला. बरोब्बर तीन मिनिटांवर स्पार्ताकच्या स्ट्राइकरने सेस्काच्या गोल-कीपर अकीन्फ़ेयेवला गंभीर दुखापत केली. अकीन्फ़ेयेव गवतावर पडला होता आणि पीडेमुळे तडफडंत होता. स्ट्रेचर आणले गेले. सेस्काच्या गोल-कीपरला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करूं लागले. पण स्पार्ताकचा स्ट्राइकर जवळंच उभा राहून नुसतां बघंत होता, त्याला अकीन्फ़ेयेवबद्दल येवढीशीसुद्धां दया वाटंत नव्हती. उलट, तो हसण्याचा बेतातंच होता!

मी पण हाच विचार करंत होतो. जर स्पार्ताकचे स्ट्राइकर्स इतके दुष्ट आहेत, तर मी स्पार्ताकचा फ़ैन नाहीं होणार. बिचारा गोल कीपर इतका तळमळतो आहे, त्याला इतकी गंभीर दुखापत केली आणि ह्याच्या मनांत जरासुद्धां सहानुभूति नाहींये!

मी सेस्काचांच फैन होईन.

पण तेवढ्यांत आणखी एक नाटक झाले. टी.वी.वर ज़ख़्मी अकीन्फेयेवला स्ट्रेचर वर बाहेर घेऊन जातानाचे हाइलाइट्स दाखवत होते, आणि तो कसा ओरडंत होता हे ऐकायला सुद्धां मजा येत होती. तो ओरडून-ओरडून स्पार्ताकच्या स्ट्राइकरला इतक्या भयानक शिव्या देत होता, की त्या मी इथे लिहूं देखील शकत नाही. पुस्तकांमधे असले शब्द छापंत नाही. सेस्काचा ज़ख्मी गोल कीपर बरांच वेळ, मोठ्याने ओरडून आणि खूप प्रयत्न करून सांगत होता की तो, म्हणजे स्ट्राइकर, ज्याने त्याला इजा केली होती, खरं म्हणजे कोण आहे, आणि त्याचे सगळे नातेवाईक, मित्र आणि ओळखीचे लोकं कोण आहेत आणि त्याने धमकी दिली की सर्वांना जिवंतच जमीनीत पुरून टाकेल!

नाही, मी विचार केला, असल्या टीमचा फैन मी नाही होणार, जिचा गोल कीपर इतका दुष्ट आहे. मी स्पार्ताकचांच फ़ैन राहीन. आणि चेरेन्कोव मस्त माणूस आहे आणि, तसं पण, कोणी इतक्या घाणेरड्या शिव्या देऊंच कसा शकतो!

तेवढ्यांत स्पार्ताकने गोल केला. वेल्लितन आणि दुसरे स्पार्ताकियन्स आनंदाने ग्राऊण्डच्या बाउन्ड्रीजवळ डान्स करूं लागले. आह, कित्ती घाणेरडेपणाने ते डान्स करंत होते! फक्त भयानक आरडा-ओरड! खूपंच कृत्रिम उत्साहाने.

त्यांचा आनंद लवकरंच वेडेपणापर्यंत पोहोचला. त्यांनी आपले टी-शर्ट्स काढून फेकले, शॉर्ट्स खाली सरकवले – म्हणजे, काहीतरी खूपंच भयानक घडंत होतं. स्पार्ताकच्या फैन्सच्या गैलरीला सुद्धां वेड लागलं होतं, आणि मग त्यांनी मशाली पेटवल्या, त्यांच्यातून इतका धूर निघूं लागला की ग्राऊण्ड सुद्धां दिसंत नव्हतं. कॉमेन्टेटरने हेच सांगितलं : “ग्राऊण्ड नीट दिसंत नाहीये, कॉमेन्ट्री करणं खूप कठीण आहे.”

मग स्पार्ताकियन्स सेस्काच्या फैन्सच्या गैलरीजवळ गेले आणि तोंडं वेडेवाकडे करून चिडवायला लागले. असं होत राहिलं.

नाहीं,’ मी विचार केला, मी सेस्काचांच फैन राहीन, तेच जास्त चांगलं आहे. तसं पण अकीन्फ़ेयेव ज़ख़्मी झाला होता, आणि सेस्काच्या खेळाडूंनी आपले शॉर्ट्स खाली नव्हते सरकवले.

पण वीस मिनिटांतच वेगळंच झालं. खरं सांगायचं तर पुष्कळश्या फुटबॉलप्रेमींच्या मते काही विशेष घडलंच नाही, पण मी जे काही बघितलं, त्याचा माझ्यावर खूपंच परिणाम झाला.

सेस्काच्या चीफ-ट्रेनरला टी.वी.वर दाखवंत होते. त्याला चांगलंच माहीत होतं की त्याला टी.वी.वर दाखवतांत आहेत, पण त्याने काही फरक नाही पडला, आणि त्याने सर्वांच्यासमोर मोठ्याने नाक शिंकरलं, ते पण थेट त्या सुंदरश्या आणि विशेष प्रयत्न करून बनवलेल्या ट्रेड मिलवर, जिच्यावर तो उभा होता. मला खूप राग आला. असं करतांत कां?! कमीत कमी रुमालंच काढला असता! पण, हा तर सरळ ट्रेड मिलवर! नाही, मी सेस्काचा फैन नाही होणार. स्पार्ताकचाच फैन राहीन. कमीत कमी त्यांचा ट्रेनर तरी स्वच्छ आहे...

मग सेस्काने सुद्धां एक गोल केला. आणि सेस्काच्या खेळाडूंनी खूपंच सभ्यतेने आपला विजय साजरा केला. त्यांनी, सांगायचं म्हणजे, आपले जर्सी-जैकेट्स नाही काढून फेकले. पण स्पार्ताकचे फैन्स, स्पष्ट आहे, की सेस्काच्या खेळाडूंवर चिडून आणखी जास्त मशाली पेटवूं लागले आणि वरून ग्राऊण्डवर टॉयलेट-पेपरचे रोल्स फेकूं लागले.

“आह, हे कित्ती घाणेरडं आहे,” कॉमेन्टेटरने कुरबुरंत म्हटलं, “’स्पार्ताकच्या फैन्सचं हे असलं वागणं! मित्रांनो, ग्राऊण्डवर टॉयलेट-पेपर फेकणं!”

वाद घालायचा प्रश्नंच नव्हता, मला कॉमेन्टेटरचं म्हणणं पूर्णपणे पटंत होतं! नाही, मी सेस्काचाच फैन होईन. त्यांचे फैन्स कमीत कमी टॉयलेट-पेपर्सतर ग्राऊण्डवर नाही फेकंत!

पण, दुसरीकडे, फ़्योदोर चेरेन्कोव – कित्ती चांगला माणूस आहे... आणि कदाचित स्पार्ताकच्या स्ट्राइकरला मैचच्या सुरुवातीला सेस्काच्या गोलकीपरला जखमी नव्हतं करायचं...तरी पण स्पार्ताकचाच फैन राहीन...

की सेस्काचा?

त्यानंतर सेस्काने आणखी एक गोल बनवला. स्पार्ताकने हा गोल लगेच उतरवून टाकला, आणि मैच 2:2च्या स्कोरने संपला.

थैन्क्स गॉड! चला, शेवटी एकदांचा संपला तरी! थैन्क्स, की नाक खाली नाही झालं. नाहीं तर मला ठरवतांच नसतं आलं की मला कोणाचा फैन व्हायला पाहिजे, आणि शेवटी दुःख व्हायला पाहिजे की आनंद झाला पाहिजे!

मैच संपल्याबरोबर मला न्यू क्वार्टर्सच्या तोल्या लूकोवने फोन केला. न्यू क्वार्टर्स हल्लीच बनवले आहेत, ट्रामच्या थांब्याच्या मागे.

“सेरी, तू कुणाचा फैनहोता?” त्याने विचारलं.

आणि तोल्यातर फुटबॉलचा इतका शौकीन आहे की जगांत त्याला फुटबॉलशिवाय दुसरं काही दिसतंच नाही. मोठा होऊन फुटबॉल प्लेयर व्हायचंय त्याला आणि तो स्पोर्ट्स-स्कूल स्मेनामधे शिकतोय.

“तोल्यान,” मी प्रामाणिकपणे सांगितलं, मला कळंत होतं की ह्याचा परिणाम काहीही होऊं शकतो, “प्लीज़, मला येवढं सांग की ते सगळे तिथे थुंकत कां होते, टॉयलेट-पेपर्स कशाला फेकंत होते, पैन्ट्स कां खाली सरकवंत होते? फुटबॉलच्या गेममधे असं सगळं होत असतं कां?

“काय म्हणतोयं!!!” तोल्या रागाने किंचाळला. “कित्ती उत्कृष्ट खेळ होता! हे थुंकणं कुठून आलं? तुझं डोकं तर नाही फिरलंय? आता मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. तुला फक्त बैले बघायला पाहिजे, फुटबॉल नाही!” आणि त्याने रिसीवर ठेवून दिला.

मी पण हाच विचार करतोय, की खरंच बैले पाहणं जास्त चांगल असेल. तिथे कोणी धूर तर नाही करणार. बैले, कदाचित, चांगली गोष्ट आहे. फक्त एकंच गोष्ट, जी मला त्यांत आवडंत नाही, ती अशी की सगळी मुलं घट्ट विजारी घालून उड्या मारतात. ते मला नाहीं आवडंत. आणि जोकर सुद्धा! त्यांना साधारण विजार घालतांच येत नाहीं!

 

माझं प्रेम...            

ही त्या उन्हांळ्याची गोष्ट आहे, जेव्हां मी आणि तान्या पद्गरदेत्स्काया कम्पाऊण्डमधे एकत्र हिंडायचो आणि तान्या मला सील-मासा (अस्ताव्यस्त, बोजड मुलाला सील-मासा म्हणून चिडवतांत- अनु.) म्हणायची, आणि हे बघून खूप हसायची की मला सील-माश्या सारखे असण्याबद्दल आश्चर्य वाटतं.

एका संध्याकाळी आम्हीं लग्न करायचं ठरवलं. हे तर स्पष्टंच होतं की आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण आम्हांला हे सुद्धां नक्की माहीत होतं की आमचे आई-वडील ह्या लग्नासाठी कधीच तयार होणार नाही. कारण असं आहे, की माझी मम्मा शहरातल्या एका इन्स्टीट्यूटमधे लिटरेचरची टीचर होती आणि म्हणून तान्याचे मम्मा-पापा तिला बुद्धिजीवीम्हणून शिव्या द्यायचे. ह्या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे – हे तर मला कळंत नव्हतं, पण मला येवढं नक्की माहीत होतं की तान्याचे आई-वडील माझ्या मम्माशी दोस्ती करण्याऐवजी स्वतःला गळफास लावून घेतील. माझे पापा पण तान्याच्या आई-वडिलांबद्दल अशा-अशा गोष्टी सांगायचे, ज्यांना साधारण पुस्तकांत लिहितां येत नाही, आणि कळंत नव्हतं की ते मम्माची बाजू घेताहेत, की त्यांनासुद्धां तान्याचे आई-वडील आवडंत नाहीं.

म्हणजे, आमच्या समोर फक्त एकंच मार्ग होता. घरांतून पळून जाण्याचा.

मला आमच्या बिल्डिंगच्या मागच्या बागेत एक गुप्त ठिकाण माहीत होतं, जो पर्यंत हिवाळा सुरू नाही होत, आम्हीं तिथे राहूं शकत होतो. पुढचं पुढे बघता येईल.

“तर, तान्,” मी आपल्या वाग्दत्त वधूला विचारलं, “तू माझ्याबरोबर नेहमीसाठी राहायला तयार आहेस कां – सुखांतही आणि दुःखांतही?”      

ठीक आहे, काहींच प्रॉब्लेम नाहीं,” तान्या पदगरदेत्स्कायाने गंभीरपणे उत्तर दिलं.

आणि आम्हीं निघालो.

आम्हीं त्या गुप्त ठिकाणावर पोचलो, आणि लगेच पाऊस सुरू झाला. विजा कडकडू लागल्या, जमीन हलूं लागली, कदाचित भीतीमुळे असेल किंवा आनंदामुळे सुद्धां असेल. आणि आम्हीं एकमेकाला चिकटून बसलो होतो, एका मोठ्या खुंटावर जे एका झाडाला करवतीने कापल्यावर शिल्लक उरलं होतं किंवा कदाचित झाडंच तसं तुटलं होतं.

“तान्,” मी म्हटलं, “ तू समजून घे की तुझ्यासाठी मी माझां जीवनाचं बलिदान सुद्धां द्यायला तयार आहे!”

“ते ठीक आहे रे, पण, जर तू आपल्या जीवनाचं बलिदान दिलं तर माझ्याकडे कोण लक्ष देईल? माझंतर आता तुझ्याशिवाय दुसरं कुणीही नाहीये!”

“अगं, नाहीं, मी लक्ष ठेवीनंच, पण खरंच, जर गरज पडली तर जीवनाचे बलिदान सुद्धां देईन!”

“ऐक,” तान्याने जोरदार आवाजांत म्हटले, “तू एकदम मूर्ख आहेस! तुला फक्त जीवनाचं बलिदान द्यायचीच तलफ़ आली आहे, पण कशासाठी ह्याला तू महत्व देत नाहीये!”

“खरं आहे,” मी पट्कन सहमति दाखवली. “मग नाही देणार बलिदान. चौराण्यंव वर्षे जगेन, पणजीआजी सारखा, आणि जोपर्यंत सगळ्यांची अंतक्रिया करंत नाही, तोपर्यंत नाही मरणार.”

“आता कसं बोलला,” तान्या हसली.

थोडा वेळ आम्ही, एखाद्या फालतू फिल्मच्या नायक-नायिकेसारखे, एकमेकाच्या पाठीला पाठ टेकून, चुपचाप, पिसाट पावसांत भिजत बसलो होतो. मग तान्याने म्हटले:

“ऐक, मला थोडी थण्डी वाजतेय.”

“आणि मला पण,” मी म्हटलं.

आम्ही आणखी थोडा वेळ चुपचाप राहिलो. नंतर मी म्हटलं:

“ऐक तान्, चल प्रॉमिस करूं या की आज पासून बरोब्बर तेरा वर्षानंतर, जेव्हां आपण अठरा वर्षाच झालेले असूं, तेव्हां आपण ठीक ह्याच जागेवर भेटूं, रजिस्ट्रेशन ऑफ़िसमधे जाऊं आणि तेव्हां अगदी पक्कं लग्न करूं, पण आत्ता, आपल्याला जावं लागेल – घरी जाऊं या.”

“अगदी असेंच?” तान्याने विचारलं.

असेच,” मी ठामपणे उत्तर दिलं, कारण आता थण्डीबरोबर भूक सुद्धां लागली होती.

“जाऊ दे, हे काही ठीक नाहीं झालं,” तान्याने उत्तर दिलं. “एक ताससुद्धां एकमेकांसोबत नाही घालवला...” आणि तिला पट्कन राग आल्यासारखं वाटलं, पण तिने लगेच स्वतःला सावरलं:

“तसं, तू बरोबरंच म्हणतोय, शंकाच नाहीं. पण तेरा वर्षांने – एक्ज़ेक्ट्ली? अगदी ह्याच जागेवर?”

शिलेदाराचे प्रॉमिस,” माझ्या तोंडातून निघून गेलं, आणि मला माहीतसुद्धां नव्हतं की शिलेदारम्हणजे कोण असतात...

वादळ अजूनही तसंच बेफाम होतं, आणि आम्ही, अगदी ओले चिंब आणि प्रसन्न मनाने आपआपल्या घराकडे निघालो. आणि जेव्हां मी आपल्या क्वार्टरची घण्टी वाजवली, तर क्षणभरासाठी मला भिती वाटून गेली: मी तर बरोब्बर तेरा वर्षांने त्या ठिकाणी पोहोचून जाईन, जिथे आम्ही आत्ता गेलो होतो – मी प्रॉमिस पण केलं आहे, पण जर येवढ्यां वर्षांत तान्या सगळं विसरून गेली तर?...

पण मी लगेच ह्याबद्दल विचार करणं बंद केलं, कारण मम्माने दार उघडलं आणि सांगितलं की तिच्या जवळ माझ्यासाठी एक सरप्राइज़ आहे: तिने माझ्यासाठी टॉय-ट्रेन विकत आणली आहे, मी कित्ती दिवसापासून ह्या टॉय-ट्रेनचे स्वप्नं पाहत होतो. हो, आणि तान्यासुद्धां काहीच विसरणार नाही! तिने आतापर्यंत एकदा तरी मला धोका दिला आहे कां? नाही. म्हणजेच, आमच्या मीटिंगबद्दल काळजी करण्यांची काही गरज नाहीये!

 

लवकरंच ऑगस्ट येणारेय....           

 

हा आहे रस्ता. दूर एक घर आहे, जिथे पूर्वी म्हातारा मेंढपाळ राहायचा. नेहमी आपल्या शेळ्यांना घेऊन टेकडीवर जायचा. त्यांना तो कुठे ठेवंत असे (जवळ जवळ पंधरा शेळ्या होत्या त्याच्याकडे, त्यांपेक्षा कमी तर नाहीच) – हे मला कधीच समजलं नाही. रस्ता संपल्यावर झाडांचा मळा लागेल. तिथे पहाडी-बदामाची झाडं आहेत. पण जसे सध्यां आहेत, अगदी तसेच फक्त हिरवे, टणक, आंबट बदाम होते. कदाचित् जंगली-बदाम असतील आणि त्यांना खायचं नसतं? पूर्वी मला असं वाटायचं की हे खरे बदाम आहेत कारण मळा म्हणजे जंगलंच असतो नं, भले ही छोटं का नसो; पण ते बदाम कधी पिकलेच नाही, म्हणून मी त्यांना कधी खाल्लं नाहीं. एकदा फक्त चव बघितली होती, म्हणून मला माहितीये की – आंबट आहेत.

आजीला चांगलंच आठवतं की युद्धांपूर्वी काय काय होतं, पण माझं लहानपण, ज्याच्यासाठी मला आजी खूप-खूप आवडते, ते तिला आठवतंच नाही आणि ती मम्माच्या, मावशीच्या, बहिणीच्या बालपणाशी गफ़लत करून टाकते. तिच्या डोक्यांत सगळं गड्ड्मड्ड झालं आहे, तिला फक्त एकंच संध्याकाळ आठवते, जेव्हां त्यांच्या घरी डान्ससाठी कुरळ्या केसांचा एक तरूण आला होता आणि त्याने आजीला डान्ससाठी बोलावले होते. अट्ठावीस वर्षानंतर तो माझा आजोबा होईल, पण सध्यां तर मला त्याचाशी कसलंच घेणंदेणं नाहीये. आजीला आपलं शहर आठवतं, त्याचं शहर पण आठवतं, मैत्रिणी आठवतांत, स्टेशन ग्लत्कोव्का आठवतं, जिथे युद्धाच्या मोर्चावर न गेलेल्यांना कराचेवो गावांतून काढून नेलं होतं, आणि तिला हे सुद्धां माहीत नाहीये की आता – सोवियत संघ नावाचा देशही नाहीये, तिला तर अजून त्या कुरळ्या केसांच्या तरूणाबरोबर डान्स करायचा आहे, पण अश्या प्रकारे करायचा आहे की पाव्लिकला राग नाहीं येणार, तो हेवा नाहीं करणार...          

मृत्युची आजीला भीति नाहीं वाटंत. कदाचित् तिने त्याबद्दल कधी गंभीरतेने विचारंच केला नसावा, पण आजोबा गेल्या नंतर, जणु काही ती मृत्युची थोडी-थोडी वाट पहातेय. जे काही इथे आहे, मनोरंजक आहे, - पण आता तिला ह्याचं काहींच महत्व नाहीये. डान्सेस, गाणं स्टालिन – आमच्या सैन्याची शान, स्टालिन – आमच्या तरुणाईची उड्डाण’, जे त्यांच्या कम्सोमोल-ग्रुप मधे म्हणायचे, पाव्लिक, तूलाच्या जिंजरब्रेडच्या डब्यांत ठेवलेली पत्रं – ह्यांच्या आठवणीतंच ती जगतेय. मला हे समजतं आणि मी आजीवर आणखी जास्त प्रेम करतो. ती मला खेळण्यासाठी बाहेर जाऊं द्यायला तयार आहे.

मला ह्याचाशी काही घेणंदेणं नाही, की दीम्का, ज्याच्या निळ्या रंगाच्या दारावर किल्लीने खरवडून सुपर क्लबलिहिलं होतं, तो अकराव्या वर्षी घरी बसला. कदाचित् एखाद्या गंभीर कारणामुळे घरी बसला असेल, पण ह्याने मला काहीच फरंक पडत नाही, मला तो खूप आवडतो. दीम्का खरोखरंच सुपरहोता, सायकलच्या स्पोक्सने गन्सबनवायचा आणि एका मुक्क्यांत दोन बरगड्या बाहेर काढायचा. त्यानी शाळा सोडली तरी काही हरकत नाही. त्याने सनकी रूस्ल्यापासून मला वाचवलं होतं. रूस्ल्या म्हणंत होता की मी अनवाणी पायांनी सिमेन्टमधे स्टेच्यूव्हावं, मी पण झालो असतो स्टेच्यू , मी रूस्ल्याला घाबरंत होतो. पण दीम्का तिकडून जात होता, दीम्काच्या झापंड बसल्यावर रूस्ल्या स्वतःच त्या पातळ सिमेन्टमधे उडून पडला, आपलं घाणेरडं थोबाड घेऊन चिक्कट वस्तूत पडला आणि त्याला इतकं अपमानित झाल्यासारखं वाटलं की स्वतःच्याच थुंकीने तो गुदमरून गेला. तेव्हां दीम्का ने मला चहा पाजला, केक खाऊ घातला, टैक्सीत हिंडायला नेलं आणि बोलतां-बोलतां एकदम अचूक सांगितलं की, बुशंच अमेरिकेचा प्रेसिडेन्ट होणार. तेव्हां रीगन होता, इलेक्शनला तब्बल सहा महीने शिल्लक होते, पण दीम्काला आधीच सगळं माहीत होतं. म्हणजे, सगळे लोक जसं म्हणायचे की त्याला टेलिपैथी येते, ते बरोबरंच होतं. त्याच्या घरांत साखर सुद्धां ब्राऊन रंगाची असायची, जळून गेली होती म्हणून नाही, पण अशासाठी की ती आफ्रिकेतली होती; आता मला पक्कं माहीत आहे की दीम्कावर विश्वास ठेवायलांच हवा.

उन्हाळा लवकरंच संपेल. आतां जुलैचे शेवटचे दिवस आहेत, पण पायाखाली जमीन करकरू लागली आहे, एखादी लालसर, कडक वस्तु जीवनांत प्रवेश करूं पाहतेय. प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवली जाईल, आकाश जास्त दाट होईल, जुलैमधला तो भास लुप्त होऊन जाईल की आम्हीं सगळे एखाद्या पारदर्शी प्लैस्टिकच्या पैकेटमधे आहोत. आणि अचानक कळेल की +18डिग्री – म्हणजे खूपंच गरम आहे आणि आम्हीं उगीचंच उन्हाळ्यांच्या पावसावर चिडंत होतो.

दुकानांत जाईन. कलिंगड विकत घेईन, आजी बरोबर खाईन. हे इथे, लाकडाचं छोटसं शहर आणि तम्बू असायचा. इथेच मुहनने एका गोड-गोड मुलीला किसकेलं होतं. मुहन तेव्हां किती वर्षांचा असेल? नक्कीच, मी सध्यां जितक्या वर्षांचा आहे, त्याच्यापेक्षा कमीच असेल. पण मी तर आजपर्यंत अश्या सुंदर मुलींना किसनाही केलंय. त्यांना मुहन कां आवडायचां? तो तर काही बोलंतच नसे, फक्त गंभीरपणे बघंत राही, वाइनचे घोट घ्यायचा, खरंच, सुदृढंच होता, बिनबाह्यांचा शर्ट घालायचा, त्याचे मसल्समुश्किलीने बाह्यांच्या कट्समधून जायचे. दिवसां मुहनला लाकडाचा भुसा करण्याच्या मशीनीवर काम करावं लागे, पण तो काम सोडून पळून  यायचा आणि आमच्याबरोबर फुटबॉल खेळायचा.

शिव्यातर अश्या द्यायचा की जमीन थरथरून जायची, पण असं जाणवंत होतं की तो चांगला माणूस आहे. कदाचित् असल्या मसल्सवाल्यासाठी चांगला माणूस होणं कठीण नाहीये, कारण की सगळंच तुमच्या हातांत असतं! आणि, जर असंच आहे, तर मग शेखी कां मारायची?

मिलिट्री-स्टोअर पर्यंत आलो. इथे जाड्या अंद्रेइ राहायचा. सगळ्या बसेसचे ड्राइवर्स त्याला आपल्या कैबिनमधे बसवायचे आणि मोठमोठ्याने, आणि अकड दाखवंत बोलायचे, आणि नंतर जाड्या अंद्रेइसुद्धां बसमधे काम करूं लागला. सगळेजणं त्याला डोनटम्हणायचे. एकदां ल्योशा खाएत्स्की गिटार घेऊन आला आणि मी विक्टर ज़ोयचे व्हाइट स्नोहे गाणं वाजवलं. डोनटपट्कन घरी पळाला आणि रॉक ग्रुप किनोबद्दल एक काळं, फाटकं पुस्तक आणून माझ्या हातांत ठेवलं. आणि, दोन महिन्यांनी, जेव्हां माझ्यासाठी गुलाबी थण्डीसाठी निळं जैकेट विकत घेतलं, तेव्हां मी आपलं जुनं, चामड्याचं जैकेट, जे खरं म्हणजे, मला कधीच आवडलं नव्हतं, “डोनटला देऊं लागलो. पण त्याने ते घेतलं नाही. म्हणाला की त्याला खूप गडतं. कमाल आहे, जैकेट फक्त चामड्याचं आहे, पण आहे तर साधारण जैकेट्स सारखंच नं. पण अंद्रेइ ने नाहींच घेतलं. मी ते जैकेट कुणाला तरी देऊन टाकलं, आठवंत नाही, कुणाला.

कलिंगड विकत घेतलं. चंद्राच्या प्रकाशांत टेकड्या दिसताहेत. आणि खड्डेसुद्धां. आमच्या प्रवेशद्वाराचे कोडपुन्हां विसरलो (आतांच बदललं आहे), किल्ल्या जवळ नाहींत, फोन करून आजीला उठवीन.

आणि टाइम, बाप रे! बारा वाजून गेलेत!

एकदम मेंढपाळ आला तर? मी कल्पना करतोय की तो जागा आहे: तो चालला आहे, बेलामोरीनचे (सिगरेटचे एक लोकप्रिय ब्राण्ड) कश घेतोय, जमीन करकर करतेय, जुन्या काळाला आठवतोय, पण त्याला कोणीच त्या काळाबद्दल विचारंत नाही, म्हातारासुद्धां चुपचापंच असतो. पण नाही, नाही. पण रस्त्यावर कोणीच नाहीये. फक्त वेळेचं भान न ठेवणारा, फार्मवरून परत येणारा माणूस कारचे दूरचे लाइट्स लावतोय आणि खूष आहे, की तो बस शहरांत पोहोचण्यांतच आहे. आंबट बदामांच्या मळ्यावर प्रकाशाचा झोत टाकून तो हाइवेवर निघून जातो. तिथे कच्चा रस्ता नाहीये, काही दिवसांपूर्वी टाकलेला सपाट, बिनखड्ड्यांचा रस्ता आहे. सुंदर...

                                      

   

 

 

 

 

 

               माझ्या तोन्या आजी साठी

 

 

 

 

 

 

 

 

इण्डियन फ़िल्म्स    

(माझ्या बद्दल आणि व्लादिकबद्दल, नातेवाइकांबद्दल आणि मित्रांबद्दल

निघून गेलेल्या, चांगल्या काळाबद्दल)

 

 

 

अगदी-अगदी सुरुवातीपासून...    

 

तो फोटो, ज्यांत सात महिन्याच्या मला तोन्या आजी वर छताकडे उचलते आहे, आणि मी समोर, छातीवर तीन चमचमते तारे असलेला पांढरा ओवरऑलघातला आहे, मामाचे मित्र, हैनरी आरोनविचने घेतला होता. आजीने सांगितलं होतं की तो स्वतःच त्यादिवशी माझा फोटो काढायला आलेला होता. आणि कित्येक वर्षांनंतर हैनरी आरोनविचने मला तीन टैन्कर्स बद्दल गाणं म्हणूंन दाखवलं होतं. गाणं मला इतकं आवडलं होतं, की नंतर मी ते पाठ करून टाकलं आणि गायलोसुद्धां होतो. मी तीन टैन्कर्स बद्दल गायचो, एरोड्रोमचं गाणं म्हणायचो, ज्यांत “कुणासाठी तर ही फक्त उड्डाणाची वेळ आहे, पण खरं म्हणजे वेळ आहे प्रेमाचा निरोप घेण्याची,पण विशेषकरून मी – “जर मित्र निघाला अचानक...” म्हणायचो.

आजी खूप मजा घेत-घेत सांगते की मी कसा तिच्या मिलिट्री यूनिटच्या ऑफ़िसमधे गेलो होतो, टाइपिस्ट मुली जिथे बसतांत, त्या खोलीत गेलो, आणि जोराने गाऊं लागलो: “जर मित्-त्र निघाला अच्-चानक...”आजीला माझ्यामुळे खूप अवघडल्या सारखं वाटंत होतं – मी इतक्या ज़ोराने आणि इतकं अगदी बरोब्बर गात होतो. म्हणून दुसरा स्टैंज़ा सुरू करतांच तिने आपल्या सहकारी टाइपिस्ट स्पिरीनाकडे बघून, जी खोटंखोटं हसंत होती, म्हटलं: “सिर्योझेन्का, तू पूर्ण गाणं म्हटलं नं!” मी उत्तर दिलं: “पूर्ण कसं म्हटलं, जेव्हां अजून दोन स्टैंज़े शिल्लक आहेत?!” आणि मी गात राहिलो: “जर तर्-रूण पहा-आडावर – म्हणंत नाही – आह, घाबरून अचानक आणि खाली...”आणि असाच शेवटपर्यंत गातंच राहिलो. काही हरकत नाही, स्पिरीना सहन करंत होती आणि मंद-मंद हसंत होती. आता ती कुठे असेल?

आजीचं ऑफिस सुटल्यावर आम्हीं बरेचदां बेकरीत जायचो, जी आमच्यांच बिल्डिंगमधे होती. बेकरीतले सगळे लोक आम्हांला ओळखायचे – तिथे पण मी, स्वाभाविकंच आहे, धिंगाणा करंत होतो, पण सेल्सगर्ल्सला मी खूप आवडायचो. आत घुसल्याबरोबर, मी जातो, ब-अ-घ-तो, सगळं ठी-ईक आहे नं!असं म्हणंत सरळ तिकडे गेलो, जिथे ब्रेड ठेवलेली असते, म्हणजे ग्राहकांना तेथे जाण्यांची बंदी आहे. तेथून बाहेर निघालो तेव्हां माझ्या अंगावर डोक्यापासून ते पायांपर्यंत टोस्ट आणि रिंगसारखी ब्रेड लटकंत होती, मी रिपोर्ट दिली: “सगळं ठी-ईक आहे!” फक्त माझ्या तोन्या आजीला ठीक नव्हतं वाटंत, कारण तिला इतके सगळे टोस्ट्स घ्यायचेच नव्हते. सेल्सगर्ल्स हसत होत्या आणि म्हणंत होत्या की त्या मला हे सगळे टोस्ट्स आणि रिंग-ब्रेड विकायला तयार आहेत. पण मला रिंग-ब्रेड घ्यायचीच नव्हती, मला तर फक्त ब-अ-घायचं होतं, की सगळं ठी-ईक आहे किंवा नाही,” आणि मी माझ्या अंगावरून सगळ्या रिंग-ब्रेड्स काढून टाकल्या, तोन्या आजीला त्यांचे पैसे नाहीं द्यावे लागले.

 

औषधी पाल्यांचा संग्रह...

मी माझ्या भावाबरोबर तुखाचेव्स्की भागांतल्या पाचव्या नंबरच्या फार्मेसी जवळ एका बेंचवर बसलोय. बाजूला दोन बैग्स पडल्या आहेत. त्यांत घडी केलेल्या मोठ्या-मोठ्या पिशव्या, मोठा किचनचा चाकू (हे व्लादिकच्या बैगमधे, आणि माझ्या बैग मधे – कोयता), थर्मस आणि सैण्डविचेज़ आहेत. आम्ही बससाठी थांबलोय, कारण की आम्हांला शहराच्या बाहेर जाऊन आग्याची पानं गोळा करायचीत.

जवळंच जुने जैकेट्स आणि डोक्यावर रुमाल बांधून फार्मासिस्ट (औषध निर्माता) मुली उभ्या होत्या आणि हसंत होत्या. (औषधीय जडी-बुट्या तयार करण्याची जवाबदारी त्यांची असते). लवकरंच बस येते आणि इंजन सुरू करतांना ड्राइवर वीत्या म्हणतो: “राचेव्काला चाललोय”. बसमधे ह्या फार्मासिस्ट मुली आणि एक हातवाले आजोबा (त्यांना एकंच हात असला तरी ते माझ्यापेक्षां दुप्पट आग्याची पानं गोळा करतांत) म्हणतील की आम्हीं कित्ती चांगली मुलं आहोत, की आपल्या पिक्चर साठी आणि आइस्क्रीमसाठी पैसे स्वतःच जमवतो. काय माहीत कां, पण त्यांना असं कां वाटतं की पिक्चर आणि आइस्क्रीमशिवाय आम्हांला जीवनांत आणखी कशाचीही गरजंच नाहीये. त्यांना सांगायलांच हवं की मी कसा चांगल्या ग्रेडने पास झालो आणि कसं मला पंचवीस रूबल्सचं बक्षिस मिळालं होतं, जे मी त्याच दिवशी ऑनलाइन गेम शीपामधे हरलो सुद्धां. जर कुणाला माहीत नसेल, तर सांगतो की शीपापत्त्यांच्या एक गेम असतो. पण मी काहीचं नाहीं म्हणंत, कारण, जर कुणाला कळलं की मी पैसे लावून पत्ते खेळतो, तर...म्हणजे, काही सुद्धां चांगलं झालं नसतं.

उद्या, जेव्हां आम्हीं पुन्हां पाच नम्बरच्या फार्मेसीजवळ बसची वाट बघत असूं (आणि तेव्हां माझ्या बैगमधे कोयत्याच्या ऐवजी मोठा चाकू पडलेला असेल, कारण की कोयत्याने आग्याची पानं तोडायला त्रास होतो, तसं ती मस्तंच कापली जातात), तेव्हां एकदम पाऊस पडू लागेल. पावसांत तर कोणी औषधी पाला गोळा करायला जात नाही, आणि आनंदाने घरी परत जाऊं शकू आणि तोन्या आजीसोबत चहा बरोबर सैण्डविच खाऊ. व्लादिक नव्याने वाचलेल्या फ़ैन्टेसीच्या पुस्तकाबद्दल सांगेल आणि मला आणि तोन्याला काहीच कळणार नाही आणि आम्ही नुसते हसतंच राहू, तेव्हां व्लादिकला खूप राग येईल. शेवटी आमच्यांत डोईफोड नाकतोडे” ह्या फिल्ममुळे समेट झाला, जी, असं कळलं की स्मेनाथियेटरमधे दाखवतांत आहे. त्यांत असा कमालीचा कुंग-फू आहे! आणि हीरोचं नाव सुद्धां चायअसं आहे. व्लादिकंच मला ही फिल्म दाखवायला घेऊन गेला होता, आणि ही एक अशी फिल्म होती, जिला आम्हीं कमीत कमी तीन-चार वेळां नक्कीच बघायचो. तर, आम्हीं स्मेनाला जातो, मग, जेव्हां “डोईफोड नाकतोडे” जुबिलीथियेटरमधे दाखवतील, - तेव्हां आम्हीं जुबिलीला जाऊं, आणि पुन्हां माझ्या डोक्यांत एक नवा आइडिया येईल, की काय केलं पाहिजे: आपणंच एक्वेरियम्स बनवायचेत आणि डज़न्सने त्यांना विकायचे. शाळेच्या ग्रीन हाऊस मधून आम्हीं थोडेसे काच आणू, एपोक्साइड-ग्लू विकत घेऊं, ज्याने काचा चिकटवतां येतील, आणी इतकी साधारणशी वस्तू बनवूं, जी बाजारांत अजून आलीच नाहीये. पण आपली वस्तू आम्हीं विकायला नाही घेऊन जाणार.

 

 

 

 

 

 

 

 

इण्डिया, दोन सिरीज़....

पहिली इंडियन फिल्म, जी मी बघितली होती, ती होती फिल्म सम्राट’. आणि फिल्म बघितल्यानंतर मी लटपटत्या पायांनी, तोंड उघडं ठेवून, आजूबाजूच्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देतां आणि सारखं चुकीचं वळण घेत, घरी चाललो होतो आणि क्वार्टरमधे घुसतांच मी म्हटलं:

“तोन्, तुला माहित आहे कां, की हिटलरपेक्षांही जास्त वाईट कोण आहे?’

“अरे,” तोन्या आजीने आश्चर्याने विचारले, “हिटलरपेक्षांही जास्त वाईट कोण बरं असूं शकतो?”

थोडा वेळ शांत राहून आणि दूरवरच्या मुम्बईहून घरी येता-येता मी म्हटलं:

“बॉस.”

निश्चितंच! तो हिटलरपेक्षां कितीतरी पटींनी दुष्ट आहे, कारण त्याने कैप्टन चावलाला कित्ती वर्षं तळघरांत कैदेंत ठेवलं होतं. कैप्टन चावलांच एकटा असा माणूस होता, ज्याला सोन्याने भरलेल्या जहाज सम्राटला समुद्रांत कुठे बुडवलंय, ती जागा माहीत होती! आणि कैप्टन चावलाने त्या जहाजाला बॉसच्या हुकुमानेच बुडवलं होतं! आणि जर फिल्मचे खास हीरो राम आणि राज नसते, तर माहीत नाही आणखी किती वर्षं त्याने दुष्टपणाची कामं केली असती.

मी व्लादिकला तपशीलवार सम्राटची गोष्ट सांगतो, आणि आम्हीं लगेच ही फिल्म बघायचं ठरवतो. व्लादिकलापण फिल्म खूप आवडते, पण फक्त जेव्हां आम्हीं हॉलमधून बाहेर पडंत होतो, तेव्हां तो म्हणाला, की शेवटच्या सीनमधे बॉसला फक्त तीन गोळ्या मारल्या होत्या, वीस नाहे, जसं मी त्याला सांगितलं होतं. पण मला वाटलं होतं की वीस होत्या!

आणि त्याच्यानंतर मी लागोपाठ एका मागे एक “तकदीर”, “जागीर”, “हुकूमत”, “शोले”, “मुझे इन्साफ़ चाहिए!” – ह्या फिल्म्स बघितल्या आणि मला आता माहितीये की तो, जो “सम्राट  फिल्ममधे रामचा रोल करंत होता – तो एक्टर धर्मेंद्र आहे, “शोले”मधे तो वीरूचा रोल करंत होता, आणि तो, जो बॉस होता, - तो अमजद खान आहे, तो “शोले”मधे तसल्यांच घाणेरड्या माणसाचा रोल करंत होता, फक्त आता त्याचं नाव होतं गब्बर सिंग. मग मी “शक्ति”, “खुद्दार”, “मुकद्दर का सिकंदर”, “त्रिशूल”, और “जंजीर” बघितली आणि मी अमिताभ बच्चनच्या प्रेमातंच पडलो, जो ह्या सगळ्या फिल्म्समधे आणि, “शोले”मधे सुद्धां प्रमुख रोल करतोय, आणि सगळ्यांत त्याचं नाव विजयच आहे. जर मला कधी मुलगा झाला, तर मी त्याचं नाव विजयंच ठेवीन, अमिताभच्या प्रेमाखातर.

मग थियेटर्समधे राजकपूरची “आवारा” आणि “डिस्को डान्सर” दाखवतात. इण्डिया, दोन सिरीज़चा अर्थ माझ्या साठी हा आहे, की मला जावंच लागेल, कारण, फिल्म चांगलीच असेल, आणि मी ताबडतोब दोन्हीं फिल्म्स बघण्यासाठी धावतो. “आवारा” तर मला खूपंच आवडते. पण चार वेळां “डिस्को डान्सर” बघितल्यावर (त्यांत हीरो आहे मिथुन चक्रवर्ती – हा तोच आहे, ज्याने “जागीर”मधे फ़ैक्ट्री-मालक रणधीरच्या लहान भावाचा रोल केला होता) मला चांगलंच समजलंय की मोठा झाल्यावर मी एक्टरंच होईन, आणि “डिस्को डान्सर – 2” मधे काम करेन, मिथुन चक्रवर्तीबरोबर. आणि, अचानक “डिस्को डान्सर-2” येते! पण ह्या फिल्मचं नाव आहे “डान्स डान्स!” मुख्य रोल पण मिथुन चक्रवर्तीनेच केला आहे, डाइरेक्टर सुद्धां तोच बब्बर सुभाष आहे, ऑपरेटर राधू करमाकरचं आहे, तोच म्यूज़िक डाइरेक्टर – बप्पी लहरी आहे! जेव्हां मी वर्कर्स वेमधे सव्रेमेन्निकथियेटरची घोषणा आणि हे वाक्य बघितलं: “फिल्म “डिस्को डान्सर”च्या सोवियत फैन्स साठी”, तेव्हां पाच मिनिटासाठी मी जणु आनंदाने मरूनंच गेलो! आणि न जाणे कां, हे पण आवडलं की “डिस्को डान्सर” फक्त मलाच नाही, तर सगळ्यांच सोवियत दर्शकांना आवडतो!

मग एक वेळ अशी देखील येते, जेव्हां आमच्या शहराच्या थियेटर्समधे इंडियन फिल्म्स येतंच नाहीत. मी ‘09’ ह्या नंबरवर शहराच्या सिनेमा- डिस्ट्रीब्यूटर ऑफिसमधे फोन करून विचारतो की कोणची नवी इण्डियन फिल्म दाखवणार आहे कां. मला सांगण्यांत येतं की लवकरंच “प्यार करके देखो” नावाची फिल्म येणार आहे आणि रिसीवर ठेवून देतात. मी विचारूं सुद्धा शकलो नाही की त्या फिल्ममधे कोण-कोणचे एक्टर्स आहेत. पुन्हां फोन करतो, विचारतो, की “फिल्म प्यार करके देखो”चा हीरो कोण आहे. मला कळायला तर पाहिजे नं की कोणाला पसंत करूं आणि कोणावर विश्वास ठेवू! त्यांना खूप आश्चर्य होतं, की मला ह्या गोष्टीत उत्सुकता आहे, पण टेलिफोनवाल्या बाईने हसून म्हटलं की जेव्हां फिल्म दाखवतील तेव्हां कळेलंच, की त्यांत कोण-कोण काम करतं आहे. पण मला तिच्या बोलण्याचा टोन नाहीं आवडला. मी पुन्हां फोन करतो, आणि आवाज़ बदलून विचारतो, की एखाद्या थियेटरमधे “डिस्को डान्सर” दाखवणार आहेत कां. मला मरगळलेल्या आवाज़ात उत्तर मिळतं की नाहीं दाखवणार.

जेव्हां सकाळी मी पुन्हां फोनवर विचारतो, की आमच्या शहराच्या थियेटर्समधे इण्डियन फिल्म्स दाखवणार आहेत कां, तेव्हां ते लोक मला ओळखून घेतात:

 “मित्रा, तू काय झोपेंतसुद्धां विचार करंत होतास, की कुठे फोन करायचा आहे?”

आता मी त्यांना फोन नाहीं करंत. चांगलं नाही वाटंत. पण, मी त्यांचा मित्र कसा काय झालो?!

 

मी आणि व्लादिक...

फ़िल्म्स बनवतो......

लवकरंच मला असं वाटूं लागलं, की फक्त इण्डियन फिल्म्स बघणंच पुरेसं नाहीये. माझी इच्छा होती की मी स्वतः त्यांना बनवावं, अशा प्रकारे, की मी त्यांत मुख्य भूमिका करावी, स्वतःच डाइरेक्टर, स्क्रिप्ट राइटर, आणि गायकसुद्धां असावं. मी मूवी-कैमेरा घेण्यासाठी पैसे जमा करूं लागतो, ह्या बद्दल विचार करणं मात्र मला जमंत नाहीये की शूटिंग कसे होईल आणि, मुख्य गोष्ट, आमच्या फिल्म्स बघेल कोण. जसा-जसा मी विचार करंत होतो, माझी भीति वाढत होती आणि मी निराश होऊं लागलो. पण अचानक व्लादिक मला फिल्म्स बनवायची एक मस्त ट्रिक सांगतो, ज्यांत काही कैमेरा-बिमेरा नाहीं लागंत. फक्त तुम्हांला ड्राइंग मात्र यायला हवं.

तो कागदाच्या एका तुकड्यावर एक माणूस काढतो, दुसरा कागद घेऊन – तसांच माणूस, हात वर केलेला. पहिला कागद वर ठेवतो, त्याच्याखाली दुसरा कागद ठेवतो आणि पट्कन वरचा कागद सरकवतो. माणूस हात उचलतो आहे! काय गंमत आहे! मी डिपार्टमेन्टल स्टोअरला पळतो आणि थंडीच्या दिवसांत खिडक्यांवर चिकटवायच्या कागदाचे खूप सारे रोल्स घेऊन येतो. ही आमची रील आहे. उभ्या डैशेसनी मी फ्रेम्सचे चिह्न काढतो आणि ड्राइंग करूं लागतो.

मन लावून चित्र काढणं मला जमंत नाही, म्हणून “बदला” नावाच्या फिल्मची दुसरी सिरीज़ येता-येता माझे सगळे हीरोज़ एक सारखे दिसूं लागते, फक्त कपड्यांच्या रंगानेच त्यांना ओळखू शकतो. खलनायकांना मी मोठं दाखवलं आहे आणि त्यांचा चेहरा सुरकुत्यांनी भरलेला दाखवला आहे. सुरकुत्या दोन जाड्या-जाड्या रेषांनी काढल्या आहेत, म्हणजे त्यांना ओळखायला त्रास व्हायला नको.

संध्याकाळपर्यंत फिल्म तयार झाली. मी एक डब्याला दोन उभी भोकं करतो, त्यांत आपली फिल्म “बदला”ची पहिली आणि एकुलती एक कॉपी फिट करतो, आणि व्लादिक माझा पहिला, एकुलता एक दर्शक होतो. जर कागदाच्या रीलला व्यवस्थित सरकवलं तर डब्ब्याच्या स्क्रीनच्या भागांत चित्रांमधले लोकं चालू लागतात, ढिशूम-ढिशूम करूं लागतात, आणि डान्स करू लागतात. असो, फिल्ममधे आवाज़ मला स्वतःलाच द्यावा लागतोय.

फिल्म शो झाल्यावर व्लादिकसुद्धां थंडीच्या दिवसांत खिडक्यांवर चिकटवायचा कागद विकत घेतो आणि काही दिवसांत त्याच्या पहिल्या फिल्म “बवण्डर”चा प्रीमियम होतो.

हळू-हळू हम आम्हीं निर्माणाच्या कामांत मग्न होऊन जातो. व्लादिक धारावाहिक फिल्म “12 निन्जास” बनवतो, जी “बवण्डर” सारखीच कुंग-फूच्या दोन प्राचीन घराण्यांमधे असलेल्या वैमनस्याची गोष्ट आहे. आपल्या फिल्ममधे तो एक नवीन  वस्तू जोडतो: हीरोज़चे डायलॉग्स रीलवर लिहितो, म्हणजे प्रत्येक फ्रेममधले त्यांचे डायलॉग्स लक्षांत ठेवण्याची गरज नाहीं.

जो पर्यंत व्लादिक “12- निन्जास” बनवंत होता ( ही फिल्म बनवायला त्याला जवळ-जवळ एक महिना लागला), मी एकदम माझ्या खूप फिल्म्स रिलीज़ करून टाकल्या: “वेगळ्या नावाने”, “डान्सिंग रेनबो”, “जनतेच्या भलाई साठी”, “खतरनाक आज़ार”, “अपूरणीय क्षति”, “गावाचा रक्षक”, “आगमन” आणि “मास्टर दीनानाथचे संगीत”. दर्शक नसल्याची समस्या पण हळू-हळू कमी होत होती. व्लादिकचे मम्मी पप्पा आणि आमचे सगळे आजी-आजोबा बिना तक्रार आमच्या फिल्म्स बघंत होते.

पण फिल्म्स दाखवतां-दाखवतां मला कळलं की जेव्हां रील मधेच तुटते, तेव्हां मला फार आनंद होतो, कारण की तेव्हां अगदी खरोखरच्या थियेटरसारखं वाटतं. रील आपणहून नाही फाटंत, आणि मी दर मिनिटाला दुर्घटनांचे चित्र दाखवतांना तिला फाडतो आणि वरून कुरकुर करतो की वाइट कॉपी आणली आहे.

पण ह्याचा परिणाम असा झाला की लोकांनी आमच्या फिल्म्स बघणं बंदंच केलं, आणि मी सुद्धां फिल्म्ससाठी ड्राइंग्स काढता-काढता बोर झालोय.

काहीही म्हणा, खरोखरच्या इण्डियन फिल्म्स जास्त चांगल्या असतात!

हरकत नाही. काही दिवसांत मी आणखी काही करेन!

 

 

माझी पणजी आजी - नताशा      

संध्याकाळी मला घरी आणणं खूपंच कठीण आहे, विशेषकरून जेव्हां थण्डीचे दिवस असतांत आणि हॉकीचा खेळ चालू असतो. टेपने गुण्डाळलेली माझी स्टिक “रूस” घेऊन मी एका गोल पासून दुसरीकडच्या गोलकडे जात असतो (आमचे गोल – लाकडाचे डब्बे आहेत, जसे भाजीच्या दुकानाजवळ पडलेले असतात), कानांना झाकणारी लांब पट्ट्यांची टोपी टेकडीवर फेकली आहे, म्हणजे ती खाली डोळ्यांवर घसरू नये, आणि खिडकीतून येणारा आवाज़, की घरी परतायची वेळ झाली आहे, कारण की अंधार झालेला आहे, ऐकूंच नाही येत.            

पण रात्रीचे दहा वाजून गेले आहेत, आणि माझी पणजी आजी बाहेर पोर्चमधे येते आणि मला ओंजारत-गोंजारत बोलावते:

“सिर्योझेन्का-आ! चल घरी जाऊं या, आजोबा आले आहेत, आणि त्यांनी काय आणलंय माहितीये! आय-आय-आय-आय!...”

मला मित्रांसमोर लाज वाटते की आजेबाची गिफ्ट हॉकीहून जास्त महत्वपूर्ण असूं शकते, पण तरीही मी थांबतो आणि नताशाकडे बघतो.

“काय आणलंय?”

“ओय, ते स्वतःच तुला दाखवतील, चल, जाऊं या.”

खरंच, मजेदार गोष्ट आहे, की आजोबाने काय आणलंय, - कदाचित दलदलीतून वेत आणले असतील, मी कित्ती दिवसांपासून मागतंच होतो. पण सध्यां तर थण्डीचे दिवस आहेत, आता कुठली आलीय दलदल?

आमच्या बिल्डिंगच्या प्रवेशद्वारांत घुसतो. मी पुढे-पुढे, नताशा माझ्या मागे. आम्हीं दुस-या मजल्यावर राहतो, जास्त नाही चालावं लागंत, पण तरीही मी विचारतोच की आजोबाने काय आणलंय. आणि तेव्हां, हे समजून, की मी आता उडी मारून परत बाहेर रस्त्यावर नाहीं पळणार, कारण की तिने माझी वाट रोखली आहे, नताशाचा चेहरा एकदम बदलतो, आणि मला पाठीमागून एखाद्या युद्धकैद्यासारखी ढकलंत ती खडसावते:

“चल! शैतान बाहुल्या! काय आणलयं! ह्याला घरी आणणं मुश्किल आहे! बघ, तुझी स्टिक तर बाकावर तडकली आहे – नवीन नाही घेऊन देणार!!!”      

पण तरीही पणजी आजी मला फार आवडते. जेव्हां फराफोनवा (माझी लोकल डॉक्टर) पहिल्यांदा आमच्या घरी आली, तेव्हां तिने मला बघितलं आणि म्हणाली:

“ओय, कित्ती गोड मुलगी आहे!”

मी स्कर्ट-ब्लाऊज़मधे होतो, डोक्यावर रुमाल बांधला होता – म्हणजे – मी नताशाचा सम्पूर्ण ड्रेस घातला होता.

“मी मुलगी नाहीये!” मी लाजलो.

“मग, तू कोण आहेस, मुलगा?”

“मुलगी नाहीं आणि मुलगा पण नाहीं! मी पणजी आज्जी नताशा आहे, आणि माझं वय पंचाहत्तर वर्षं आहे!”

आता फराफोनवाने गंभीरतेने तोन्या आजीला समजावले की मला स्कर्ट घालूं देऊं नये, नाहीतर मला ती सवय लागेल आणि माझ्या मनःस्थितिवर ह्याचा परिणाम होऊं शकतो, पण तोन्या आजीने अत्यंत दुःखाने उत्तर दिलं की असं करणं शक्य नाहीये, आणि गोष्ट जर स्कर्टपुरतीच मर्यादित असती तर काळजीची काही बाब नव्हती, पण मी तर नताशाची सगळी भांडी घेऊन घेतलीय आणि तिचीच औषधंसुद्धां खात असतो – ब्लडप्रेशरचं , चक्कर यायचं, आणि हार्टचं... (पण मी खरोखरीची औषधं थोडीच खातो, मी वाटाण्याचे दाणे, चॉकलेट्स खातो आणि डोळ्यांत सुद्धां आय-ड्रॉप्स नाहीं, नुसतं पाणीच घालतो).

आणि नताशाचं माझ्यावर खूप प्रेम आहे. एकदां संध्याकाळी ती “छोटा गरुड” बाइसिकल घेऊन आली.

माझ्याकडे “स्कूल बॉय” होती, आणि तिला माहीत होतं की मला एक मोठी साइकल पाहिजे. बस, घेऊन आली. “ओह, जिन्यावरून मोठ्या मुश्किलीने आणली!”

आवाज़ ऐकून तोन्या आजी किचनमधून बाहेर आली.

“हे काय आहे?”

“अगं, मी मिलिट्री स्टोरच्या जवळून जात होते – ही तिथे उभी होती. अर्धा घण्टा उभीच होती, हिला घ्यायला कोणीच आलं नाही. चला, सिर्योझासाठी होईल.”

“मम्मा,” तोन्या आजी म्हणाली, “तुला अगदी वेड लागलं आहे. हिला कोणीतरी तिथे ठेवलं होतं! तुला स्वतःला सुद्धां कळंत नाहीये की काय करायचंय. परत घेऊन जा.”

आणि नताशा साइकल परत ठेवायला चालली गेली. ही तोन्या आजी घरांत नसती, तर “छोटा गरुड” माझ्या कडेच राहिली असती!

 

                       

समर कॉटेज.

सणाचे दिवस आणि नेहमीचे दिवस...

 

आजोबा शेडजवळ बाकावर बसलेत. त्यांच्या पुढे चकचकीत बाल्टी आहे, ज्यांत कांदे आणि माँस आहे. ते कबाब बनवंत आहे, आणि मी आणि व्लादिक कैम्प फायरमधे काड्या पेटवून अंगणांत हिंडतोय. ह्या आमच्या मशाली आहे. त्या पट्कन विजतांत आणि आम्हीं त्यांना पुन्हां पेटवायला कैम्प फायरजवळ जातो. त्या पुन्हां विजतांत आणि आम्हीं ठरवतो की चला ह्यांच्या तलवारीच बनवूं या. आम्हीं युद्धाला सुरुवात करतो. व्लादिक जिंकतो, कारण की त्याला जिंकायचं होतं, आणि मी, मला असं वाटतं की युद्ध सुरेख झालं पाहिजे.

आज विजय-दिवस (9 मे – अनु.) आहे, जो आम्हीं आमच्या समर कॉटेजमधे साजरा करतोय. तोन्या आजी घरांत वेगवेगळ्या प्रकारचे सॅलेड्स तयार करतेय. लवकरंच व्लादिकचे मम्मी-पप्पा येतील, आजोबचे मित्र इलीच आणि वीत्यापण येतील. वीत्या माझ्या आजोबाला मेरे बापम्हणतो. आणि निळ्या ज़ापरोझेत्सकारमधे वास्या आजोबा आणि नीना आजी सुद्धां येतील, हे व्लादिकचे आजी-आजोबा आहेत.

वास्या आजोबा बरोबर फुटबॉल बद्दल बोलायला आवडतं, कारण की ते सुद्धां सगळे मैचेस बघतात; आणि मला ते अशासाठी पण आवडतांत, की जरी ते सत्तर वर्षांचे आहेत, तरीही नेहमी कडक इस्त्री केलेलाच सूट घालतात, मस्त टाय बांधतात, त्यांचे केस नेहमी चांगले सावरलेले असतात, आणि एक सुद्धां केस हलंत नाही, वास्या आजोबाने कोल्यांट्या मारल्या तरीही.

पण माझे आजोबा, जे पण मला खूप आवडतात, नेहमी कोणची तरी सलवार घालून असतात, एकंच, जुन्या काळातला खाकी रंगाचा शर्ट आणि हल्की पिवळी तेलकट टोपी घालून फिरतांत, जी त्यांनी मी व्हायच्या खूप आधी एका रिसॉर्टवर विकंत घेतली होती.

लोकांनी माझ्या आजोबांना लेदरच्या, कॉड्रोयच्या, लोकरीच्या टोप्या दिला होत्या, आणि इलीच तर नेहमी विचारतो, की ते “आपली इमेज केव्हां बदलणार आहेत”, पण अगदी पालथ्या घड्यावर पाणी! नवीन टोप्यांचा ढेर अलमारीत पडला आहे, पण आजोबा नेहमी आपल्या फेवरेट, हल्क्या पिवळ्या टोपीतंच असतात, आणि फक्त समर कॉटेजमधेच नाही, पण फ़ार्मेसीच्या गोडाउनमधे सुद्धां, जिथे ते डाइरेक्टर आहेत.

आमचा सण मस्तंच रंगलाय. इलीच मला पिटकुलं डुक्कर म्हणतो, आणि मला खूप राग येतो. आजोबा आणि वीत्या वाद घालताहेत, की वास्याच्या “ज़ापरोझेत्स”साठी टायर्स कोण आणणार आहे, कारण वास्या आजोबा कम्प्लेन्ट करत होते की टायर्स – केव्हांच गुळगुळीत झालेत. जेव्हांपासून आमच्या कम्पाऊण्डमधे एकाच दगडावर वास्या आजोबाचे तीन टायर्स पंक्चर झाले, माझे आजोबा प्रत्येक गोष्टीत त्यांची मदत करण्याचा प्रयत्न करतात.

आणि अचानक पाऊस पडूं लागतो. आम्हीं घरांत पळतो; खुर्च्या कमीच आहेत, पण कसे तरी बसतो आणि बिघडलेल्या टेलिफोनचा खेळ खेळू लागतो. इलीच सर्वांत जास्त हसतोय, पण स्पष्टंच दिसत होतं की त्याला खरंच मजा नाही येत आहे. ह्या उलट व्लादिकचे पप्पा, मुद्दामंच नाहीं हसंत, हे दाखवायला की – बिघडलेला टेलिफोन कित्ती मूर्खपणाचा खेळ आहे – उदाहरणार्थ, चैज़च्या लेखांच्या संग्रहापेक्षा, ज्याचे दोन खण्ड ते वर्षभरापासून दर महिन्याला विकत घेतात. मला असं वाटतं की सगळ्यांनी रात्री कॉटेजमधेच थांबावं. म्हणून पाऊस रात्रभर पडतंच राहिला पाहिजे, नाहीतर माहीत नाही, सगळे लोक थांबतील किंवा नाही.

पण लवकरंच सूर्य निघाला, आणि आम्ही आपाअपल्या घरी जाण्यासाठी निघालो. वास्या आजोबा मला “ज़ापरोझेत्स”मधे घरी सोडायला तयार झाले. जशीच ते स्पीड वाढवतात, मी सीटवरून पुढे वाकतो, आणि इंजिनच्या आवाजापेक्षाही मोठ्याने, अपेक्षेने विचारतो:

“वास्, आता तू कुठेतरी घुसवशील, हो नं?! (अरे, मी नुसतीच गंमत करतोय).

“छिः, तू, घाणेरडा यूसुफ़!” वास्या आजोबा फिसकारतात आणि गाडीचा वेग कमी करतांत.

हे यूसुफ़कशाला – फक्त देवालाच माहीत.

सणाचे दिवस सोडले तर फक्त मी आणि तान्या आजीच समर कॉटेजकडे जातो. कधी-कधी व्लादिक पण आमच्या बरोबर येतो, पण आजकाल त्याला एक मित्र सापडला आहे – ल्योशा सकलोव, ज्याची तो इतकी काळजी घेतो, की मला पण दाखवायला लाजतो. ठीकंच आहे, जर मी सांगून टाकलं की आम्हीं खिडक्यांना चिकटवायच्या कागदावर कशा प्रकारे फिल्म्स बनवल्या होत्या, तर?

तर, मी आणि तोन्या टेकडीवर चढ़तो, आणि सतत घाण वास सोडंत असलेल्या नदीच्या वरचा पुल पार करतो, आणि तिथून समर कॉटेज फक्त दोन हात दूर आहे. बैक-पैक्स काढल्या-काढल्या मी शेजारच्या आन्ना बिल्याएवा, विक्टर पेत्रोविच आणि कुबड्या आन्ना मिखाइलव्नाकडे धाव घेतो.

आन्ना बिल्याएवा मला ससाम्हणते आणि माझ्याशी बोलत असताना सतत पुचकारंत असते. आश्चर्य म्हणजे, मला तीच सगळ्यांत जास्त आवडते. पण आन्ना बिल्याएवाच्या डोक्यावर नेहमी रुमाल बांधलेला असतो, ती जशी सतत धुळीने माखलेली असते, आणि तिचं पुचकारणं खराब नाहीं वाटंत.

विक्टर पेत्रोविच माझ्याकडे कमी लक्ष देतात, पण त्यांचं घर खूप मोट्ठं आणि सुरेख आहे आणि दारासमोर गारगोट्यांचा ओटा आहे. ह्या गारगोट्यांना घासून मी ठिणग्या काढतो. आणि जर जास्त वेळ घासलं तर गारगोट्यांमधून जळक्या कोंबडीचा वास सुटतो. कधी-कधी असंही होतं की मी हट्ट करून तोन्या आजीला पण गारगोट्यांचा वास घ्यायला लावतो. एकदा तोन्या आजी माझ्या जवळपास नव्हती, म्हणून मी कुबड्या आन्ना मिखाइलव्नाला गारगोट्यांचा वास घ्यायला सांगितला. तेव्हांपासून ती जोर देऊन सांगते आहे, की आम्ही आमचा रास्बेरीचा वेल कुठे दुसरीकडे लावावा, कारण तो तिच्या अंगणांत पसरंत आहे.

आणि, काहींच दिवसांपूर्वी आमचं गेट उघडतं आणि बुदुलाय (प्रसिद्ध फिल्म जिप्सीचा हीरो) आत येतो. “जिप्सी”तर मला काही इण्डियन फिल्म्सपेक्षांही जास्त आवडते, आणि इथे – अगदी खरोखरंचा बुदुलाय, दाढीवाला, किंचित पांढरे केस असलेला, मसल्स-मैन, आणि माहीत नाही कसा, पण तो तोन्या आजीला ओळखतो!

“अन्तनीना इवानव्ना!” तो ओरडतो.

आजी बाहर येते, आणि सांगते की हा ईल्या अंद्रेयेविच आहे, ज्याच्याबरोबर ती एके काळी काम करायची. पण माझ्यासाठीतर तो – फक्त अंकल बुदुलाय आहे.

त्याला आवडतं की मी त्याला ह्या नावाने बोलावतो. मल कळतं की त्याची समर कॉटेज आमच्या कॉटेजच्या अगदी जवळंच आहे, आणि मी आता सम्पूर्ण दिवस तिथेच घालवतो. बुदुलायकडे मोट्ठाले एपल्स आहेत, गुलाबी रंगाचे, आणि आता हा माझा फेवरेट ब्राण्ड झालेला आहे, आणि त्याच्या घराच्या भिंतींवर आमच्या ड्रामा थियेटरच्या जुन्या शोचे – “हाजी नसरुद्दीन परत येतो”चे पोस्टर्स लागले आहेत, आणि बुदुलाय मला सुद्धां आमच्या घराच्या भिंतींवर लावायला काही पोस्टर्स देतो. त्याला एक मुलगापण आहे – अंद्रेइ, त्याच्याबरोबर मी ग्रीन हाउस बनवतो, म्हणजे, तो आणि बुदुलाय बनवतात, आणि मी जवळंच फिरतोय, आणि अंद्रेइला ड्रममधे बॉल फेकायला बोलावतो. थोडा प्रयत्न केल्यावर मी बॉल ड्रम मधे टाकूनंच देतो, आणि आम्हीं मोट्ठी, खडबडीत, हिरवी बॉल पाण्याने भरलेल्या मोट्ठ्या, लोखंडाच्या ड्रम मधे फेकूं लागतो. मग जेवायला वाढतात. मला भूक नाहीये, पण जेव्हां मी बघितलं की बुदुलायनी कसे चाकूने डब्बा-बंद पदार्थ उघडले आणि चाकूनेच त्यांना हलवून त्यांत ब्रेड बुडवूं लागला, तेव्हां मला कळलं की मी फुकटंच आपल्या वाट्याच्या जेवणाला नाहीं म्हटलंय, आणि मी म्हणतो, “द्या”. बुदुलायने डब्यांतून माझ्यासाठी काही पदार्थ काढण्यासाठी एक बाउल घेतला, पण माझ्यासाठीतर बाऊलपेक्षां सरंळ डब्ब्यातूनच खाणं जास्त महत्वपूर्ण आहे, आणि मी विचारतो, “मी सुद्धां असंच सरंळ डब्यांतून खाऊं शकतो कां.” बुदुलाय मंदस्मित करतो, खास माझ्यासाठी एक डबा उघडतो आणि माझ्या हातांत चाकू देतो, त्याला कळत होतं की फोर्कने मला जेवण तेवढं स्वादिष्ट नाही वाटणार.

आणि म्हणतांत, की जो चाकूने खातो – तो दुष्ट असतो. बकवास. बुदुलाय, कदाचित, बहुतेक वेळां चाकूनेच खातो, आणि त्याच्यापेक्षां चांगला माणूस मी नाही बघितला.   

                                       

 

 

मी आणि व्लादिक – लेखक...

 

रात्रीचे अकरा वाजून गेलेत. पण मी आणि व्लादिक जागेच आहोत. आम्हीं मोठ्या खोलीत टेबलाशी बसलोय, आणि आपल्या नोटबुकवरून डोकं काढंत नाहीये. आमच्यावर प्लास्टिकच्या अनेक माळांनी वेढलेला एक छोटा लैम्प लटकतो आहे, आणि कधी-कधी असे वाक्य ऐकूं येतांत : “मी दुसरा भाग सुरू करतोय” किंवा “आणि माझा दुसरा चैप्टर प्रेमाबद्दल असेल”.

हे, आम्हीं नॉवेल्स लिहितोय. जेव्हांपासून व्लादिकने एक लहानशी गोष्ट : “थण्डीची तयारी” लिहिलेली एक जुनी, भुरकट रंगाची नोटबुक आणली होती, माझं मन “सैनिक” ह्या खेळांत रमंत नाहीये आणि मला प्लास्टीसिनची खेळणी करायला पण  नाहीं आवडंत. सुरुवातीला मला आश्चर्यच झालं, की माझ्या डोक्यांत आपणहूनंच हा विचार कसा नाही आला, की एक नोटबुक विकत घेऊन त्यांत पाहिजे ते लिहितां येतं, आणि मग लेखकपणामाझं सर्वांत फेवरेट काम झालं असतं – हो, फुटबॉल शिवाय! बस, मी असल्या फाल्तू गोष्टी नसत्या लिहिल्या, जसं - “थण्डीची तयारी”. ह्या गोष्टीत फक्त येवढंच सांगितलं आहे, की आपल्या स्कीज़ला गुळगुळीत कसं करावं, म्हणजे त्या व्यवस्थित घसरतील, आणि खिडक्यांना लुगदी लावून कसं बंद करावं, म्हणजे हवा आत नाहीं येणार. व्लादिकने लिहिलंय की खिडक्यांना स्पंजने बंद करणं सर्वांत उत्तम आहे. पण हे मजेदार नाहीये, आणि थण्डीसाठीच्या सम्पूर्ण तयारीबद्दल व्लादिकने फक्त दीडंच पान लिहिलंय! मी ठरवलं की लिहीन, तर एकदम कादम्बरीच लिहीन.

माझ्या पहिल्या कादम्बरीचं शीर्षक आहे “विसरलेल्या आडनावाचा”. त्यांत असं लिहिलं आहे, की कसा एक मुलगा खूपंच बोरहोत होता, तो हॉकी सेक्शनमधे स्वतःचं नाव नोंदवायला चालला होता, पण रस्त्यांत काही कैनेडियन्सने त्याच्यावर हल्ला केला, त्याला खूप मारलं, आणि तो आपली स्मरण शक्तिच गमावून बसला. शेवटी हा मुलगा आपल्या आजोबाला भेटतो आणि त्याची स्मरण शक्ति परत येते. व्लादिक, ज्याने “थण्डीच्या तयारी” नंतर आणखी काहींच लिहिलं नव्हतं, माझी गोष्ट वाचतो आणि मग आम्हीं दोघं बरोबर लिहूं लागतो.

मी तीन खण्डांची कादम्बरी “ इवान – शिकारी आजोबांचा नातू” सुरू करतो, आणि व्लादिक एक थ्रिलर - “सगळ्यांना असंच असायला पाहिजे”ची सुरुवात करतो. जेवढ्या वेळांत तो आपली कादम्बरी पूर्ण करतो, तेवढ्यांत मी फक्त माझी तीन खण्डांची कादम्बरीच नाहीं तर, एक छोटीशी कादम्बरी गद्दारसुद्धां पूर्ण करतो. मग आम्हीं खूपदां “एम्फिबियन मैन” (भूजलचर मानव) नावाची फिल्म बघतो, आणि अचानक आमची ढीगभर पुस्तकं तयार होऊन जातांत. व्लादिकचं – “किरण-मानव”, आणि माझी -  “वायु-मानव”, “चुम्बक-मानव” आणि “धातु-मानव”. किरण-मानव फक्त डोळ्यांनीच कोणच्याही वस्तुला जाळू शकतो. वायु-मानव, जर आपल्या नाकांत स्प्रिंग घालून शिंकला, तर मोट्ठं चक्रवाती वादळ आणू शकतो. चुम्बक-मानव सोन्याला आकर्षित करतो, आणि धातु मानव फक्त खूप शक्तिशाली आणि खूप चांगला आहे. आणि बदमाश लोकं ह्या सगळ्या मानवांचा आपल्या नीच कामांसाठी उपयोग करायचं ठरवतांत, पण, स्पष्टंच आहे, ते ह्यांत सफल नाही होत.

व्लादिकला आपल्या पुस्तकांमधे चित्र काढायला आवडतं, पण माझी ड्राइंग चांगली नाहीये; पण माझ्या नोटबुकच्या मुखपृष्ठावर नेहमी त्या पुस्तकाचे मूल्य, प्रकाशन वर्ष, प्रत संख्या आणि संक्षिप्त विवरण असतं. उदाहरणार्थ “दहा अविजित” ह्या कादंबरीचे संक्षिप्त विवरण असे आहे: “डाकू, समुद्री डाकू आणि इतर लोकांबद्दल कादम्बरी”. आणि माझ्या सगळे नॉवेल्स व्लादिकच्या नॉवेल्सपेक्षां मोठे आहेत. माझी सगळ्यांत छोटी कादम्बरी “सीक्रेट प्लेस” ब्याण्णव पानांची आहे, अनुक्रमणिका धरून, आणि व्लादिकचे नॉवेल्स पन्नास-पन्नास, चाळीस-चाळीस पानांचे आहेत. नॉवेल मोठं असणं माझ्यासाठी खूप जरूरी आहे आणि तो अनेक खण्डांमधे सुद्धां असायला पाहिजे, कारण तेव्हां मला अनुक्रमणिका लिहिणं फारंच चांगलं वाटतं. कधी-कधी तर मी अध्यायांचे शीर्षक आधीच ठरवतो, अनुक्रमणिका लिहून टाकतो आणि तेव्हांच कादम्बरीची सुरुवात करतो.

काही दिवसांनंतर व्लादिकने लिहिणे बंद केले, कारण की, “तसंही काहींच तर छापलं जाणार नाही”. मी व्लादिकला सांगतो की कधी न कधी तर छापतीलंच, आणि समजा नाहींच छापलं तरी आपल्या नोटबुक्संच एखाद्या पुस्तकापेक्षा कमी नाहीत, कारण त्याच्यावर किंमत आहे, प्रत-संख्या आहे, पण त्याला पटवूं शकलो नाही.

आता मी एकटाच “बेलोरशियन लोककथा” लिहितोय.

 

 

 

 

मी आणि व्लादिक – बिज़नेसमैन

 

आमच्या शहराच्या सीमेवर, तिथे, जिथे ट्राम नं. 3 वळण घेते, अचानक एक भंगार-मार्केट उघडतं. तिथे एक-एक रूबलमधे परदेशी च्युईंग गम विकतात, आणि माझ्याकडे आणि व्लादिककडे जसेच पैसे जमतात, आम्हीं तिकडे जातो. भंगार मार्केटमधे नुसतंच च्युईंग गम नाहीं, पण अनेक प्रकारच्या वस्तू विकल्या जातांत, आणि माझ्या डोक्यांत विचार येतो की जर पिठाचे बुटके बनवले, त्यांना गडद रंग दिला आणि त्यांच्यावर लाखेचे कवर चढवले तर लोक हसंत-हसंत विकत घेतील. मी व्लादिकला हा आयडिया सांगतो, आणि थोडं फार नाही, नाहीकेल्यानंतर तो तयार होतो. आम्ही पीठ, मीठ, गडद रंग आणि वेष्टनासाठी लाख विकत घेतो, जो बुटक्यांसाठी लागेल.

भंगार मार्केट फक्त सुट्टीच्या दिवशीच भरतं, आणि शनिवारी संध्याकाळी आम्ही किचनला प्रॉडक्शन-यूनिटमधे बदलून टाकतो. आम्ही बुटक्यांना बेकिंग पैनमधे ठेवतो, पीठ खूब गरम करतो, मग पैन बाहेर काढतो, बुटक्यांना थोडा वेळ गार होऊं देतो, मग त्यांना रंग देऊन झाल्यावर त्यांच्यावर लाख चढवतो. सम्पूर्ण क्वार्टरमधे लाखेचा वास भरून जातो, पण कलेसाठी काहींतरी बलिदानतर द्यावंच लागतं! 

भंगार मार्केटमधे जागा मिळवायला तिथे चार वाजता पोहोचावे लागते. म्हणून बुटक्यांना चिंध्यांच्या डब्यांत व्यवस्थित ठेवून, म्हणजे एकही तुटायला नको, मी आणि व्लादिक, झोप पूर्ण न करतांच पाई-पाई अर्धवट अंधारांत शहरांतून चालत जातो, आणि आमच्या शंभर मीटर्स मागे-मागे तोन्या आजी येते आहे, मी घाबरू नये म्हणून. आम्ही जागा पटकावतो, आणि आमचे बिज़नेस-शेजारी शुभकामना देत आमचं स्वागत करतात. त्यांच्या डोक्यांत हा विचारसुद्धां येत नाहीये की आम्हीं त्यांच्याशी प्रतिस्पर्धा करूं शकूं . खरंय, इकडे-तिकडे बघितल्यावर मला खूप विचित्र वाटायला लागतं, कारण की माझा आणि व्लादिकचा स्टाल इतर स्टाल्सपेक्षा खूपंच दयनीय भासत होता. जरा विचार करा: भला मोट्ठा स्टाल आणि त्यावर उभे आहेत दहा बुटके, आगपेटीच्या साइजचे, जेव्हां इतरांकडे आपल्या सिल्क आणि मखमलसाठी जागा अपुरी होती आणि त्यांना बरंच काही हातांतंच धरावं लागतंय. वरून, थोड्या-थोड्या वेळाने तोन्या आजी येते आणि व्लादिककडून बुटके घेऊन जाते, कारण की मी तिला विकत नाहीये.

पण मग तोन्या आजी कुठेतरी गायबंच होते, भंगार मार्केट आपल्या नावाप्रमाणेच खूप हल्ला करतंय, आणि मी जोरजोरांत ओरडून आणि लोकांना जबर्दस्ती आपले सगळे बुटके विकून टाकतो, आणि शेवटचे दोन – एक रूबलमधे नाहीं, जसं आम्हीं ठरवलं होतं, पण पन्नास कोपेकमधे विकतो, तरीही मी खूप खूश आहे.

व्लादिक पूर्ण प्रयत्न करतो, की त्याच्या बुटक्यांजवळ कोणी येऊं नये. हनुवटी हातांत धरून तो ग्राहकांकडे पाठ फिरवून बसलायं आणि असं दाखवतोय की त्याला इथे एखादी भयंकर गोष्ट होण्याची भीति आहे. मी माझ्या आरड्या-ओरड्याने एखाद्याचं लक्षं वेधलं, तर तो स्वतःला आखडून घेतो आणि बस, स्टॉलच्या खाली घुसायच्यांच बेतांत असतो. मी त्याला समजूं शकतो – कारण आपला माल विकण्यासाठी जेव्हां मी अश्या लोकांचं लक्षंसुद्धां खेचतो, जे हात हलवून देतात आणि पुन्हां-पुन्हां सांगतांत की त्यांना हत्तीमधे कधीच इंटरेस्ट नव्हता.

“हे हत्ती नाहींत, बुटके आहेत!” मी त्यांच्यामागे ओरडतो. “हे बहुमूल्य आहेत, जापानी कारीगरी नेत्सुकेहून कमी नाहीये, कारण ह्यांना हाताने बनवलं आहे आणि फक्त एक-एकंच बनवलं आहे!!!”

हे सगळं सहन करणं प्रत्येकाला जमंत नाही.

आम्हीं बुटक्यांची गोष्ट पुन्हां करंत नाही, पण आमचा बिज़नेस चालूच राहतो. मी रस्त्यावरचे गोटे जमवतो, त्यांना छान धुतो, त्यांना पैकेट्समधे बंद करतो, आणि मण्डईसारखं ओरडून-ओरडून विकतो, “एक्वेरियमसाठी गोटे, थेट बायकालच्या तळातून आणलेली”. खरंच सांगतोय की मी पाच पैकेट्स विकलेत.

मग मी आणि व्लादिक मत्स्य पालनाचं काम करतो, आम्हांला फ्राय-फिश उत्पन्न करून विकायची होती, पण आमच्याकडे नेहमी गप्पीज़’ (रेनबो फिशेज़)च उत्पन्न होतात, आणि नेचरज़ू पार्कमधे तर तसले मासे खूप आहेत.

आइस्क्रीमचा बिजनेसपण बरा चालतो, पण डिपार्टमेन्टल स्टोअरपासून बाज़ारापर्यंत नेता-नेता बॉक्समधली अर्धी आइस्क्रीम वितळून जाते, आणि जी वितळंत नाही, तिच्यातला बराचसा भाग घरच्या लोकांबरोबर स्वतःलाच खावा लागतो.

घरी बनवलेल्या साबणाच्या आठ पेट्या एका सेकन्दात संपतात, कारण बाजारांत साबण कुठेच नाहीये, पण करणार काय, आजोबाच्या गोडाउनमधे फक्त आठंच पेट्या होत्या.

तेव्हां व्लादिकची मम्मा एखाद्या अनुभवी सेल्समैनसारखी अशी व्यवस्था करते, की आम्हीं चैरिटी-फण्डसाठी लॉटरीचे टिकिट्स विकावेत. आम्हीं लेनिन स्ट्रीटवर जातो, जी आमच्या शहरातली मुख्य स्ट्रीट आहे, आणि दिवसभरांत एक तृतीयांश टिकिटं विकतो. हँ, हे सांगून टाकतो, की कोणालांच काही विशेष बक्षिस नाहीं मिळालं, आणि आम्ही विचार करतो की जर उरलेले टिकिट्स उघडले तर जिंकलेली रक्कम, आमच्या मूळच्या रकमेपेक्षां जास्तंच होईल. आम्हीं टिकिट्स उघडतो.

आता मुख्य गोष्ट – चैरिटी फण्डाचा हिशेब वेळेवर द्यायचा असतो, तेव्हांच आम्हांला नवीन बिज़नेस सुरूं करता येईल...

 

 

 

 

 

 

फुटबॉल-हॉकी

“ह्या खट्याळ मुलामुळे मी आपल्यांच घरांत प्रसिद्ध कलाकारांची कॉन्सर्ट नाहीं बघू शकत!” आजोबा कुरकुरतं आहेत, पण तरीही किचनमधे चहा प्यायला निघून जातांत, आणि शेवटी मी टी.वीचं चैनल बदलतोच, मी प्रोग्राम नं. 2वर येतो, जिथे पंधरा मिनिटांपासून फुटबॉल चालू आहे. “स्पार्ताक” – “दिनामो”(कीएव). दसाएव, चिरेन्कोव, रदिओनव, ब्लोखिन, बल्ताचा, मिखाइलिचेन्का, आणि हे न जाणे कोणत्या कलांकारासाठी चिडचिडताहेत!

आमच्या घरी फक्त एकंच टी.वी. आहे, आणि म्हणून, फुटबॉल आणि हॉकीचे सगळे मैचेस बघण्यासाठी, जे अधून-मधूनंच दाखवतांत, मला चार वर्षांचा असतानांच वाचणं शिकावं लागलं. पेपरमधे टी.वी. प्रोग्राम दिलेला असतो – पेपर घ्या आणि स्वतःच बघून घ्या की केव्हां टेलिकास्ट होणार आहे. जर मला वाचतां येत नसतं, तर कोणीही, ह्या कटकटीमुळे, मला सांगितलंच नसतं की एखाद्या कॉन्सर्टच्या वेळेला दुसरीकडे कडे, उदाहरणार्थ, यूरोपियन क्लबचा मैच दाखवतांत आहेत.

आणि मी, फक्त बघतंच नाही. पहिली गोष्ट, म्हणजे, मी ह्या गोष्टीकडे लक्ष देतो की गोल कोण करतोय, कोणच्या प्लेयरने किती अंक बनवलेत, आणि वर, माझी स्वतःची चैम्पियनशिप मैच सुद्धां चाललेली असते, आणि ती चक्क मोठ्या हॉलमधे चाललेली असते, अगदी टी.वी.वर दाखवल्या जात असलेल्या मैचच्या बरोबर-बरोबर. जेव्हां फुटबॉलचा मैच असतो, तेव्हां मी खोलीत बॉल ढकलतो, कॉमेन्ट्री करतो, अगदी ओज़ेरव किंवा पेरेतूरिनसारखा; बाल्कनीचे दार – गोल, आणि ह्या दारावर लावलेला जाळीचा पडदा – गोलची जाळी असते. जर टी.वी.वर गोल होत असला, किंवा काही धोकादायक गोष्ट होत असेल, तर मी आपला खेळ थांबवतो, बघतो, नंतर गालीच्याच्या सेंटरपासून सुरुवात करतो.

“प्रतासव लेफ्ट फ्लैन्कच्या दिशेने चालला आहे! पेनल्टी कॉर्नरमधे कैनपी करायला पाहिजे!” मल आठवतं की नेफ़्त्ची(फुटबॉल क्लब, बाकू)चे प्लेयर्स आज “द्नेप्र”च्या फुटबॉल प्लेयर्स विरुद्ध फार चुकीचं खेळताहेत, मी टाचेने चेंडू मागे मागे ढकलतो, स्वतःच स्वतःला शर्टाने पकडतो आणि जमेल तेवढं खरंखरं पडण्याचा प्रयत्न करतो. “निश्चितंच पेनल्टी, प्रिय मित्रांनो!!! पण माहीत नाही, रेफ़री फक्त एकंच पिवळं कार्ड दाखवतो...

तेवढ्यांत तोन्या आजी येते आणि माहीत नाहीं कितव्यांदा म्हणते, की बाहेर कम्पाऊण्डमधे खेळणं जास्त चांगल होईल. पण मी कम्पाऊण्डमधे सुद्धां खेळतो, आणि मला माहीत आहे की तिथे तीगोष्ट नाहीये. तिथे कॉमेन्ट्री करतां येते कां? हे खरं आहे, की लवकरंच घराच्या आतल्या ह्या चैम्पियनशिप्स बंद कराव्या लागतील, कारण की हॉकीचा सीज़न सुरू होतोय आणि चेकोस्लोवाकियाच्या टीमशी खोलीतल्या मैचमधे फेतिसवने इतक्या जोरांत बॉल फेकली की झुम्बर फुटले. हे कारण, की आमच्या टीमकडे जिंकण्यासाठी फक्त दोनंच मिनिटं शिल्लक होती, आजोबाला मंजूर नाहीये, म्हणून मी आतां फक्त टी.वी.वरंच मैच बघतो.

हरकत नाहीं, हॉकीचा मैच नुसतां बघण्यांत सुद्धां मजा येते. त्यांत सगळे नेहमी भांडतंच असतात! विशेषकरून इण्टरनेशनल मैचेसमधे. आणि वर्ल्ड कप मैचेस, “इज़्वेस्तिया”चे पुरस्कार मैचेस, कैनेडियन कप मैचेस – हे आम्हीं तोन्या आजी बरोबर, आणि कधी कधी पणजी आजी नताशा बरोबर पण बघतो. आम्हांला रेफ़रींच्या अन्यायावर चिडायला खूप आवडतं, ज्यांना कैनेडियन्सची आणि फिन्सची चूक कधी दिसतंच नाही आणि जे नेहमी अन्यायपूर्ण पद्धतीने आमच्या खेळाडूंना आउट करतात. माझ्या आज्यांना तर इतका राग येतो की आमच्या एखाद्या खेळाडूने कधी जर नियम तोडला, तरीही त्यांना कैनेडियन्सचीच चूक दिसते, आणि जरी मला माहीतेय की आमच्या खेळाडूवर चुकीमुळेंच दंड बसला आहे, तरीही मला त्यांचे हे मत, कोण जाणे कां, बरोबर वाटते.

मग अचानक हॉकी रात्री दाखवूं लागतात. तोन्या आजी न झोपण्याचा प्रयत्न करते, म्हणजे सकाळी खेळाबद्दल मला सांगता येईल. पण तिसरा सेक्शन येतां-येतां ती नक्की झोपून जाते, म्हणून सकाळी तिला स्कोरसुद्धां माहीत नसतो, आणि टी.वी.सुद्धां रात्रभर उघडांच राहतो.

तेव्हां मी ठरवतो की मी स्वतःच मैचेस बघेन, आणि दिवसा झोपून घेत जाईन, म्हणजे रात्री माझा डोळा नाहीं लागणार. आपल्या बिछान्यावर लोळंत पडतो, कधी कधी तर दीड तास पडून राहतो, पण एका सेकंदासाठीही डोळा लागत नाहीं, मग काहीही झालं तरी हॉकीची मैच संपेपर्यंत बसूनंच राहतो. नाहीतर दुपारचं लोळणं वायाच जाईल, आणि दिवसां पलंगावर दीड घण्टा पडून राहणं – माफ़ करा, मला तरी शक्य नाहीये! पण जर सोवियत संघ आणि स्वीडनच्या टीम्समधे मैच होत असेल, तर शेवटपर्यंत कसा नाहीं बघणार? जर पहिल्या सेक्शन नंतर स्कोर 3:0 किंवा 5:1 असेल, तर, ह्याचा अर्थ हा झाला की आमची टीम निश्चितंच 10:1 ने जिंकणारे. असं, कमीत कमी नऊ वेळां झालं. एकदांतर आजोबापण रात्री उठून बसले आणि हे बघून की आम्ही कसे स्वीडन विरुद्ध लागोपाठ पाच गोल केले, गर्वाने म्हणाले:

“असा असायला पाहिजे मैच! मला सुद्धां इंटरेस्ट वाटला.”

जरा थांबामी विचार करतो, ‘तुमच्या आर्टिस्ट्सच्या कॉन्सर्टपेक्षां वाईट तर निश्चितंच नाहींये.

 

 

माझे आजोबा मोत्या, पर्तोस आणि पालनहार....  

मी आणि तोन्या आजी हळू-हळू आपल्या मरीना रास्कोवाया स्ट्रीटवर परत येतोय.

जेव्हां आम्हीं आमच्या पोर्चपर्यंत पोहोचलो, तेव्हां मी म्हटलं, “चल, पर्तोसची वाट बघूया.”                  

जेव्हां पासून टी.वी.वर डीअर्तन्यान एण्ड थ्री मस्केटीर्स” ही फिल्म दाखवली होती, मी आजोबाला ह्याच नावाने बोलावूं लागलो. आजोबाचा चेहरा अगदी पर्तोस सारखाच आहे आणि जर त्यावर बाजूला एक पोनीटेल बांधली, तर बिल्कुल दुसरा पर्तोसंच वाटेल! आणि तसंही आजोबांना ह्या नावाने बोलावलेलं आवडतं. त्यांना माहीत आहे की ह्या फिल्ममधे मला पर्तोस कित्ती आवडला होता.

“ठीक आहे, पाहूंया वाट,” तोन्याने उत्तर दिलं. “पण, फक्त आपल्या आजोबांची, पर्तोसची नाहीं.”

अरे, ते पर्तोसंच तर आहेत!”

“त्यांना ह्या नावाने बोलवायची काही गरज नाहीये,” आजी शांतपणे बोलतेय, पण ह्या शांतपणामुळेच कळतं की तिला किती वाईट वाटतंय – तिला वाटतं की मी आजोबाला चिडवतोय, खरं म्हणजे चिडवण्याबद्दल मी विचारसुद्धां करत नाहीं. “ते काल मला सांगत होते की इलीच आला होता, त्यांचा खूप जुना मित्र, आणि तू सरळ इलीचच्या समोरंच आजोबाला पर्तोस म्हटलं...आजोबा एवढ्या मोठ्या हुद्द्यावर आहेत, इतक्या लोकांना ओळखतात...आणि ते आपले पालनहार सुद्धा आहेत, पर्तोस नाही.”

“हे पालनहार म्हणजे काय असतं?” मी विचारतो.

“ते आपल्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतात. मी ती सर्कसकार तुझ्यासाठी विकत घेतली. नऊ रूबल्सची आहे, आणि मला पैसे कोणी दिले, काय वाटतं, आजोबाने नाही, तर कोणी दिले?”

आणि तेवढ्यांत आजोबा दिसतांत. जुना कत्थई सूट घातलेले, जैकेट उघडं आहे, कारण पोटावर बसंत नसेल; डोक्यावर फिक्कट पिवळी कैप नव्हती, आणि आजोबांचे उरले-सुरले भुरे केस हवेत उडंत होते; घाणेरडे, कदाचित सूटापेक्षांही जास्त जुने जोडे घातलेले आजोबा येत आहेत; चेहरा हसरा (त्यांने दुरूनंच मला आणि आजीला बघितलं होतं), ते बहुधा, जवळ-जवळ सगळ्याच लोकांना बघून, जे ह्यावेळी कम्पाऊण्डमधे आहेत आणि आजोबाला नमस्कार करताहेत, मंद मंद हसताहेत.

आणि मला अचानक इतका आनंद होतो, की माझे आजोबा येताहेत, आणि आता आम्हीं घरी जाणार, आणि, कदाचित व्लादिक येईल, आणि आजोबा आमच्याबरोबर पत्त्यांचा खेळ झब्बू खेळतील! म्हणजे असं, की मी सम्पूर्ण कम्पाऊण्डमधे पळत सुटतो आणि जोराने ओरडतो:

“आ-जो-बा!!! पा-आ-लन-हार!!! पा-आ-आ-लनहार!!!!”

कम्पाऊण्डमधे असलेले सगळे लोकं वळून बघतांत; मी उडी मारून आजोबांच्या खांद्यावर चढून जातो, आणि ते फक्त येवढंच पुन्हां पुन्हां म्हणतांत: “अरे, हल्ला कां करतोस? लोकं आहेत! लोकं आहेत! कां ओरडतोयस?!” (आजोबा, माहीत नाही कां, “हल्ला कां करतोयस”च म्हणतात, ते “किंचाळतो” किंवा डरकाळ्या फोडतो” सुद्धां म्हणू शकतांत.)

मग, जेव्हां आम्हीं जीना चढतो, तेव्हां आजी आजोबाला समजावते, की तिनेच मला असं सांगितलंय की आजोबा पालनहार आहेत, पर्तोस नाहींत, पण आजोबा आपल्यांच स्टाइलमधे क्वैक-क्वैक करतांत, की “आजीला काही काम-धाम नाहीये”.

आणि सकाळी तर, आह सकाळी! शेवटी ते घडतंच, ज्याची मी केव्हांपासून वाट बघतोय, म्हणजे, ज्याचं खूप आधी आजोबानी प्रॉमिस केलं होतं.

आजोबा सकाळी सहा वाजता मला उठवतांत आणि विचारतांत की त्यांच्या बरोबर ऑफ़िसला यायचंय कां, किंवा अजून काही वेळ झोपायचंय? अफकोर्स, मला जायचंच आहे, तसंही, जेव्हां आजोबा ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतांत, तेव्हां मी उठूनंच जातो, ते मला आपल्या बरोबर नेतील किंवा नाहीं ह्याचा विचार न करतां. आणि आता तर – ओहो! मी बिछन्यातून उठंत नाहीं, उडीच मारतो आणि तीनंच मिनिटांत किचनमधे बसून जातो, कारण की मला आजोबाला दाखवायचं आहे की जेव्हां वेळ येईल आणि मला रोज ऑफिसमधे जावं लागेल, तेव्हां मी व्यवस्थित सगळं करेन, काहीच गडबड न करता.

आमच्या लोकल स्मोलेन्स्क रेडिओचे प्रोग्राम लागोपाठ चालतंच असतांत, जसं “धान्य पर्याप्त होईल”, “मुलं पूर्वीपेक्षां जास्त चांगल्या प्रकारे विश्रांति घेतांत”; फ्राय पैनवर लोणी तडतडतंय आणि इकडे तिकडे उडतंय; फ्रिजमधून सगळ्या वस्तू बाहेर काढल्या आहेत, कारण आजीला वाटतं की आम्हीं कदाचित आधी नाही म्हटलेला एखादा पदार्थसुद्धां खाऊं शकतो (जरी तिला माहीत असलं, की आमची 13नंबरची बस पंधरा मिनिटांनी सुटणार आहे), हे मी आणि आजोबा ब्रेकफास्ट करतोय. मला आश्चर्य वाटतं की आजी ह्या फ्राय पैनवर सगळंच कसं करूं शकते, जेव्हां तेथून चारीकडे आणि तिच्या हातांवरसुद्धां गरम लोणी उडतंय, आणि ती असं दाखवंतसुद्धां नाही की तिला भीति वाटतेय, किंवा दुखतंय, आणि मग मी फ्राइड

 

अण्डा खातो, बिल्कुल आजोबांसारखाच – जसे ते अण्ड्याचा पिवळा भाग पसरतात, आणि नंतर ब्लैक-ब्रेडच्या तुकड्याने प्लेटमधे एकत्र करतांत.

आणि बसमधे, आणि ट्राममधे आजोबा आपल्या परिचित लोकांशी भेटतांना माझ्याकडे बोट दाखवून सगळ्यांना सांगतात: “हा आमचा लहाना...”

एकीकडे तर मला फार्मास्यूटिकल गोडाउन खूप घाणेरडं, अस्तव्यस्त आणि जर्जर वाटतं, पण दुसरीकडे असंही वाटतं की हीच अस्ताव्यस्तता, इकडे-तिकडे विखुरलेल्या इंजेक्शनच्या लहान-लहान बाटल्या, बोळे, कागद आणि सगळ्या प्रकारचा कचरा, ह्यामुळेंच तुम्ही विचार करूं शकतां की फार्म्यास्यूटिकल-गोडाउनमधे गंभीर प्रकाराचं काम होत असतं...

काही जरूरी फोन केल्यावर, आजोबा मला आपल्याबरोबर नेतात, हे बघायचं असतं की ट्रक्स व्यवस्थितपणे चालले तर आहेत नं. मजूर कोण्या इवानची वाट पहाताहेत, जो असल्याशिवाय काम सुरूं नाहीं करता येत, आणि जेव्हां आजोबाला कळतं की इवान अजून आलेला नाहीये, ते आपल्या हाताखालच्या लोकांना समजावतांत की हा इवान खरं म्हणजे कोण आहे. ते अश्या शब्दांमधे समजावतांत, ज्यांची मला त्यांच्याकडून जरा सुद्धां अपेक्षा नव्हती. पण पहिली गोष्टं, मजूर तयार होतात, आणि दुसरी, मला स्वतःला सुद्धां आवडतं की माझे आजोबा असे शब्दसुद्धां वापरू शकतात. मी तर, खरं म्हणजे, खूप आधीपासून त्यांना ओळखतो.

आणि शेवटी, जेव्हां फार्म्यास्यूटिकल-गोडाउनमधे बसल्या-बसल्या मी थकून जातो, तेव्हां ह्या गोडाउनचे डाइरेक्टर, म्हणजे माझे आजोबा, मला ट्राममधे बसवून घरी पाठवतांत. त्यांत काय आहे? “जुबिली” स्टॉपपर्यंत जाईन, आणि तेथून पाच मिनिट चालंत जाईन – बस, मी घरी पोहोचून जाईन...

 

 

 

 

 

पुन्हां पणजीआजी नताशा आणि फाइनल...

 

हे तेंच 1986 आहे, माझ्या जीवनांतील तोच महत्वपूर्ण फुटबॉल मैच – वर्ल्ड चैम्पियनशिप-मैच, जेव्हां मरादोनाने हातानी गोलबनवला होता आणि सगळ्या रेफरीज़ने त्याला हे स्वीकार करंत माफ़ केलं होतं की हा देवाचा हात आहे; ही तीच चैम्पियनशिप होती, ज्यांत प्लेटिनीने सेमिफाइनलमधे निर्णायक पेनल्टी ठोकून दिली होती, - तोच, तोच!...स्पष्टंच आहे की मी लागोपाठ सगळेच मैचेज़ बघतो, संपूर्ण महिनाभर टी.वी.पासून दूर नाही हलंत. खोलीतल्या माझ्या मैचेज़ला पण पुढे सरकावून टाकतो, आणि जेव्हां फ़ाइनल होईल, तेव्हां मी अगदी हिरवा स्क्रीन होऊन जाईन आणि स्टेडियममधे असलेल्या फैन्सबरोबर ओरडेन!

आणि, आजी, ही आहे, खरोखरची सेन्ट जॉर्ज डे ची फ़ीस्ट!

टी.वी. चालू करतो, अगदी शानमधे, बिल्कुल आजोबासारखा, खुर्चीत बसतो, तिला टी.वी.जवळ सरकवतो, अशा प्रकारे की खुर्ची आणि चमचम करणारा हिरवा स्क्रीन, ज्याच्यावर छोटे-छोटे लोक धावतात आहे, एकमेकांपासून फक्त दीड मीटर दूर असेल. आणि काय?

कॉमेन्टेटर बोलायला सुरुवात करतो, आणि खोलीत चुपचाप माझी पणजी आजी नताशा घुसते.

आज तिचा मूड बरोबर नाहीये – हे मला असं कळलं, की तिचा नेहमीचा व्यवस्थित बांधलेला डोक्यावरचा रुमाल आज सरकलेला आहे, आणि ओठ एक डेंजरस त्रिकोण बनवतांहेत. वरून ती काही तरी सुडसुडसुद्धा करतेय; म्हणजेच – संकटाची वाट बघा.

“अरे,” नताशा म्हणते, “चल, टी.वी.ला थोडा आराम करूं दे!”

मला चांगलंच कळतंय की ह्या “टी.वी.ला थोडा आराम करू दे”चा अर्थ माझ्यासाठी काय असतो! मी महिन्याभरा पासून ह्या फायनलची वाट बघत होतो, आणि सकाळ झालीये, झोपूं शकत नाही, आणि अशा प्रसंगावर तर मी रात्रीसुद्धां नाही झोपंत, - आणि हे अचानक “चल...” सांगा आता!

“पण हा तर,” मला इतका राग आला की माझ्या सगळ्या नसा तडतडूं लागल्या, “फायनल मैच आहे! मरादोना खेळणारे, तिगाना, प्लातिनी, रोझ्तो...”

जेवढ्यांना मी ओळखंत होतो, त्या सगळ्यांची नावं मी सांगितली, पण नताशानी ठामपणे टी.वी.बंद करून टाकला, आणि मग पुढे असं झालं: ती – स्टैण्डच्या जवळ उभी राहून त्या दुर्दैवी बॉक्सला वाचवतेय, आणि मी तिला ढकलतो आणि टी.वी. पुन्हां चालू करतो. असं बरेचदां झालं: मी चालू करतो, ती बंद करते – आणि मग स्टैण्डजवळ आमची दंगल सुरूं झाली. वरून, नताशाला तर जणु मजाच वाटंत होती, आणि मी मात्र रागाने पेटंत होतो. फक्तं अशासाठी नाही की फ़ायनल मैच होता, तर अशासाठी की मला टी.वी. न पाहूं देणं इतकं सोपं आहे. नताशा जितकी आक्रामक होत होती, तेवढांच मी सुद्धां वैतागंत होतो, आणि माझ्या एका जोरदार धक्क्याने पणजी आजी हळू हळू सोफ्यावर पडू लागली, तिचे डोळे हळू-हळू गोल-गोल फिरूं लागले, आणि ती चित झाली, तिचा उजवा हात निर्जीवपणे एकीकडे लटकला. बस, सत्यानाश...फायनल बद्दल मी, खरंच, विसरूनंच गेलो, नताशाला कृत्रिम श्वास देण्याचा प्रयत्न करतो, जसं मला व्लादिकने शिकवलं होतं, पण काहीच उपयोग होत नाहीये...

पोलिसांत फोन करूं का, की मी पणजीआजीला मारून टाकलंय?

शरीरांत – हृदयाच्या जवळ “गार” वाटूं लागलं, आणि ह्या “गारठ्यामुळे” माझे दातसुद्धां किटकिट करूं लागतात; आणि तेवढ्यांत दाराच्या मागून पैकेट्सची सर् सर् ऐकूं येते – ही तोन्या आजी आलीये, डिपार्टमेन्टल स्टोअरमधून, तिला मी काय सांगणारेय?

पण मी काही म्हणायच्या आधीच तोनेच्का आनंदाने आत येते आणि सांगते, की तिने कण्डेन्स्ड मिल्कचे तब्बल तीन डबे आणले आहेत आणि ती त्यांना आटवून पेढे बनवणारेय, जे मला बासुंदीपेक्षां जास्त आवडतात.

“फक्त येवढं कळंत नाहीये, की सगळे डबे एकदमच आटवू की आधी दोन आटवून मग तिसरा आटवूं?”

मी आपराधिक भावनेने हे सांगण्यासाठी तोंड उघडलंच होतं, की दुधासाठी थैन्क्यू, पण मी चुकून नताशेन्काला मारून टाकलं आहे; नताशेन्का आपली पोज़ न बदलतां, जोरांत, पूर्ण फॉर्ममधे, थांबून-थांबून म्हणते:

“दोनंच उकंळ – आटंव, तीन डब्यांनी जास्त चिक्कट होतील!”

जिवन्त आहे! “गारठा” वितळूं लागतो, दातांची किटकिट थांबली; फायनलची आठवण येते, आणि पेढ्यांच्या कल्पनेने तर मला आनंदाच्या उकळ्याच फुटू लागतांत. नताशा बडबडंत उठली की ती प्योत्र इवानोविचकडे चालली आहे (ती टॉयलेटला प्योत्र इवानोविच म्हणते) आणि खोलीतूंन निघून गेली, जणु काही झालंच नव्हतं...(येवढं फक्त मला घाबरवण्यासाठीच सहन केलं होतं!)

मी ठरवलं की नताशाची गोष्ट कुणालांच नाही सांगणार, मी आणि तोन्या आजी फायनलचा शेवट बघतो, आजी पेनाल्टीला “पेनाल्चिक” म्हणते आणि मी कितीही समजावलं, की असा कोणताच शब्द नाहीये, फक्त “पेनाल्टी” आहे, तरी ती समजतंच नाही, “पेनाल्चिक कशाला”.

संध्याकाळी चहा पिताना, इतर गोष्टींबरोबरच, मी नताशाशी झालेल्या भांडणाबद्दल सांगतो. आजोबा क्वैक-क्वैक करंत म्हणतात, की “एक म्हातारी कशी पोट्ट्याला वेडं करूं शकते”, आणि मग ते न्यूज़येईपर्यंत (म्हणजे, प्रोग्राम व्रेम्यासुरू होई पर्यंत) फोर्श्माक(खीमा – अनु.) (एक पक्वान्न, जे आजोबाला बनवतां येतं, आणि जे बनवणं त्यांना आवडतं), तयार करून ठेवतील, म्हणजे आम्हांला किचनमधून बाहेर निघायला पाहिजे.

पण मी नाही जात, उलट आजोबांना म्हणतो की न्यूज़च्या नंतर आपण पत्ते खेळूं. आणि जर त्यांना वाटलं, तर ते मला प्रेफेरान्सखेळणं शिकवूं शकतात. हे मस्तंच होईल! नाहीं तर जेव्हां आमचे सगळे आजोबा (माझे आणि व्लादिकचे) खेळायला सुरुवात करतात, आणि त्यांच्यासोबत व्लादिक आणि त्याचे पप्पा पण खेळतात, तेव्हां मला कळतंच नाही की काय करावं. पण आता, कदाचित्, जेव्हां मी शिकून घेईन, तेव्हां मी पण सहजपणे खेळू शकेन.                                 

     

 उपसंहार       

 

...मी आणि तोन्या आजी संध्याकाळी उशीरा, जवळ-जवळ रात्रीच समर कॉटेजमधून परत येत आहोत. जूनचा महिना आहे. अंधार होऊं लागला आहे, जरी ह्या काळांत सर्वांत मोठे दिवस असले तरी. दुर्गंध सोडणारी नदी पार करून टेकडीवरून खाली उतरतो आणि बघतो काय, की आम्हांला भेटायला आजोबा येत आहेत, ते घरी नाहीं थांबू शकले, कारण की त्यांना काळजी वाटंत होती: न्यूज़ प्रोग्राम व्रेम्यामधे घोषणा केली होती, की सर्वांत भयंकर वादळ येणार आहे. आजोबा कितीदांतरी म्हणाले, की आम्हांला वेड लागलं आहे, नाहीतर अकरा वाजेपर्यंत बगिचांत नसतो बसलो, आणि आजी त्यांना उत्तर देणारंच होती, की तेवढ्यांत ते वादळ आलंच. विजांचा कडकडाट, घोंघावणारे वारे, सगळ्या वस्तु थरथरंत होत्या, आणि मला भीति वाटंत होती आणि आनंदही होत होता, आणि एका सेकंदातंच आमच्या अंगावरचे सगळे कपडे चिंब झालेले होते.

मिलिट्री एरियाच्या अरुंद पायवाटांवरून आम्हीं एका झुण्डांत धावतो; तोन्या आजी आणि आजोबा खो खो हसताहेत, हे बघून की मी कसा आपले सैण्डल्स आणि मोजे काढून पाण्याच्या डबक्यांत छपछप करतोय. मला पण त्यांना हसवणं आवडतं: मी डान्स करूं लागतो, आणि जोरजोरांत “डिस्को डान्सर” मधलं माझं आवडतं गाणं म्हणूं लागतो:  “गोरों की ना कालों की-ई-ई! दुनिया है दिलवालों की. ना सोना-आ! ना चांदी-ई! गीतोंसे-ए, हम को प्या-आ-आ-र!!!” (गाण्याचा अर्थ असा आहे – खायला प्यायला आमच्याकडे पुरेसे पैसे नसूं देत, पण स्वातंत्र्य आणि गाणं – हीच माझी दौलत आहे). जेव्हां आम्हीं आपल्या कम्पाऊण्डमधे पोहोंचतो, तरीही मी गातंच असतो, पण इतक्या जोरदार आवाजांत की शेजारी-पाजारी खिडक्यांमधून पाहूं लागतात; पण मला काही फरक पडंत नाही – उलट आणखी जास्त गाण्याची आणि डान्स करण्याची इच्छा होऊं लागते.

घरी गेल्यावर आम्हीं यूडीकलोनने आंघोळ करूं, म्हणजे नंतर आजारी नाही पडणार, मग आम्ही पैनकेक्स खाऊं, पणजीआजी नताशाने सकाळीच पेनकेक्स बनवण्याचं प्रॉमिस केलं होतं, आणि उद्या आहे सण्डे, व्लादिक येईल आणि आम्हीं अभ्यासाव्यतिरिक्त आणखी एखाद्या आयडियाबद्दल विचार करूं, जसं बुटक्यांचा बिज़नेस करणं किंवा एखादी कादम्बरी लिहिणं...

काही महिन्यांनी मी नेहमीसाठी स्मोलेन्स्क सोडून निघून जाईन, जिथे हे सगळं, तुम्हांला सांगितलेलं, झालं होतं. एका नवीन जीवनाचा आरंभ होईल, नवीन हीरोज़सोबत, नवीन एडवेन्चर्स बरोबर, ज्यांच्याबद्दल मी इथे काहींच सांगणार नाही, कारण त्याच्यासाठी वेगळ्या पुस्तकाची गरज आहे. कदाचित्, ते जास्त गंभीर, जास्त दुखी असेल...आणि हे पुस्तंक, जर तुम्हांला हसवणारं, आनंद देणारं जमलं असेल, तर ह्याला इथेच संपवणं जास्त चांगलं आहे. मला विश्वास आहे, की पुन्हां असा काळ येईल जेव्हां आम्हीं आनंदाने बागडंत सिनेमा थियेटर्समधे जाऊं आणि इण्डियन फिल्म्स बघूं. तेव्हां मी नवीन एक्टर्सवर पण तेवढंच प्रेम करूं शकेन, जसं मी मिथुन चक्रवर्तीवर आणि अमिताभ बच्चनवर केलंय, आणि पुन्हां पावसांत अनवाणी पायांने डान्स करतांना इण्डियन गाणी म्हणेन, शेजारी आपाआपल्या खिडक्यांमधून आश्चर्याने बघताहेत, बघूं देत आणि आश्चर्य करूं देत – अगदी तसंच, जसं कित्येक वर्षांपूर्वी झालं होतं...

         

 

 

 

परिशिष्ट

 

आन्या आण्टी आणि इतर लोकं...

(माझ्या बिल्डिंगच्या काही लोकांबद्दल)

 

आमच्या मजल्यावर आन्या आण्टी राहते, तिला मी आणि मम्मा माहीत नाहीं कां, शेपिलोवा म्हणूनंच बोलावतो. शेपिलोवा तिचे आडनाव आहे. हे आडनाव तिच्यावर अगदी चपखल बसतं, ते ह्या चांगल्या बाईच्या चांगुलपणाला व्यवस्थित प्रकट करतं.

तर, ती खूप फास्ट आणि चतुर आहे, उँची जवळ-जवळ एकशे सत्तावन से.मी. होती (तिने स्वतःच सांगितलं होतं), ती खूपंच रोड होती; चंचल, तीक्ष्ण, उत्सुक डोळे आणि बारीक असले तरी खूप मजबूत हात होते तिचे. हात तर तिचे खरंच खूप मजबूत होते, कारण की ती रोज खूप लांबून खाण्यापिण्याचे सामान आणि भाजी पाल्याने भरलेल्या, आणि देव जाणे आणखीही काही काही वस्तूंनी भरलेल्या मोठ्या मोठ्या पिशव्या आणायची. हे सगळं कोणकोणत्या आण्टीज़साठी आणि अंकल्ससाठी, आजोबांसाठी आणि आजींसाठी असायचं ज्यांना ती ओळखायची, किंवा फक्त ओळखीच्या लोकांसाठीसुद्धां असायचं. आन्या आण्टी त्यांना मदत करते, कारण, ते “कठिण परिस्थितीत जगताहेत”.

तसं मी आणि मम्मा तर कठीण परिस्थितीत नाहीं जगंत, पण शेपिलोवाच्या मते आम्हांला सुद्धां मदतीची गरज आहे, कारण की आम्हीं सारखं काम करतो. आणि ती आमच्यासाठी बाजारातूंन भाजी पाला, फळं आणि अशी प्रत्येक वस्तू घेऊन येते, ज्याची तिच्या मताप्रमाणे आम्हांला गरज असते. पैशे आम्हीं देतोच, पण मी सारखा विचार करतो की मी स्वतःसुद्धां, बरेंचदा बाजारात जाऊन काकडी आणि टॉमेटो आणू शकतो. पण आन्या आण्टीचं मत वेगळंच आहे:

रचनात्मक प्रक्रियेसाठी सम्पूर्ण समर्पणाची आणि आंतरिक शक्तींना एकाग्र करण्याची खूप गरज आहे!

म्हणजे, आमच्या शेजारणीला असं वाटतं की जर मी दिवसाचा थोडा अंश गोष्ट किंवा लघु उपन्यास लिहिण्यांत घालवतो, तर उरलेल्या वेळांत टॉमेटो विकत घेण्यांत काहीच अर्थ नाहीये. मी तिच्याशी वाद घालायचो, पण तो फुकटंच असायचा. आन्या आण्टी हट्टी आहे, अगदी लोखण्डासारखी. तिला वाकवणं शक्यंच नाहीये. आणि ती नेहमी आपलंच खरं करते, कोणत्याही परिस्थितीत.

आतां उदाहरणंच द्यायचं तर हे बघा. काही दिवसांपूर्वी मम्माने आन्या आण्टीला म्हटलं की काही गरम जैकेट्स आणि आणखी काही सामान आपल्या अश्या परिचितांसाठी घेऊन जा, जे खूप धनाढ्य नाहीयेत, ज्यांना त्याचा उपयोग होईल (तुम्हांला तर माहीतंच आहे की शेपिलोवाची कित्ती तरी लोकांशी ओळख आहे). पण स्वतः आन्या आण्टीलाच ते राखाडी रंगाचं जैकेट खूपंच आवडलं. तिने ठरवलं की ते जैकेट स्वतःसाठीच ठेवायचं. आणि रविवारी सकाळी, जवळ-जवळ साडे आठ वाजतां, आम्हीं झोपेतंच असतांना दारावरची बेल वाजते.

“तानेच्का, ही मी आहे,” दाराच्या मागून शेपिलोवा ओरडते.

माझी मम्मा, जिचं नाव तान्या आहे, दार उघडते.

“मी तुम्हांला उठवलं तर नाहीं नं?! नाहीं! मी आत्तांच बाजारांतून आलेय, हे घ्या काकड्या, टॉमेटो, संत्री, एपल्स, आंबट कैबेज! ठेऊन घ्या. आणि ते, राखाडी जैकेट, मी स्वतःसाठी ठेवायचं म्हणतेय, चालेल? मी त्याच्यासाठी तुम्हांला पैसे देणारेय. नक्कीच देणार, कारण की ते लोकरीचं आहे, महागडं आणि मस्तं आहे!”

आणि काही बोलायची उसंत न देता एक हजार रूबल्स पुढे केले, त्या जुन्या जैकेटसाठी, ज्याची मम्माला काहींच गरज नव्हती, आणि त्याच्यासाठी शेपिलोवाकडून पैसे घेणं चूकंच झालं असतं.

“कसले पैसे!” मम्माला पण राग आला. “आन्या! असा विचार पण करूं नकोस! मी असंच सगळं देऊन टाकलं होतं, त्या एकदम निरुपयोगी वस्तू आहेत!”

“पण जैकेट तर सुरेख आहे!” आन्या आण्टीने आवाज़ चढवंत म्हटलं, तिला वाईट वाटलं होतं, आणि ती वाद घालू लागली. “कमीत कमी पाचशे तरी घ्या!”

“नाहीं!”

“तीनशे!”

“नाही!” माझी मम्मा ह्या हल्ल्याने गडबडून गेली.

“एकशे घेऊन घ्या, प्लीज़!”

“बस, आन्याआण्टी,” मी मधेच टपकलो. “इथून जा, प्लीज़. थैंक्यू वेरी मच.”

निराश होऊन ती दाराकडे जाते, पण लैच फिरवायच्या आधी वळून सांगते:

“हरकत नाहीं. मी आणखी काही विचार करीन.” आणि तिने विचारमग्न होऊन डोकं हलवलं.

 

सोमवारी संध्याकाळी एक मोठ्ठा, कदाचित एक लिटरचा, लाल कैवियरचा (स्टर्जन माशाच्या अण्डाच्या एक पदार्थ) डब्बा घेऊन येते, आणि धमकी देतं पैसे नाहीं घेत की अश्याने आपली दोस्ती संपेल. ह्या कैवियरची किंमत, माझ्या मते एक हज़ारापेक्षां जास्तंच असेल. आन्या आण्टीने आपलं म्हणणं खरं केलंच, आणि तुम्हीं समजलेच असाल की तिने जैकेटची किंमत चुकवली...

 

आन्या आण्टीकडे आपण पुन्हां जरूर येऊं, कारण ती आमची खूप जवळची शेजारीण आहे, असं म्हणूं शकतो, आणि शिवाय ह्या गोष्टीची मुख्य हीरोइन आहे. पण आधी आणखी काही हीरोज़ला भेटूं या.

तिस-या मजल्याचा यारोस्लाव. ओह, हा आजकालच्या हाउसिंग सोसाइटीज़च्या तरुणांचा ज्वलंत प्रतिनिधी आहे. रोमा ज़्वेरने कदाचित आपलं गीत “स्ट्रीट्स-अपार्टमेन्ट्स” कदाचित रशियन स्ट्रीट्स आणि अपार्टमेन्ट्सच्या अश्याच लोकांसाठी लिहिलं आहे...

यारोस्लाव – ईडियट आहे. काम-धाम नसलेला तरूण, ढीग भर खतरनाक आणि, मी तर म्हणेन, अत्यंत खतरनाक सवयी आहेत त्याला, सदा खूष असतो, भांडकुदाळ आणि आपल्या कधी लहान, तर कधी लांब केसांना इंद्रधनुष्याच्या वेगवेगळ्या रंगांत रंगतो. तो तसल्याच प्रकारच्या तरूण मुलं आणि मुलींच्या ग्रुपचा सदस्य आहे, त्यांच्यातील काही जणं आमच्या, आणि काही शेजार-पाजारच्या बिल्डिंग्समधे राहतात, आणि हा ग्रुप नेहमी रात्री दहाच्या नंतर आमच्या मजल्यावरच्या गार्बेज-पाइपजवळ जमा होतो. असं वाटतं की यारोस्लाव आणि त्याच्या मित्रांचा काही विशिष्ट वर्तुळांत चांगलाच दबदबा आहे, कारण, मॉस्कोच्या विभिन्न भागांतले लोकं बरेचदां, सग़ळ्यांसाठी साडेसाती म्हणून आमच्या बिल्डिंगमधे येऊन धडकायचे, फक्त वेळ चांगला घालवायला.

रात्री दोन पर्यंत बिल्डिंगमधे हल्ला-गुल्ला चाललेला असतो, हसण्याचे आणि ओरडण्याचे आवाज़ ऐकू येतात. तरूण मुलं आणि मुली जीवनाच्या प्रवाहांत वाहवंत जातात. बिल्डिंगमधे राहणारे, ज्यांत मी पण होतो, सुरुवातीला तर शांततेसाठी त्यांच्याशी भांडायचा प्रयत्न करायचे, पण नंतर थांबूनच गेले. पहिली गोष्ट, म्हणजे – हे व्यर्थच होतं, आणि दुसरी, कारण की, यारोस्लाव आणि त्याचे मित्र फक्त ओरडणारे आणि खिडक्यांचे काच फोडणारे डाकू-बदमाशंच नव्हते. म्हणजे, खिडक्यांचे काच ते फोडायचेच, आणि आमचा मजल्यावरचा काच कित्तीदां बेदम मार खाऊन तडकून फुटलेला आहे, पण आश्चर्याची गोष्ट ही आहे, की नंतर यारोस्लाव आणि त्याचा खास मित्र वाल्या च्योर्नी न विसरतां नवीन काच फिट करून द्यायचे. शिवाय, आपल्या बैठकीनंतर यारोस्लाव सकाळी केरसुणी घेऊन गार्बेज-पाइपच्या जवळची जागा व्यवस्थित स्वच्छ करून टाकायचा. आणि काही दिवसांपूर्वी तर ह्याचं उलटंच घडलं: रात्रभर धिंगाणा घातल्यावर, आनंदाने आणि उत्तेजनेने बेफाम झालेल्या ह्या तरुणांना शांत करायला आलेल्या लोकांबरोबर बाचाबाची झाल्यावर, यारोस्लावने सकाळी-सकाळी बाहेर येऊन बिल्डिंगच्या प्रवेश द्वाराजवळच्या खिडकीवर बियरचा डबा, किंवा असली कोणतीही वस्तू न ठेवतां कुंडीत लावलेलं एक खरोखरचं फूल ठेवलं! हे खरोखरंच “धूल का फूल” होतं!

फूल विचित्र तर होतंच, आणि यारोस्लावने त्याला कुठून शोधून आणलं – माहीत नाहीं. ते एक मद्दडसं, कदाचित मरगळलेलं फूल होतं, किंवा त्याला कोणी चावून टाकलं होतं, जुन्या कुंडीत लावलेलं होतं, पण अगदी ताज़ं होतं आणि उमललं होतं, कुठेही लक्ष न देतां. उमललं होतं! जेव्हां मी एकदा बघितलं की यारोस्लाव फुलाच्या रोपट्याला पाणीसुद्धां घालतोय, तर मला बिल्कुल राग नाहीं आला. खरंय, सौंदर्याला पण कुठल्या कचराकुंडीत आपला विसावा सापडतो!

मी आणि यारोस्लाव एकमेकाला फक्त हैलोच म्हणतो, ह्याने आमच्यातील संवाद सीमित होऊन जातो. त्यावेळेस मी त्याला फुलाबद्दल म्हटलं होतं, की, फक्त तोच ह्या बिल्डिंगला असं करून टाकतो, की आंत घुसायला सुद्धां भीति वाटते, आणि मग तिथे फूल लावतो, पण यारोस्लाव हसंत-हसंत, ओरडंत, खूप अर्थपूर्ण आवाजांत म्हणाला: “बिज़ पालेवा” – बस असं झालंय. (एका लोकप्रिय गीताचे शब्द, ह्या शब्दांचा अर्थ आहे – गवगवा न करता). ह्या शब्दांचा काय अर्थ आहे, मला कळलं नाहीं, पण, मी खरंच सांगतोय, की थोडा वेळ मी त्यांचा खरा अर्थ शोधंत होतो...

कधी कधी असंही होतं, की बिल्डिंगमधे शांतता आहे, आणि शेपिलोवासुद्धां काही आणतं नाहीये आणि काही सल्लाही देत नाहीये. तेव्हां, कदाचित, अचानकंच फोन वाजूं लागतो. आणि जसांच तुम्हीं रिसीवर उचलता, त्यांतून एक उत्तेजित, दणकट, जणु कुठे कमीत कमी आग तरी लागलीये, एका बाईचा कर्कश स्वर बोलतो:

“तर! (विराम) तर! तर!”

ही प्रकट होतेय माझी आणखी एक हीरोइन, जिचं नाव तुम्हांला लवकरंच कळेल.

“हैलो,” तुम्हीं म्हणता, “कोण बोलतंय?”

काहीच प्रतिक्रिया नाही, उलट – माझ्या प्रश्नालाच प्रश्नार्थक उत्तर मिळतं.

“मी कोणाशी बोलतेय? कोण आहांत आपण? मी कोणच्या नंबरवर आले?!”

“तुम्हांला कोण पाहिजे?” मी विचारतो.

पुन्हां कोणतीच प्रतिक्रिया नाही. रिसीवर ठेवून द्यावासा वाटतो, पण त्यांतून पुन्हां जोरदार, त्रस्त आवाजांत विचारतांत:

“हा, तान्याचा मुलगा आहे कां?! सिर्गेई?!”

“हो, मीच आहे,” मी उत्तर देतो.

“एपल्स!!!” रिसीवर जोराने ओरडतो.

कळंत नाहीं की काय म्हणावं, पण मग मी म्हणतो, की चांगलं आहे, की एपल्स आहेत.

“खूप सारे एपल्स आहेत!!!”

फार छान,” मी म्हणतो.

“ही,” पूर्वीसारख्यांच त्रस्त-उत्तेजनेनं रिसीवर माहिती देतो, “ल्येना विदूनवा, तिसरा मजला, तुझ्यावरची शेजारीण! माझ्या ह्यांना कोणीतरी दोन बैग्स भरून एपल्स दिलेत. त्यांना खाता येत नाहीं. तुटके-फुटके आहेत! मोरंब्यासाठी!!! अर्धे घेऊन घे!!!”

बोलंत असं होती, की स्पष्ट कळंत होतं: जर नाही घेतले, तर एखादी भयंकर घटना होईल, क्रांतिसारखी. तिला खूप विचारावसं वाटंत होतं की इतकी घाबरली कां आहे, पण विचारण्यांत काही अर्थ नाहीं: ल्येना विदूनवा – काटकेली, ऊंच, मध्यम वयाची बाई आहे, आणि ती नेहमी घाबरलेलीच असते. कुठेही जात असो, कुणाशीही बोलंत असो – प्रत्येक काम ती अश्या स्टाइलमधे करते, जणु युद्ध चाललं आहे आणि आमच्या चारीकडे शत्रूचा घट्ट वेढा पडला आहे.

मी, ऑफकोर्स, थैंक्यू म्हणतो, पण त्याची आवश्यकता नाहीये.

“मस्त! आत्तां सिर्गेइ आणून देईल!”

आणि तिचा नवरा सिर्गेइ, माझंच नाव असलेला, तुटक्या एपल्सची पिशवी आणतो, आणि तीनशे रूबल्स सुद्धां देतो, जे ल्येनाने सात महिन्यांपूर्वी माझ्याकडून तीन दिवसासाठी उसने घेतले होते.

“थैन्क्यू!” मी म्हणतो आणि एपल्सची पिशवी किचनमधे घेऊन जातो.

आता मी आणि मम्मा ओवनमधे एपल्स शिजवतो आणि त्यांत साखर घालून खातो.

 

आणि आमच्या बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावर कुत्र्यांवाली अक्साना राहते. कुत्र्यांवाली- अशासाठी, की असं कधीही नाही झालं की, सकाळ असो वा संध्याकाळ, उन्हाळा असो किंवा हिवाळा, मी घरांतून निघालो आणि कुत्र्याबरोबर हिंडत असलेली अक्साना मला भेटली नाही. आणि दरवेळेस ती वेगवेगळ्या कुत्र्यांबरोबर हिंडते. तिची सगळी कुत्री लहान-लहान आहेत, घराच्या  आतंच राहणारी आहेत, पण खूप रागीट आहेत आणि सदा भुंकतंच असतात. ती कुत्रे कां बदलते? अशासाठी, की अक्सानाजवळ एकच कुत्रा जास्त दिवस नाही टिकंत. सुरुवातीला, जवळ-जवळ दोन वर्षांपूर्वी, तिच्याकडे विकी होता, लाल केस असलेला. त्याने भुंकून-भुंकून सम्पूर्ण बिल्डिंगला वेड लावलं आणि मरून गेला.

“आजारी होता,” अक्सानाने सांगितलं.

मग आला एक काळा कुत्रा, विकी सारखांच, पण ह्याचं नाव होतं जस्सी. अक्सानाच्या हातांतून सुटून बिल्डिंगच्या मागे पळाला, आमची बिल्डिंग रस्त्याच्या बाजूलांच आहे, आणि कारच्या खाली आला. आतां अक्सानाकडे आहे ब्येली. पांढरा आहे, काळे चट्टे असलेला, हा सुद्धां असा भुंकतो जसं त्याला कुणी मारलं आहे. 

हिवाळ्यांत अक्साना आपल्या कुत्र्यांना विशेष प्रकारचे कोट घालते, ज्याने त्यांना थंडी नाही वाजणार. पण कुत्र्यांशिवाय अक्साना ह्यासाठीसुद्धां प्रसिद्ध आहे, की तिला आमच्या बिल्डिंगच्या प्रत्येक माणसाबद्दल सगळं माहितीये.

“नवव्या मजल्यावरच्या दीनाला मुलगी झालीय.”

“फेद्या पलेतायेव मेला.”

“वेरा तरासोवावर कोर्ट केस होणारेय.”

मला बरेंचदा कळतंच नाही, की ती कुणाबद्दल बोलतेय, पण काहींतरी प्रतिक्रियातर द्यावीच लागते नं. काही तरी सांगून टाकतो, नेहमीच नाही, कदाचित, अधून मधून.

पण अक्सानाशी वार्तालाप ह्याच मुद्द्यावर येऊन थांबतो की माझं लग्न झालंय किंवा नाही, आणि मी केव्हां लग्न करणारेय. सुरुवातीला हा प्रश्न अक्सानाची मम्मी ताइस्या ग्रिगोरेव्ना बरेंचदा विचारायची, पण मग ताइस्या ग्रिगोरेव्नाचे पाय दुखू लागले, आणि तिने घराबाहेर पडणं बंदच केलंय. म्हणून तिची जागा आता अक्सानाने घेतलीय. 

स्टोअरमधे जातो, काही सामान विकंत घेतो आणि परंत येतो. आन्या आण्टी फोन करते.

“सिर्योझ, चहा प्यायला ये! चीज़-पैनकेक केलंय!”

आनंदाने जातो, कारण मी इथे कांहीही म्हटलं तरी, आन्या आण्टीशी मी खूपंच चांगलं वागतो.

आन्या आण्टीला आपल्या चारीकडच्या जगांत खूपच इंटरेस्ट आहे, जे टी.वी.स्क्रीनवर सगळ्यांत चांगल्या प्रकारे दाखवले जाते, आणि साप्ताहिक पेपर “आर्ग्युमेंट्स एण्ड फैक्ट्सच्या” पानांवरसुद्धां.

मी चहा पितो, तेव्हां आन्या आण्टीचे चारही टी.वी. चालू असतात, प्रत्येक खोलीत एक-एक आणि किचनमधे पण. त्यांच्यावर वेगवेगळ्या चैनल्स दाखवण्यांत येत आहेत, आवाज़ खूप मोठा आहे, कारण शेपिलोवाला कमी ऐकू येतं. पण स्वत: आन्या आण्टी ह्यावेळेस अरुंद कॉरीडोरमधे कुणाशी तरी फोनवर बोलतेय:

“हो, वालेच्का, फक्त कडक गादीवरंच झोपलं पाहिजे! काय?!”

“उच्कुदू-ऊक, तीन विहिरी!” किचनचा टी.वी. गातोय.

“शिवाय, वर्षाच्या सुरूवातीपासून रूसमधे निर्वासितांचं येणं कमी नाही होणार, ह्या गोष्टीकडेसुद्धां, निःसंदेह, लक्ष द्यायची गरज आहे,” हॉलमधला टी.वी. सूचना देतोय.

“हो, हो!” आन्या ओरडते. “आणि उशी न घेतां!”

इसाउल, इसाउल, घोडा कां सोडला!” कॉरीडोरलगतच्या लहान्या खोलीतला टी.वी. आपल्या मोट्ठ्या आवाजांत आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहे.

“वालेच्का, काय?! नाहीं, गरज नाहीये! आणि जास्त हिंडलं पाहिजे! गति म्हणजे - जीवन आहे! वालेच्का तुझा आवाज़ बिल्कुल ऐकूं येत नाहीये!”

मग, जेव्हां गोष्टी संपलेल्या असतांत, चहा पिऊन झालेला असतो, तेव्हां कळतं, की मला चिकन-बटाटा नक्कीच खावा लागेल (माझ्या अनुभवावरून सांगतो की जोपर्यंत आन्याने दिलेला प्रत्येक पदार्थ खात नाहीं, तोपर्यन्त तिच्या घरांतून बाहेर पडूंच शकत नाहीं). मी खातो, आणि शेपिलोवा हॉलमधे ठेवलेल्या गोल टेबलाशी बसते, हातांत रंगबिरंगे पेन घेऊन साप्ताहिक पेपर “आर्ग्युमेन्ट्स एण्ड फैक्ट्स” वर मान वाकवते. आन्या फक्त हाच पेपर वाचते, जणुं दुसरं काही वाचणं तिच्या सिद्धांतांत बसतंच नाहीं. मी तिला आमच्या प्रसिद्ध व्यक्तींची जीवन चरित्रे, प्रकृतितील मनोरंजक तथ्यांबद्दल, वैज्ञानिक आविष्कारांबद्दल वेगवेगळ्या प्रकाराची पुस्तकं भेट दिली, पण माझ्या लक्षांत आलं, की किचनच्या बेसिनजवळ त्यांचा ढेर पडला आहे, कदाचित फेकून देण्यासाठी, किंवा असंच काहींतरी करण्यासाठी. “आर्ग्युमेन्ट्स एण्ड फैक्ट्स” कुठली-कुठली, पण आन्याला हवी असलेली जीवनोपयोगी माहिती पुरवायचा.

विसोत्स्कीबद्दल लेख, जो त्याच्याबद्दलची फिल्म “विसोत्स्की. थैंक्यू फॉर बीइंग अलाइव” रिलीज़ झाल्यावर न वाचणं अशक्य होतं. एक छोटासा पैरेग्राफ़, की मित्रांच्या, चाहत्यांच्या गराड्यांत सतत असूनसुद्धां तो आतून अगदी एकटा होता, लाल रंगाच्या तिहेरी रेषांनी रेखांकित केलेला आहे. मणक्याच्या हाडाला आधार देण्यासाठी कडक गादीवर, आणि शक्य तोवर, उशी न घेतां झोपायला पाहिजे’, ह्या माहितीवर सम्पूर्ण हिरवा रंग फिरवलेला होता. गाल्किनच्या फोटोच्या चारीकडे, माहीत नाही कां, काळं वर्तुळ बनवलेलं होतं. जर ह्याला रचनात्मक कार्य म्हणायचं टाळलं तर, थोडक्यांत म्हणजे खरोखरंचं सम्पादन चालू होतं! नंतर हे सगळे भाग कापले जातांत आणि सर्वांत छोट्या खोलीत एका लहानश्या टेबलवर गड्डी करून ठेवले जातांत.                   

पेपरमधली महत्वपूर्ण माहिती  वेगवेगळ्या रंगानी रेखाटून झाल्यावर आन्या आण्टी थकून जाते, आणि हट्ट करते, की मी उद्या तिच्याबरोबर थियेटरला जावं. थियेटर मला फारसं आवडंत नाहीं, काही तरी सबब सांगून मी नाहीं म्हणून टाकतो, पण आन्या आण्टीच्या ह्या प्रस्तावाबद्दल आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते.

माझ्या आवडत्या, अतिथिप्रिय ह्या शेजारणीला थियेटर्स आणि कॉन्सर्ट्सला जायला फार आवडतं. तिथे, जेव्हां शोचालू असतो, तेव्हां ती नक्की झोपून जाते, कारण आपल्या वादळी हालचालींनी ती आधीच थकलेली असते, वरून झोप न येण्याची कम्प्लेन्ट सुद्धां आहे. पण ह्याने शोबद्दल सांगायला तिला काहींच अडचंण येत नाहीं, ती मजेत सांगते, की शोकित्ती छान होता, आणि तिला सगळंच कसं आवडलं, म्यूजिक, ड्रेसेज़...आन्या आण्टीला तिने बघितलेला प्रत्येक शोआवडतो. फक्त एकदां, जेव्हां तिला बल्शोयथियेटरमधे होत असलेला कार्मेनतिला आवडला नव्हता. तिला ह्यागोष्टीचा फार राग आला, की जुन्या ढंगाच्या ड्रेसेस ऐवजी कलाकारांनी काही दृश्यांमधे स्विमिंग सूट्स घातले होते. असं वाटतं, की बल्शोयमधे काही कारणास्तव ती झोपूं नव्हती शकली...

आन्या आण्टीच्या घरून निघतो. पोट गच्च भरलं आहे, डोक्यांत विचार पण भरले आहेत, आणि खिडकी जवळच्या गार्बेज-पाइपच्या जवळून यारोस्लाव माझं अभिवादन करंत जोराने म्हणतो “ग्रेट!”. तिथे बरेंच लोक जमा होते.

“नमस्कार,” मी उत्तर देतो.

मला आश्चर्य वाटतं, की खालून कुत्रेवाली अक्साना आपला नेहमीचा प्रश्न ओठांवर चिटकवून, की मी लग्न केव्हां करणारेय, दिसंत नाहींये...

 

काही दिवसांपूर्वी मला बरेंच दिवसांसाठी बाहेर जावं लागलं होतं. परत आल्यावर माझ्या मनांत विचार आला, की ओरडणारे टी.वी., संध्याकाळच्या उत्तेजित टेलिफोनचं “तर!” म्हणणं, यारोस्लाव आणि अक्सानाच्या कुत्र्यांविना मी बोरझालो होतो. मला कळून चुकलं की हे सगळे लोक माझ्या कल्पनेपेक्षांही मला जास्त प्रिय आहेत, आणि मी त्यांच्याबद्दल लिहायचं ठरवलं.

स्टेशनवरून घरी आल्यावर, जो पर्यंत आन्याने घण्टी वाजवून हे नाहीं सांगितलं की उद्या मश्रूम्सचं लोणचं घ्यायला बाजारांत जायचं आहे, मला चुकल्या-चुकल्यासारखं वाटंत होतं. कचरा ठेवायला बाहेर निघालो, आणि यारोस्लावने प्रॉमिस केलं की उद्यांच तो आणि च्योर्नीमिळून तुटलेला काच बसवून देतील, जो आत्तांच च्योर्नीच्या डोक्याचा मार लागून फुटलाय, ह्या फुटलेल्या काचेतूंन मी अक्सानाला बघितलं, जी आपल्या ब्येलीला बोलवंत होती, आणि ल्येना विदूनवालापण बघितलं, ती स्टोअरमधून सामानाने भरलेली हिरवी बैग आणंत होती. “सगळं ठीक आहे,” मी आपल्या अंतरात्म्याचा आवाज़ ऐकला, “तू घरी पोहोचलाय”. 

आणि एप्रिल-मेमधे, जेव्हां ऊन वाढूं लागेल, अक्साना आणि ल्येना संध्याकाळी आमच्या बिल्डिंगच्या जवळ छोट्याश्या बेंचवर बसतील आणि, मला बघतांच गिटार आणून वाजवायचा हट्ट धरतील. मी वाजवेन, आणि तेव्हां अक्साना विचारमग्न होऊन म्हणेल:

“काय गातो! – आणि अजूनपर्यन्त लग्न नाहीं झालं!”

माझा मनांत विचार आला, की असला विचार करणं, खरोखरंच अन्याय आहे, पण मे महिन्याचं वारं, ह्या विचाराला हिरव्या-हिरव्या कम्पाउण्डमधे खोलवर घेऊन जातंय, आणि तो तिथेच कुठेतरी हरवतोय, पुन्हां कधीच परत न येण्यासाठी, जणु काही तो मनांत कधी आलांच नव्हता...

 

 

 

 

 

 

 

 

लेखकाचे मनोगत...

(अत्यंत दुःखाने कळविण्यांत येत आहे कि शी सिर्गेइ पिरिल्याएव (1978 – 2021) ह्यांचा जानेवारी 2021 मधे अचानक मृत्यु झालाय. बघूया स्वतःबद्दल ते काय लिहितात – चारुमति रामदास ) 

माझा जन्म सुप्रसिद्ध हीरो-सिटी स्मोलेन्स्कमधे सन् 1978मधे झाला आणि मी तिथे सेप्टेम्बर 1985पर्यंत राहिलो. स्मोलेन्स्कमधे माझे जवळ-जवळ सगळे जवळचे नातेवाईक राहायचे, मम्मीकडचे आणि पापांकडचेही.

माझे मम्मी-पापा नौकरी करायचे (पापा सैन्यात होते, आणि मम्मी रेडिओ स्टेशनवर), आणि मी नर्सरी शाळेत जायचो, तिथे मी बरेंचदा आजारी पडायचो, म्हणून मी बराच काळ आजी-आजोबांकडे राह्यलो. म्हणूनंच माझ्या ह्या लघु कादंबरिकेत आजीची, पणजीआजीची, आणि आजोबाची गोष्ट आहे. आणि व्लादिक – माझा मावस भाऊ आहे – मम्मीची बहिण – स्वेता आण्टीचा मुलगा. त्यांचे कुटुम्बसुद्धां स्मोलेन्स्कमधेंच राहायचे. आणि तसं पण – माझ्या गोष्टींचे बाकी पात्रंसुद्धां खरेखुरेच आहेत – ते त्या काळांत आमच्या कम्पाऊण्डमधे राहायचे, किंवा माझ्या नातेवाइकांचे मित्र होते. मी एकही काल्पनिक प्रसंग लिहिलेला नाहीये.

त्याकाळचे स्मोलेन्स्क म्हणजे एक शांत, हिरवळीनं बहरलेलं शहर असयाचं, ज्यांत, म्हातारपणामुळे चरमरंत ट्रामगाड्या घसटायच्या. सामूहिक फार्मच्या बाजारांत आमच्या आवडीचे बियाणे, कलिंगड आणि चेरीज़ विकायचे, आणि शहरांतल्या सिनेमा हॉल्समधे वेगवेगळ्या प्रकाराच्या, नव्या आणि जुन्या इण्डियन फिल्म्स दाखवायचे....

आज तो काळ मला स्वर्गासारखा वाटतो, ज्याला, मला वाटतं, मी कधीच विसरूं नाहीं शकणार. आम्हीं मॉस्कोला आल्यावर पण, जवळ-जवळ सन् 1994पर्यंत मी सगळ्या सुट्ट्या आणि सगळे उन्हाळे स्मोलेन्स्कमधेच घालवायचो, स्वर्गाच्या अनुभवाला खूप वेळ अनुभवायच्या प्रयत्नांत, कारण तिथेच माझं खरं जीवन होतं. आण्खी कोणत्याही शहराने आणि देशाने मला कधीच आकर्षित नाहीं केलं, हे सांगताना घाबरणार नाहीं, की मी जणु तिथेच बंदिस्त झालो होतो. सन् 1998मधे माझे आजोबा वारले (इण्डियन फिल्म्सह्या लघु-कादंबरिकेचे पर्तोस) आणि स्वर्गाची जाणीव संपली. मी स्मोलेन्स्कला जात राहिलो, पण ही वेगळ्याच प्रकारची ट्रिप असायची.

सन् 2005मधे मी मॉस्को स्टेट युनिवर्सिटीतून जर्नलिज़्मचा कोर्स पूर्ण केला, सुरुवातीला एका प्रकाशनगृहामधे काम केलं, मग रेडिओवर, पण लेखकांसाठी आयोजित केलेल्या सेमिनार्समधेही मी जायचो, माझ्या रचना प्रकाशित होत होत्या, आपल्या गोष्टी आणि कविता मी वेगवेगळ्या पब्लिक फोरम्समधे प्रस्तुत करंत होतो (तसं तर लहानपणीच मी लिहायला सुरुवात केली होती, पण काही व्यवस्थित जमलं नाहीं). लेखिका मरीना मस्क्वीना, कवियत्री एवम् अनुवादिका मरीना बरदीत्स्काया, कवियत्री तात्याना कुज़ोव्लेवाया, आलोचक इरीना अर्ज़मास्त्सेवाया, कवियत्री आणि नाटककार एलेना इसायेवा आणि एडवर्ड निकलायेविच उस्पेन्स्की – ह्या मंडळींशी संवाद करणं फार अवघड वाटायचं. एडवर्ड उस्पेन्स्कीने जेव्हां माझ्या रचनांची तारीफ़ केली, तेव्हां मला विश्वास वाटू लागला, की मी लेखक आहे. मी इरीना युरेव्ना कवाल्योवाचा आभारी आहे, ज्या लीप्कीमधे आयोजित तरूण लेखक मंचाच्या आयोजकांपैकी आहेत, ज्यांत मी सन् 2004मधे भाग घेतला होता, त्यांच्याकडून मिळालेल्या प्रोत्साहनासाठी आणि प्रेमळ वागणुकीसाठी धन्यवाद देऊं इच्छितो.

मी विशेषकरून मुलांसाठी लिहिण्याचा प्रयत्न नाही केला – बस, मनांत येईल ते लिहीत गेलो, उलट मी मोठ्यांसाठीच लिहीत होतो. पण, तरीही, मला मुलांचा लेखक म्हणूं लागले. ठीक आहे, मी विरोध नाही करंत.

जे लोकं हे पुस्तक वाचतील त्यांना अगदी हृदयांतून धन्यवाद. आणि ज्यांना हे आवडेल, त्यांना आनंदाने आपला मित्र समजेन.

 

नेहमीच आपला

सिर्गेइ पिरिल्याएव                               

    

          

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

           

 

 

                               

 

       

                     

         

       

                       

 

   

    

        

             

  

             

                            

               

         

 

                      

    

                  

 

                 

मी आणि इन्डियन फिल्म्स (मराठी)

      सिर्गेइ पिरिल्याएव     मी आणि   इण्डियन फ़िल्म्स     मराठी भाषांतर आ. चारुमति रामदास           ज...